दांभिकांचा ‘आडोसा’

दांभिकांचा ‘आडोसा’

बंगळूरमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री जल्लोष करताना गर्दीचा फायदा घेत काहींनी तेथे जमलेल्या तरुणींचा विनयभंग केला, त्यांच्याविषयी अश्‍लील शेरेबाजी केली. ही घटना जेवढी संतापजनक होती, तेवढाच त्यावरील सरकारी प्रतिसादही चीड आणणारा होता. या शहरातील एम. जी. रोड व ब्रिगेड रोडवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईची गर्दी होते. त्यामुळेच काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जवळजवळ पंधराशे पोलिस तैनात करण्यात आले होते. असे असूनही हे घृणास्पद प्रकार घडले आहेत. वारंवार असे प्रकार का घडतात आणि ते रोखण्यात शासन-प्रशासन आणि समाजाला अपयश का येते, याचे उत्तर शोधायला हवे. कर्नाटकाचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी या सगळ्याची कारणमीमांसा अगदी सहजपणे करून टाकली. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे असे प्रकार घडतात, असा निष्कर्ष काढून ते मोकळे झाले. बंगळूरच्या घटनेमुळे कोणाला संताप अनावर झाला असेल, तर त्यांनी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या नावाने खडे फोडावेत; उगीच सरकारला जबाबदार धरू नये अथवा इथल्या समाजातले दोष शोधण्याच्या भानगडीत पडू नये, असाच या प्रतिक्रियेचा सरळ अर्थ आहे.

केवळ एका मंत्र्याची प्रतिक्रिया म्हणून सोडून देण्यासारखी ही बाब नाही, याचे कारण असे, की हाच दृष्टिकोन अनेकांच्या मनात अगदी ठाण मांडून बसलेला आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना स्त्रियांना जे भोगावे लागते, ते त्यांच्याविषयी आदर निर्माण न केल्याने. त्यांनाही व्यक्ती म्हणून समान प्रतिष्ठा आहे, हे मनात न बिंबल्याने. काही मुलींचे तोकडे कपडे आणि त्यांनी रात्री घराबाहेर पडणे याच गोष्टी अनिष्ट प्रकारांना जबाबदार आहेत, असे मानले जाते. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही बंगळूरमधील प्रकाराबद्दल पाश्‍चात्त्य संस्कृतीवर दुगाण्या झाडल्या. 

या सर्वांनाच पाश्‍चात्त्य संस्कृती म्हणजे नेमके काय, असे विचारले तर सांगता येईल काय? मूळ प्रश्‍नाचे गांभीर्य कमी करण्याचा, स्वतःवरील जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न आहे. पाश्‍चात्त्य संस्कृती नावाचा आडोसा त्यासाठीच शोधला जातो. अर्थात त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार? एकूणच प्रश्‍नाचे गांभीर्य कमी लेखण्याचा हा प्रकार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com