Kamal_Rajini
Kamal_Rajini

कमल हसनचे विश्‍वरूपम!

राजकारणी चित्रपटांतून स्फूर्ती घेतात की राजकारण्यांच्या वर्तनावर चित्रपट बेतले जातात, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सिनेमा आणि राजकारण यांच्या याच अतूट नात्याचा प्रत्यय अखेर तमीळ "सुपरस्टार' कमल हसन याने थेट राजकीय पक्षाची स्थापना करून आणून दिला आहे. अर्थात द्रविडी राजकारणाला सिनेस्टारांचे वावडे कधीच नव्हते आणि तमिळनाडूनचे किमान पाच मुख्यमंत्री या ना त्या नात्याने चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता हे त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय स्टार! खरे तर पहिल्यावाहिल्या द्रविडी पक्षाची स्थापना करणारे अण्णादुराई यांचाही सिनेसृष्टीशी निकटचा संबंध होता आणि "द्रविड मुन्नेत्र कळघम'चे सर्वेसर्वा एम. करुणानिधी हे तर विख्यात पटकथाकार आहेत. अशा या सिनेकलावंतांचा बुजबुजाट असलेल्या द्रविडी राजकारणात तमीळ सुपरस्टार रजनीकांत याच्यापाठोपाठ कमल हसनने उडी घेतली आहे. जयललिता यांचे निधन, त्यापाठोपाठ अण्णा द्रमुक पक्षातील चव्हाट्यावर आलेले मतभेद आणि करुणानिधी यांचे झालेले वय यामुळे द्रविडी राजकारणात निर्माण झालेल्या काहीशा अनागोंदीच्या पार्श्‍वभूमीवर हे दोघे स्टार आता थेट राजकारणाच्या मैदानात उतरले असून, त्यामुळे तमिळी जनतेचा कितपत फायदा होतो, यापेक्षा वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे दोघे कोणती भूमिका घेतात, हा प्रश्‍न कळीचा बनला आहे. त्यामुळेच या दोघांचेही पक्ष हे अखेरीस प्रादेशिक पक्षच ठरणार असले, तरी राष्ट्रीय पातळीवरील त्यांची भूमिका आणि ते नेमकी कोणाशी हातमिळवणी करणार, याबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

रजनीकांतने आपल्या पक्षाची घोषणा यंदाच्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला केली तेव्हाच कमल हसन राजकारणात उतरणार काय, हा प्रश्‍न अनेकांच्या मनात भिरभिरत होता. अखेर बुधवारी कमल हसन याने आपला पक्ष विधिवत जाहीर केला आणि पक्षस्थापनेपूर्वी त्याने घेतलेली भूमिका ही अस्सल राजकारण्यांनाही आश्‍चर्यचकित करायला लावणारी होती. महात्मा गांधी तसेच एपीजे अब्दुल कलाम हे आपले आदर्श असल्याचे त्याने सांगितले आणि कलाम कुटुंबीयांची भेटही घेतली. त्यापूर्वीच त्याने रजनीकांतचीही भेट घेतली होती. तमिळनाडूतील मच्छीमारांशीही त्याने बुधवारी संवाद साधला आणि त्यानंतर मच्छीमारांनी "आता आमचे प्रश्‍न धसास लावण्यासाठी कोणी तरी वाली आला आहे!' हे त्यांचे उद्‌गारच कमल हसनच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहेत! कमल हसनचे बुधवारचे रूप हे अनेकार्थाने "विश्‍वरूपदर्शन' घडवणारेच होते!

आता प्रश्‍न हे दोन "सुपरस्टार' एकत्र येणार की द्रविडी चित्रपटसृष्टीतील आपली एकमेकांवर मात करण्याची करामत राजकारणाच्या मैदानातही तशीच पुढे सुरू ठेवणार, हा आहे. रजनीकांतची भेट त्याने दोन दिवसांपूर्वी जरूर घेतली; पण त्यामुळे आता हे दोघे लगेच एकत्र येतील आणि तमिळनाडूतील द्रमुक-अण्णा द्रमुक यांच्या साचेबंद राजकारणाला शह देतील, असे म्हणता येणार नाही. गेल्याच आठवड्यात कमल हसनने कसलेल्या राजकारण्याच्या शैलीत या प्रश्‍नाचे उत्तर देऊन टाकले आहे. "रजनीकांतच्या राजकारणाला अनेक "भगव्या' छटा आहेत आहेत आणि त्या आहेत तोपावेतो त्याच्याशी हातमिळवणी अशक्‍य असल्याचे' कमलने सूचित केले आहे. मात्र, त्याच्या या विधानाकडे त्याच्याच अनेक लोकप्रिय सिनेमॅटिक डायलॉग्जप्रमाणे बघता येणार नाही; कारण कमल हसन हा नास्तिक आणि पुरोगामी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांतून त्याने आपल्या या खऱ्याखुऱ्या भूमिकेला साजेशा अशाच "भूमिका' केल्या आहेत. त्यामुळेच आता रजनीकांतपाठोपाठ त्याने राजकारणात घेतलेली ही "एन्ट्री' दोघांचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्यावर, कोणाचा सिनेमा "ब्लॉकब्लस्टर' ठरतो, या चर्चेप्रमाणेच पुढे सुरू राहणार असली, तरी त्यामुळे द्रमुक, तसेच अण्णा द्रमुक या पक्षांबरोबरच भाजप तसेच कॉंग्रेस यांच्याही तमिळनाडूतील राजकारणाला शह बसणार, यात शंकाच नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते वीरप्पा मोइली यांच्या "तमिळनाडूच्या राजकीय अवकाशात आता नव्या पक्षाला जागाच उरलेली नाही!' या प्रतिक्रियेकडे बघावे लागते. तमीळ राजकारण हे कॉंग्रेसचे एकेकाळचे बडे नेते के. कामराज यांच्या निधनानंतर पूर्णपणे द्रविडी सिनेसृष्टीच्या हातात गेले आहे! रजनीकांत असो की कमल हसन यांच्या चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी होणाऱ्या त्यांच्या प्रतिमांच्या पूर्जाअर्चा त्या दोघांच्या लोकप्रियतेचे निदर्शक आहेत. त्यामुळेच त्यांनी राजकीय पडद्यावरही नवाच "बॉक्‍स ऑफिस हिट' सिनेमा दिला, तर आश्‍चर्य वाटायला नको. त्यामुळेच चंद्राबाबू नायडू यांनाही पुढचे राजकारण लक्षात घेऊन "मी कमलचा फॅन आहे!' अशी प्रतिक्रिया देणे भाग पडले आहे आणि "आम आदमी पार्टी'चे नेते अरविंद केजरीवाल हेही कमलबरोबर असल्याचे दिसत आहे. एकंदरीत कमल हसनने पुरता विचार करून आणि समविचारी राजकारण्यांशी पडद्याआडून संधान साधत ही "एन्ट्री' घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच रजनीकांतपाठोपाठ मैदानात उतरलेल्या कमल हसनमुळे तमिळनाडूतील राजकीय समीकरणे आरपार बदलून गेली तर आश्‍चर्य वाटायला नको!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com