अम्मांनंतर चिन्नम्मा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली असली, तरी द्रविड परंपरेत वाढलेल्या या पक्षाची धुरा कोण सांभाळणार, हे गूढ आता जयललिता यांच्या ‘सखी’ची भूमिका प्रदीर्घ काळापासून निष्ठेने पार पाडणाऱ्या शशिकला नटराजन यांची नियुक्‍ती पक्षाच्या सरचिटणीसपदी झाल्यामुळे संपुष्टात आले आहे. आता पक्षपरंपरेनुसार त्यांना निवडणूक लढवून आपल्या सरचिटणीसपदावर जनमान्यतेची मोहोर उमटवून घेणे बाकी असले, तरी त्यांच्यापुढे असलेले खरे आव्हान वेगळेच आहे. जयललिता यांच्या निधनानंतर, त्याबाबत संशय व्यक्‍त करणारी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली असली, तरी द्रविड परंपरेत वाढलेल्या या पक्षाची धुरा कोण सांभाळणार, हे गूढ आता जयललिता यांच्या ‘सखी’ची भूमिका प्रदीर्घ काळापासून निष्ठेने पार पाडणाऱ्या शशिकला नटराजन यांची नियुक्‍ती पक्षाच्या सरचिटणीसपदी झाल्यामुळे संपुष्टात आले आहे. आता पक्षपरंपरेनुसार त्यांना निवडणूक लढवून आपल्या सरचिटणीसपदावर जनमान्यतेची मोहोर उमटवून घेणे बाकी असले, तरी त्यांच्यापुढे असलेले खरे आव्हान वेगळेच आहे. जयललिता यांच्या निधनानंतर, त्याबाबत संशय व्यक्‍त करणारी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शशिकला यांच्या सरचिटणीसपदी झालेल्या नियुक्‍तीनंतर काही तासांतच न्यायालयाने त्याबाबत तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठीच जबाबदारी आली आहे; कारण जयललिता यांच्या प्रदीर्घ काळच्या रुग्णालयातील वास्तव्यात शशिकला याच त्यांच्यासोबत होत्या.

तमिळनाडूच्या राजकारणातील शशिकला हे एक गूढ व्यक्‍तिमत्त्व आहे. त्यांच्या नियुक्‍तीची घोषणा करताना पनीरसेल्वम यांनी ‘शशिकला यांनी पक्षासाठी केलेले भरीव कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली असल्याचे’ सांगितले खरे! मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. १९७६ मध्ये शशिकला यांची जयललिता यांच्याशी पहिली भेट झाली, तेव्हा त्या अवघ्या २० वर्षांच्या होत्या. ही भेट जन्मजन्मांतरीची ठरली आणि त्यामुळे दोघींच्याही जीवनाला वेगळे वळण लागले. तेव्हा शशिकला या व्हिडिओ रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत होत्या आणि त्यांनी त्यामुळेच जयललिता यांची भाषणे चित्रित करायला सुरवात केली. १९८७ मध्ये जयललिता यांचे ‘राजकीय गुरू’ एम. जी. रामचंद्रन यांचे निधन झाले, तेव्हा त्यांना पक्षाची सूत्रे हाती घ्यायला लावण्यात ज्या कोणी पुढाकार घेतला, त्यात शशिकला होत्या आणि त्यानंतर त्या जयललितांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेल्या. करुणानिधी सरकारने शशिकला यांना तुरुंगातही धाडले होते. पुढे शशिकला सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे वृत्त आल्यानंतर अत्यंत नाट्यपूर्णरीत्या जयललिता यांनी त्यांना आपल्या घरातून बाहेरही काढले होते. मात्र, पुढे त्यांची पुन्हा मैत्री झाली आणि तेव्हापासून अखेरपर्यंत त्या जयललिता यांच्या ‘सखी’ म्हणून काम करत होत्या. आता त्या कसे काम करतात, यावरच त्यांचे व पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: editorial artical