अटीतटीची लढाई!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवे वर्ष ठरल्याप्रमाणेच निवडणुकांचा हंगाम सोबत घेऊन आले असून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, तसेच गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्‍तांनी जाहीर केल्या. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत एकाच दिवशी मतदान होणार असून, मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. या पाच राज्यांपैकी सर्वांचेच लक्ष असलेल्या उत्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात सात टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे.

नवे वर्ष ठरल्याप्रमाणेच निवडणुकांचा हंगाम सोबत घेऊन आले असून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, तसेच गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्‍तांनी जाहीर केल्या. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत एकाच दिवशी मतदान होणार असून, मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. या पाच राज्यांपैकी सर्वांचेच लक्ष असलेल्या उत्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात सात टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. पंजाब आणि गोव्यात चार फेब्रुवारीस होणाऱ्या मतदानाने ही प्रक्रिया सुरू होत असून, उत्तर प्रदेशात आठ मार्चला अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यावर यावर पडलेला पडदा हा ११ मार्च रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी उघडला जाईल. मात्र, संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन नेमके याच काळात सुरू होणार असल्यामुळे निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांचे नेते गुंतून पडणार आहेत. त्यामुळे, या अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनाचे काय होते, हे संपूर्ण हिवाळी अधिवेशन पाण्यात बुडून गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर बघणे ही कुतूहलाची बाब ठरणार आहे. 

पुढच्या तीन महिन्यांत या पाच राज्यांत निवडणुका होत असल्या, तरी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा याच निवडणुका अधिक लक्षवेधी असतील. उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात सुरू असलेल्या ‘दंगली’च्या पार्श्‍वभूमीवर तेथील सत्ता काबीज करण्यास भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. मात्र, भाजपला अद्याप त्या राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्‍चित करता आलेला नाही, त्यामुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यावरच प्रचाराची धुरा आहे. पंजाबात अकाली दल- भाजप यांना आम आदमी पक्ष, तसेच काँग्रेस यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोव्याच्या छावणीत पडलेल्या फुटीमुळे आता गोवा जिंकून दाखवण्याचे मोठे आव्हान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापुढे आहे. हे सारे बडे मंत्री प्रचारात गुंतून पडणार असल्यामुळेच संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचे काय होणार, हा प्रश्‍न अधिक ठळकपणे समोर आला आहे. मात्र, खरे आव्हान हे अर्थातच काँग्रेसपुढे आहे आणि ते पेलण्यासाठी सुटीवर गेलेले राहुल गांधी भारतात परतल्यावरच खऱ्या अर्थाने खणाखणी सुरू होईल, यात शंका नाही!

Web Title: editorial artical