।। आदित्याय... नमो नम:।। (अग्रलेख) 

aditya yogi
aditya yogi


भाजपने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री करून स्वत:बरोबरच विरोधी पक्षांपुढेही मोठी आव्हाने उभी केली आहेत. या आव्हानांना भाजप व विरोधक कसे सामोरे जातात, यावरच देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. 

उत्तर प्रदेशातील दणदणीत विजयानंतर अखेर एका आठवड्याने भारतीय जनता पक्षाने गेली तीन वर्षे विकासाच्या मुखवट्याआड लपवलेला आपला खरा चेहरा बाहेर काढला आहे! हा चेहरा अर्थातच आक्रमक हिंदुत्वाचा आहे आणि त्यापलीकडची बाब म्हणजे हा चेहरा बाहेर आल्यामुळे दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचा "अजेंडा'ही निश्‍चित झाला आहे. भाजप असो की रा. स्व. संघ असो, यांच्यासाठी ही बाब नवी नाही. अटलबिहारी वाजपेयी यांना पुढे करून भाजपने सर्वसमावेशकतेचा आव आणला, तेव्हाच भाजपचे एक मुखंड गोविंदाचार्य यांनी "वाजपेयी हा मुखवटा आहे आणि लालकृष्ण अडवानी हाच खरा चेहरा आहे,' असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरच्या दोन तपांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि आता अजयसिंह बिश्‍त ऊर्फ योगी आदित्यनाथ यांनी संघपरिवाराच्या चेहऱ्याची जागा पटकवली आहे! हे जे काही उत्तर प्रदेशाच्या निकालानंतरच्या आठवडाभरात घडले, त्यामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी प्रचाराच्या दरम्यान फडकावलेल्या विकासाच्या, सर्वसमावेशकतेच्या आणि मुख्य म्हणजे पंतप्रधानांच्या मनातील "नवभारता'च्या स्वप्नावरही भलेमोठे प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. या निवडीमागे संघाचा आग्रह हाच निर्णायक घटक असल्याचे निदान केले जाते, ते अर्थातच संघाने नाकारले आहे. भाजपवरचा संघाचा प्रभाव ही काही नवी बाब नाही. उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीची फाळणी करून भाजपने दणदणीत यश मिळवले, ती परिवाराच्या कल्पनेतील भारताच्या दिशेने पाऊल टाकणारी होती. तोच मार्ग पुढे न्यायचा आहे यावर योगींच्या राजयोगाने शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत मोठे राज्य आणि देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्गही याच राज्यांतून जातो. नेमक्‍या याच राज्याची सूत्रे भाजपने आदित्यनाथ यांच्या हाती दिल्यामुळे या पुढे देशाचे राजकारण नेमक्‍या कोणत्या वळणावर येऊन ठेपले आहे, याची प्राथमिक झलक समोर आली आहे. 
आदित्यनाथ हे केवळ उत्तर प्रदेशातीलच नव्हे, तर भाजपमधील स्वतंत्र "संस्थान' आहे आणि या संस्थानाची स्वतंत्र अशी "हिंदू युवा वाहिनी' आहे. या युवा वाहिनीचा स्वतंत्र अजेंडाही आहे. या युवा वाहिनीमध्ये भाजपची सूत्रे कोणाच्याही हाती असोत, मग ते वाजपेयी असोत की अडवानी आणि मोदी असोत की शहा, यांना आव्हान देण्याची ताकद आहे. देशाचे रूपांतर "हिंदू राष्ट्रा'त करणे, हे योगी आणि त्यांच्या पाठीशी असलेले असंख्य तथाकथित साधकांचे ध्येय आहे आणि ते त्यांनी लपवूनही ठेवलेले नाही. त्यासाठीच त्यांनी 2007 मध्ये भाजप नेतृत्वाशी पंगा घेतला होता. बाविसाव्या वर्षी गोरखपूरच्या मठाची दीक्षा घेणारे हे योगी आता उत्तर प्रदेशाचे महंत बनल्यानंतर आपली पूर्वीची "लव्ह-जिहाद' तसेच, योगाभ्यास आणि शाहरूख खान यांबाबतची वादग्रस्त वक्‍तव्ये विसरून, मोदी यांची "सब का साथ, सब का विकास!' ही भाषा बोलू लागले आहेत. मात्र, त्यामुळेच त्यांची कोणती वक्‍तव्ये गांभीर्याने घ्यायची, असा प्रश्‍न अवघ्या देशाला पडला आहे. या "योगीं'वर खुनाच्या प्रयत्नांपासून, ते दंगली घडवण्यापर्यंत आणि जातीय तणाव निर्माण करण्यापर्यंत विविध आरोप आहेत. आता ते कधी मागे घेतले जातात, ते पाहावयाचे; कारण हेच आरोप त्यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील "अभिमानबिंदू' ठरले आहेत! 
उत्तर प्रदेशातील प्रचारात मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी घडवून आणलेला या "बिमारू' राज्याचा विकास हा कळीचा मुद्दा बनला होता आणि "विकासपुरुष' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मोदींपुढे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळेच बहुधा लखनौचे महापौर व उत्तम प्रशासक, अशी प्रतिमा असलेले दिनेश शर्मा, तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत उत्तम कामगिरी बजावणारे केशवप्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री करणे भाग पडलेले दिसते. या नियुक्‍त्यांना आणखी अनेक पदर आहेत. "भडक आणि आक्रस्ताळ्या' भाषणांबाबत प्रसिद्ध असलेले योगी हा आता भाजपचा चेहरा बनला आहे आणि सरकार चालवून विकासाची गंगा पुढे नेण्याचे काम हे शर्मा आणि मौर्य या जोडगोळीला करावयाचे आहे. शिवाय, या तिघांच्या हाती कारभाराची सूत्रे देऊन ठाकूर, ब्राह्मण व ओबीसी असा जातींचा समतोल साधण्याचाही प्रयत्न भाजपने केला आहे. "आदित्यनाथ यांच्या नियुक्‍तीचे सर्व समाजगटांनी स्वागत केले आहे,' असे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू सांगत आहेत. आता नायडू यांच्या या वक्‍तव्यात तथ्य आहे, हे सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी दस्तुरखुद्द योगींवरच आहे! त्याचबरोबर भाजप आणि संघपरिवाराच्या या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी अखिलेश यादव, मायावती, राहुल गांधी आणि अन्य नेते यांनाही प्रचाराच्या श्रमपरिहारात गुंतून न पडता हिरिरीने मैदानात उतरावे लागणार आहे. भाजपने आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करून स्वत:बरोबरच विरोधकांपुढेही मोठी आव्हाने उभी केली आहेत, यात शंका नाही. या आव्हानांना हे सारे कसे सामोरे जातात, यावरच देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com