कुशल आणि व्यासंगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

न्यायालयात आणि सार्वजनिक व्यवहारातही अगदी मोजके बोलणारा; पण दोस्तांच्या मैफलीत दिलखुलास वावरणारा माणूस म्हणून ॲड. रोहित देव यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांची महाधिवक्तापदी नियुक्ती झाली आहे.

व्यासंग आणि कष्टातील सातत्य हे त्यांचे गुण. ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांच्यानंतर कट्टर विदर्भवादी ॲड. श्रीहरी अणे यांनी महाधिवक्तेपद सांभाळले होते. परंतु, या वर्षाच्या प्रारंभीच्या काळात वेगळ्या विदर्भाच्या प्रश्‍नावर रण माजले आणि त्या गदारोळात त्यांना पद सोडावे लागले.

त्यानंतर नऊ महिन्यांहून अधिक काळ हे पद रिक्तच होते. आता नागपूरच्याच ॲड. रोहित देव यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहयोगी महाधिवक्ता म्हणून त्यांच्याकडेच महाधिवक्तापदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तत्पूर्वी केंद्र सरकारचे प्रमुख वकील म्हणून (असिस्टंट सॉलिसिटर जनरल) त्यांनी काम पाहिले होते. कोर्टकचेरीत अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो तो ड्राफ्टिंगचा. रोहित देव यांचे ड्राफ्टिंगचे कसब अद्‌भुत आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना भाजपची सत्ता असलेली नागपूर महापालिका बरखास्त करण्यात आली होती. त्या सरकारी निर्णयाला आव्हान देऊन तो कोर्टातून रद्द करून घेण्यापर्यंत साऱ्या प्रक्रियेत रोहित देवांचा सिंहाचा वाटा होता. बरखास्तीला कारण ठरलेल्या नंदलाल समितीला त्यांनी दिलेले सडेतोड उत्तर हा न्यायालयीन इतिहासातला मैलाचा दगड आहे. ही कारवाई म्हणजे नुसता फार्स आहे, असे सांगत न्यायालयाने सरकारचा तो निर्णय रद्द केला होता. नागपूरचे महापौर राहिलेले महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात ॲड. देव त्या काळातच आले. त्यांचा विश्वास संपादन केला. राज्यपालांचे निर्देश पाळणे शासनाला बंधनकारक ठरवणारी न्यायालयीन लढाई तत्कालीन विरोधकांच्या वतीने रोहित देवांनीच लढली होती. विदर्भ साहित्य संघाचे सर्वेसर्वा मनोहर म्हैसाळकर यांचे ते जामात. त्यांचे बंधू शिरीष देव एअर मार्शल आहेत. सुशिक्षित व संस्कारी कुटुंबातून आलेले रोहित देव यांना मराठा आरक्षण, डान्स बारसह अनेक गुंतागुंतीच्या विषयांमध्ये सरकारची बाजू मांडावी लागणार आहे. अनेक मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, नव्या शासकीय धोरण-निर्णयांच्या संदर्भातील कोर्टकचेरी हे सारे सांभाळतानाच फडणवीस सरकारची प्रतिमा चांगली राखणे, हेच त्यांच्यापुढचे सर्वांत मोठे आव्हान असेल.

Web Title: editorial artical