संरक्षणसज्जतेचा नवा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या आणि सर्वाधिक मारकक्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याने देशाच्या संरक्षणसज्जतेने नवा टप्पा गाठला आहे. या चाचणीमुळे पाच हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या पाच देशांच्या यादीत भारताने स्थान मिळविले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञांची ही कामगिरी संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. या क्षेपणास्त्राची ही चौथी आणि अंतिम चाचणीही यशस्वी झाल्याने पुढील चाचण्यांकरिता ते आता ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’कडे पाठविण्यात येईल.

अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या आणि सर्वाधिक मारकक्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याने देशाच्या संरक्षणसज्जतेने नवा टप्पा गाठला आहे. या चाचणीमुळे पाच हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या पाच देशांच्या यादीत भारताने स्थान मिळविले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञांची ही कामगिरी संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. या क्षेपणास्त्राची ही चौथी आणि अंतिम चाचणीही यशस्वी झाल्याने पुढील चाचण्यांकरिता ते आता ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’कडे पाठविण्यात येईल. प्रत्यक्ष वापरापूर्वीच्या तेथील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर संरक्षण दलामंध्ये ते समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा होईल. या चाचणीतील सर्व उद्दिष्टे अपेक्षनुसार पूर्ण झाली आणि त्यातून स्वदेशी तंत्रज्ञान व क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली, हे अधिक गौरवास्पद आहे. जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करता येणाऱ्या आणि दीड हजार किलोची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची चाचणी फिरत्या प्रक्षेपकाद्वारे करण्याची ही दुसरी वेळ होती. फिरत्या प्रक्षेपकामुळे हे क्षेपणास्त्र कोठूनही, प्रसंगी एखाद्या शहरातील वाहतूक थांबवून रस्त्यावरूनही शत्रूवर डागता येईल. केवळ काही मिनिटांत त्याची यंत्रणा कार्यान्वित करता येणार असल्याने प्रत्युत्तर देण्यासाठी शत्रूला वेळ मिळू शकणार नाही, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 

‘अग्नी-५’च्या चाचणीमुळे अण्वस्त्र प्रतिरोधन (न्यूक्‍लिअर डिटरन्स) क्षमता बळकट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे. आपल्याकडे अण्वस्त्रे असली, तरी त्यांचा प्रथम वापर न करण्याचे बंधन भारताने स्वतःहून घालून घेतले आहे. अण्वस्त्रधारी असला, तरी भारत हा जबाबदार देश आहे, हे भारताने आपल्या धोरणातून आणि कृतीतून दाखवून दिले आहे.

‘अग्नी-५’च्या टप्प्यात संपूर्ण चीन येत असला, तरी प्रामुख्याने याचा उपयोग शेजारी देशांना धाक निर्माण करण्यासाठीच आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. प्रत्यक्ष वापर करण्याची वेळ येऊ न देता शत्रूला आपल्या सामर्थ्याची जरब वाटणे अधिक महत्त्वाचे असते आणि ‘अग्नी-५’च्या चाचणीतून ते साध्य झाले आहे, असे म्हणता येईल.

Web Title: editorial artical