धनवंतांचे चोरकप्पे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

करवसुलीच्या जगभरातील व्यवस्थेतील कच्चे दुवे करचुकवेगिरीला कशा वाटा मोकळ्या करून देत आहेत, यावर "पॅरडाइज पेपर्स'च्या गौप्यस्फोटामुळे प्रकाश पडला आहे

जगभरातील बडे राजकारणी, मातब्बर उद्योजक, चित्रपट तारे आणि अन्य अनेकांनी अवाढव्य रकमा परदेशातील "करनंदनवना'(टॅक्‍स हेवन) मध्ये गुंतवून केलेल्या करचुकवेगिरीचा उजेडात आलेला "महाघोटाळा' सर्वसामान्यांना तोंडात बोट घालायला लावणारा आहे. जगाच्या पाठीवरील 180 देशांमधील बड्या-बड्यांची नावे या प्रकरणात असून, त्यात 714 भारतीयांचा असलेला समावेश सरकारच्या करवसुलीच्या व्यवस्थेतील कच्चे दुवे उघड करणारा आहे. त्यामुळेच दीड वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या "पनामा पेपर्स'च्याच धर्तीवर रविवारी रात्रीनंतर बाहेर आलेल्या "पॅरडाइज पेपर्स'मधील संशयित भारतीयांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेणे केंद्र सरकारला भाग पडले. या गौप्यस्फोटामुळे खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने या चौकशीसाठी वेगवेगळ्या तपासयंत्रणांचा समूह नेमण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार आणि विशेषत: भारतीय जनता पक्ष यांना गुजरात निवडणुकीच्या तोंडावर अस्वस्थ करणारी बाब म्हणजे या प्रकरणात केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा व राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांची नावे आढळली आहेत. त्याशिवाय कोट्यवधींची कर्जे बुडवून परदेशात फरारी झालेला "लीकर डॉन' विजय मल्ल्या आणि "सुपरस्टार' अमिताभ बच्चन, "कॉर्पोरेट लॉबीइस्ट' नीरा राडिया यांचाही समावेश असल्यामुळे अवघ्या भारताचे लक्ष या गौप्यस्फोटाकडे वेधले गेले, यात नवल नव्हते. त्यामुळेच केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा (सीबीडीटी)च्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील भारतीयांची चौकशी करण्यात येणार असली तरी, त्यात जयंत सिन्हा यांचे नाव आल्याने "केवळ या यादीत नाव आहे, याचा अर्थ त्यांनी काही गैरव्यवहार केला असा नाही!' अशी सारवासारव सरकारी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

मात्र, या प्रकरणाकडे केवळ कोण भारतीय त्यात गुंतला आहे, एवढ्यापुरती त्याची व्याप्ती मर्यादित नाही. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान यांच्याबरोबरच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अझीझ आदी बड्या नेत्यांचीही नावे असल्यामुळे एकंदरितच करचुकवेगिरी उद्योजक वा राजकारणीच करतात, या समजुतीला तडा गेला आहे. करवसुलीच्या जगभरातील व्यवस्थेतील कच्चे दुवे करचुकवेगिरीलाच कशा वाटा मोकळ्या करून देत आहेत, यावरच "पॅरडाइज पेपर्स'मुळे प्रकाश पडला आहे. अर्थात, त्याचा पहिला गौप्यस्फोट हा "पनामा पेपर्स'मुळे झालाच होता. त्यामुळे या ताज्या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा करतानाच, "पनामा पेपर्स'मध्ये नावे असलेल्या पाच जणांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई सुरू झाल्याचेही सरकारने जाणीवपूर्वक जाहीर केले आहे. बर्म्युडातील "ऍपलबॉय' या कायदेविषयक सल्लागार संस्थेमार्फत उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून हे प्रकरण उजेडात आले आहे. खासदारकीपूर्वी विद्यमान मंत्री जयंत सिन्हा हे "डिलाइट' कंपनीचे संचालक होते आणि उमेदवारी अर्जाच्या वेळी त्यांनी ही माहिती लपवली, तसेच पंतप्रधान कार्यालयालाही याचा सुगावा लागू दिला नव्हता, असे ही कागदपत्रे सांगतात; तर अमिताभ बच्चन यांनी बर्म्युडातील "जलवा मीडिया' कंपनीत "कौन बनेगा करोडपती' या बहुचर्चित आणि "धनाढ्य' मालिकेच्या पहिल्या हंगामानंतर 2002 मध्ये गुंतवणूक केली होती, असे या कागदपत्रांवरून उघड झाले आहे. राणी एलिझाबेथ यांनी कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक परदेशात केल्याचे या कागदपत्रांवरून दिसते. मात्र, राजघराण्याने अशी गुंतवणूक करणे कायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या व्यवस्थापकांनी केला आहे. जागतिक पातळीवर एका रशियन कंपनीनेही अशाच प्रकारची गुंतवणूक परदेशात केल्याचे स्पष्ट झाले आहे, तर आता शौकत अझीझ हे अशा प्रकारे परदेशात गुंतवणूक करून करचुकवेगिरी करणारे पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. "पनामा पेपर्स'मध्ये नवाज शरीफ यांचे नाव गैरव्यवहारांच्या संदर्भात समोर आले होते. आता ट्रम्प ते राणी एलिझाबेथ आदी अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघड झाल्याने या गौप्यस्फोटाचे जागतिक स्तरावर होणारे परिणाम अपरिहार्य दिसतात.

हे सारेच उद्विग्न करणारे आहे. "पनामा पेपर्स'मधून अशाच प्रकारची माहिती उजेडात आली, तेव्हाही जनमानसात अशीच भावना निर्माण झाली होती. या संदर्भात जाहीर प्रतिक्रिया मात्र फक्‍त बच्चन यांनी दिली आहे, हे विशेष. अमिताभ यांचे नाव पहिल्यांदा "बोफोर्स' प्रकरणात आले होते आणि "पनामा पेपर्स'मध्येही त्यांचे नाव होतेच! मात्र, अशा आरोपांबाबत सरकारी यंत्रणांशी आपण कायमच सहकार्य करत असल्याचा त्यांचा दावा असून, "आता मला शांततेत जगू द्या!' असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात, अशा प्रकारची आर्त विनवणी सारेच बडे धनिक-वणिक करू शकतात. मात्र, त्यामुळे त्यांनी केलेल्या करचुकवेगिरीवर पडदा पडू शकत नाही. समाजाने आणि प्रसारमाध्यमांनी उभ्या केलेल्या या साऱ्यांच्या "लार्जर दॅन लाइफ' प्रतिमेलाच "पॅरडाइज पेपर्स'मुळे तडा गेला आहे.

Web Title: editorial