राजकारणातील सवंगपणाचा प्रत्यय 

अनंत बागाईतकर 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन समजूतदारपणाने मार्ग काढता आला असता; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही. 

मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन समजूतदारपणाने मार्ग काढता आला असता; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही. 
भारतीय राजकारण दिवसेंदिवस सवंग-स्वस्त-हलके होत चालले आहे. एखाद्या संसदसदस्याचे दुर्दैवी निधन आणि त्यावर राजकारण होणे यासारखे दुसरे दुष्कृत्य असू शकत नाही. त्याचबरोबर अशा या गंभीर आणि दुःखद प्रसंगाची हाताळणी माणुसकीच्या भूमिकेतून करण्याची "क्षमता', देश चालविण्याची "क्षमता' असलेल्यांकडून दाखवली जाऊ शकत नाही, हातर दुर्दैवीपणाचा कळस आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशीच सदस्याचे निधन झाल्यास अर्थसंकल्प सादर करायचा की नाही, हा पेच सोडविणे सहजशक्‍य असते. फक्त काहीशी माणुसकी आणि समजूतदारपणा दाखवून यातून मार्ग काढता येऊ शकतो; परंतु पन्नास वर्षांची संसदीय कारकीर्द असलेले मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनानंतर झालेले प्रकार लाजिरवाणे होते. 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला प्रारंभ झाला. अकरा वाजता राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू झाले. या अभिभाषणाला अनेक सदस्य काहीसे उशिरा पोचत असतात. या दिवशी केरळमधील ज्येष्ठ सदस्य अहमद हे उशिरा पोचले होते. त्यामुळे ते मागे ठेवलेल्या खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर स्थानापन्न झाले होते. अभिभाषण जवळपास संपले होते आणि अचानक अहमद खुर्चीतून कोसळले. त्यामुळे काहीसा ओरडा व धावपळ झाली. पंतप्रधानांच्या ताफ्यात डॉक्‍टरही असतात ते अहमद यांच्याकडे धावले आणि त्यांनी त्यांना तपासले आणि स्वाभाविकपणे नाडी तपासणाऱ्या डॉक्‍टरच्या तोंडून निघून गेले, "ओह, ही इज नो मोअर!' तोपर्यंत स्ट्रेचर आणलेले होते आणि त्यावर त्यांना ठेवून तातडीने बाहेर नेण्यात आले. रुग्णवाहिकेत ठेवताना अधिकाऱ्यांनी सांगायला सुरवात केली की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. संसदेच्या जवळील लोहिया रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. अहमद यांची प्राणज्योत मालवल्याचे जवळपास निश्‍चित झाल्यानंतर साहजिकच दुसऱ्या दिवशी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या भवितव्याचा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला. अहमद यांच्या निधनाची घोषणा झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यावर संक्रात येईल काय, या भीतीने सरकारला ग्रासले आणि मग चक्रे फिरू झाली. 
रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह रुग्णालयात आले. त्यांनी तेथील प्रमुख व वरिष्ठ डॉक्‍टरांशी चर्चा केली. त्यानंतर अहमद यांना ट्रॉमा केअर विभागात हलविण्यात आले. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे व त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अहमद यांचे कुटुंबीय, नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्यांना कोणालाही आत अहमद यांच्याजवळ जाऊ देण्यास प्रतिबंध करण्यात आला. अहमद यांची कन्या स्वतः डॉक्‍टर आहे आणि दिल्लीत आल्यानंतर तिने वडिलांना जवळून पाहण्याची परवानगी मागितल्यावर तिलाही परवानगी नाकारण्यात आली. यानंतर त्या सर्वांच्या संयमाचा व रागाचा स्फोट झाला. तोपर्यंत काही नातेवाइकांनी कॉंग्रेसनेते अहमद पटेल यांना फोन केला. अहमद पटेल आणि पाठोपाठ ए. के. अँटनी आणि केरळचे खासदार रुग्णालयात जमू लागले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी हेही आले; परंतु डॉक्‍टरांनी सर्वांनाच मज्जाव केला होता. अखेर अहमद यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली आणि ती मात्रा लागू पडली. पोलिसांत लेखी तक्रार झाली की मग शवविच्छेदनाची वेळ येणार आणि सर्वच भांडे फुटण्याचा धोका दिसू लागल्यावर अहमद यांच्या डॉक्‍टर कन्येला त्यांच्या खोलीत सोडण्यात आले. त्यांना सर्व परिस्थिती लगेच कळाली. अहमद यांची प्राणज्योत कधीच मालवली होती. त्यांच्यापैकीच एकाने संतापून सांगितले, "व्हेंटिलेटर हे एक नाटक होते. चक्क एखाद्या मृत व्यक्तीला प्राणवायू देण्यासारखा हा प्रकार होता!' 
पहाटे अडीच वाजता अहमद यांचे निधन झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. वास्तविक, ते आदल्या दिवशी दुपारीच निवर्तले होते, म्हणजेच जवळपास बारा तासांनंतर घोषणा करण्यात आली. यानंतर अर्थसंकल्प सादर करणे पुढे ढकलावे, अशी मागणी होणे स्वाभाविक होते. कारण नियमानुसार विद्यमान सदस्याचे निधन झालेले असेल, तर ते ज्या सभागृहाचे सदस्य असतील त्या सभागृहाचे कामकाज शोकप्रस्ताव मांडून दिवसभरासाठी तहकूब केले जाते. अहमद हे संसदेत आपले कर्तव्य पार पाडत असतानाच निधन पावले होते. त्यामुळे अर्थसंकल्प एक दिवस पुढे ढकलावा आणि एक फेब्रुवारीला सुटी दिली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली. सरकारने ती अमान्य केली. अर्थसंकल्प ही घटनात्मक बाब आहे आणि त्यात कायदेशीर व तांत्रिक अडचणी आहेत, असा सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. त्यात अंशतः तथ्य होते. कारण अर्थसंकल्पाची कागदपत्रे व दस्तावेज विशिष्ट तारखेने छापलेले असतात आणि त्यात बदल झाल्यास त्यात तांत्रिक अडचण येऊन त्याच्या वैधतेबद्दलही प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलणे अवघड होते, हे सरकारचे म्हणणे ग्राह्य होते आणि पटणारेही होते. 
यात सवंगपणा कोणता झाला? सरकारला एक फेब्रुवारीचा मुहूर्त गाठायचा होता, कारण अर्थसंकल्पाची तारीख प्रथमच अलीकडे आणण्यात आली होती; तसेच रेल्वे अर्थसंकल्पाचे अस्तित्व केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आले होते. त्यामुळेच हा ऐतिहासिक बदलाचा दिवस सरकारला चुकवायचा नव्हता; तसेच संसद नियमाप्रमाणेच काही परंपरा, संकेत, पूर्वप्रथा यांच्या आधारे चालत असते. यापूर्वीदेखील असे प्रसंग दोनदा घडले होते आणि त्या वेळी सदस्यांचे निधन होऊनही अर्थसंकल्प सादर करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. ता. 31 ऑगस्ट 1974 रोजी तत्कालीन राज्यमंत्री एम. बी. राणा यांचे अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशीच निधन झाले होते आणि त्या वेळचे लोकसभा अध्यक्ष गुरदयालसिंग धिल्लन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास परवानगी दिली होती. त्यापूर्वी 19 एप्रिल 1954 रोजी रेल्वे अर्थसंकल्पाच्या दिवशीच जुजहरपाल सोरेन या सदस्याचे निधन झाले; पण तेव्हाही अर्थसंकल्पाचे सादरीकरण रोखण्यात आले नव्हते. येथे प्रश्‍न अर्थसंकल्प सादर करायचा की नाही, यापेक्षा त्यासाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधून त्यांना विश्‍वासात घेण्याची बाब असते; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "आज वसंतपंचमीचा शुभमुहूर्त असून वसंत ऋतू हा नव्या आशेची किरणे घेऊन येत असतो आणि मी सर्वांना या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा देतो,' असे म्हणून भाषणाला सुरवात केली. अहमद यांचे अचानक झालेले निधन आणि त्याबद्दल एका वाक्‍यात शोक व्यक्त करून भाषणाला सुरवात करणे अधिक समयोचित ठरले असते आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून आला असता. ते घडले नाही. भारतीय राजकारणात आता निकोप प्रतिस्पर्धेची जागा शत्रुत्व, टोकाचा विद्वेष यांनी घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे. लोकशाही भावनेला नख लावणारी ही बाब आहे! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial anant bagaitkar writes about political suffix