खिचडी माहात्म्य!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पाच-पन्नास जिन्नसांनी सजलेल्या खिचडीनामक पूर्णब्रह्माची भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषणा व्हावी, अशी "एक'मुखी मागणी होत आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या जागतिक खाद्योत्सवाच्या निमित्ताने हे खिचडीपुराण रंगते आहे

सांप्रत काळी भारतभूमीत "एक' या अंकाची चलती आहे. एक राष्ट्र, एक गान, एक नदी, एक टॅक्‍स, एक निवडणूक अशी "एक'सुरी मागणी होताना दिसते. त्यातच "एक राष्ट्र, एक पदार्थ' या सूत्राची भर पडायला हरकत नाही, असा एकंदरीत सूर दिसू लागला आहे. हा "एक' पदार्थ म्हणजे खिचडी! खिचडी हे तर पूर्णान्न. डाळ-तांदळाच्या अद्वैताचे हे सुग्रास रूप हरेक भारतीय घराघरांत नित्यनेमे प्रकट होत असते. गरिबापासून धनवंतापर्यंत कुणाच्याही घरात "सुखाचे चार घास' या बिरुदानिशी ही खिचडी पानात येते. विविधतेतून एकता जपणारा आपला देश आणि पाच-पन्नास जिन्नसांनी सजलेले हे खिचडीनामक पूर्णब्रह्म यांचा स्व-भाव एकच. असा हा सर्वसमावेशक पदार्थ भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित व्हावा, अशी "एक'मुखी मागणी होऊ लागली आहे. अर्थात खिचडीसारख्या सोशिक आणि सात्विक पदार्थाला अशी राष्ट्रीय अस्मितेची फोडणी देणे काहींना आवडणारे नाही. या मागणीमुळेही काही विरोधकांचा पापड मोडल्याचे दिसते आहे. हल्ली कश्‍शाचेही मार्केटिंग करावयाची फॅशनच आहे, असाही सूर उमटताना दिसतो. पण खिचडी हा पदार्थ खरोखर प्रसार करावा, असाच आहे, याबद्दल दुमत व्हायला नको.

तसे पाहू गेल्यास भारताच्या विविध प्रांतांत अनेकविध खाद्यवैशिष्ट्ये आढळतात. बंगाल-ओरिसाचा रसगुल्ला, मध्य प्रदेशातली जलेबी-समोसा, राजस्थानी दालबाटी, उत्तर प्रदेशाची मलैय्यो किंवा थेट बनारसी पान, बिहारी लिट्टीचोखा, गुजरातचा ढोकळा वा उंधीयू, पंजाबची मक्‍के दी रोटी आणि सरसोंदा साग, इकडे दक्षिणेत पायसम, कुट्टू किंवा अवियल...छे, नावे तरी किती घेणार? महाराष्ट्राची पुरणपोळी आणि डाळिंबी उसळ या पंगतीत दिमाखात जाऊन बसते. पंजाबची ओळख तंदुरी चिकननेही होत असली तरी तंदुरी चिकन हा राष्ट्रीय पदार्थ नसून राष्ट्रीय पक्षी असल्याचे खाद्यजगतात मान्यताप्राप्त असल्याने त्याचा उल्लेख वेगळा करावा लागला! सारांश इतकाच, की आपले भारतीयत्व अभिमानाने मिरवणाऱ्या या शेकडो व्यंजनांमध्ये एक पदार्थ सर्व प्रांतांत आढळतो आणि त्याचे नावही फारसे बदलत नाही, तो म्हणजे खिचडी. द्विदल धान्यांमधून मिळणारी प्रथिने, तांदळातून मिळणारी कर्बोदके आणि अन्य मसाल्यांच्या सत्वगुणांमुळे ही खिचडी मोठी सत्त्वशील मानली जाते. स्वस्त आणि मस्त. घराघरात नेमेचि पकणारी ही खिचडी हल्लीच्या काळात उपाहारगृहे आणि हॉटेलांच्या मेनूकार्डावरही तळपत असते. पण ती खरी नांदते ती मध्यमवर्गीय घरात हेच खरे. खिचडी कधीही करावी आणि कधीही खावी. तुपाबरोबर खावी, दह्याबरोबर खावी, रायत्या-पापडासंगे खावी, कढीबरोबर खावी किंवा टोमॅटोच्या साराशीही तिचे चांगले सख्य आहे. काहीच तोंडी लावणे नसले, तर साध्या लोणच्याबरोबर किंवा नुसतीच खावी. कशीही ती चांगलीच लागते. तरीही रात्री उशिरा दमून भागून घरी परतल्यावर किंवा प्रवासानंतर आल्यावर तर अधिकच चांगली लागते. अशावेळी कुकरच्या दोन-तीन शिट्यांनी खिचडी तय्यार असल्याची वर्दी दिली की जे काही समाधान मिळते, ते अवर्णनीय असते. खिचडी रात्रभोजनात खरा भाव खाऊन जाते, हे सत्य आहे. आसामपासून पार कन्याकुमारीपर्यंत या खिचडीचा दबदबा गेली शेकडो वर्षे राहिला आहे, तरी तिचा उदो उदो मात्र कधी झाला नाही. तो सध्या होतो आहे राजधानी दिल्लीत आज-उद्या होणाऱ्या जागतिक खाद्योत्सवामुळे. दिल्लीत सध्या "इंडिया गेट'च्या विस्तीर्ण हिरवळीवर सात फुटी परिघाच्या टोपात आठशे किलोंची खिचडी पकताना नक्‍की दिसेल. नामचीन बल्लव संजीव कपूर यांच्या समर्थ कालथ्याखाली ही विक्रमी दालखिचडी पकवली जाणार आहे. खिचडी पकली की ती उपस्थित सरकारी-निमसरकारी अधिकारी, बडे कॉर्पोरेट बॉस, आणि अन्य पाहुण्यांच्या पोटात तत्काळ जाईल. उरलीच तर काही शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होईल! हा एक विश्‍वविक्रमही ठरणार आहे. काही का असेना, उभ्या जगताला आपल्या भारतीय खिचडीचे माहात्म्य पटल्याशी मतलब. एरवी स्पेनमध्ये पकणाऱ्या पाएला नावाच्या खिचडीचे जगभर गुणगान होते. मग आपल्या खिचडीने काय घोडे मारले आहे? शिवाय आपल्या पानातील दोन घास दुसऱ्याला देऊ करण्यालाच तर संस्कृती म्हणतात आणि ते घास दालखिचडीचे असले तर आणखी काय हवे?

Web Title: editorial