ही कसली ‘आभासी’ सुरक्षा?

ही कसली ‘आभासी’ सुरक्षा?

माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगामुळे पुण्याचा औद्योगिक चेहेरामोहरा आमूलाग्र पालटला, त्यामुळे या क्षेत्रातील शिक्षणाच्या सुविधांसाठी जसे हे शहर नावाजले जाते, त्याचप्रमाणे रोजगारसंधींसाठीही ते ओळखले जाऊ लागले. अनेक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे थाटली. नोकरीसाठी येणारा तरुणवर्ग अर्थातच महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येतो. चांगल्या पायाभूत सुविधा हे या विकासाचे एक कारण आहेच; परंतु तेवढेच नाही. उद्योगवाढीसाठी ज्या किमान स्थैर्याची, चांगल्या कायदा-सुव्यवस्थेची आवश्‍यकता असते, त्याचाही ही वाढ होण्यात महत्त्वाचा वाटा आहे; पण अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे ती प्रतिमाच झाकोळली जात आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. 

हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अंतरा दास या तरुणीचा अलीकडेच खून झाला. त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यानंतर महिनाभरात आणखी एका तरुणीचा कार्यालयात काम करीत असतानाच खून झाल्याने खळबळ उडणे स्वाभाविक आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. अंतरा ही पश्‍चिम बंगालची, तर रसिला राजू ही केरळची. त्या दोघींच्या खुनामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे. रसिला ही नेमून दिलेले काम पूर्ण करण्यासाठी रविवारीही कामावर आली होती. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर तेथे रक्षक होता, कार्यालयात प्रवेश करण्यासाठी स्वाइप कार्डची व्यवस्था अस्तित्वात होती. तिच्या कक्षात नव्हे; पण बाहेर सीसीटीव्ही यंत्रणा होती.

बंगळूरमधील कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर काम करीत असल्याने त्यांच्याशी ऑनलाइन संपर्कही होता.  हे सगळे असूनही अशा घटना घडत असतील तर सुरक्षा व्यवस्थेचा अधिक व्यापक विचार व्हायला हवा.

तांत्रिकदृष्ट्या सर्व गोष्टी असूनही ‘सामाजिक सुरक्षे’चा अभाव असेल, तर बाकी सर्व गोष्टी कशा निष्फळ ठरतात, याचा धडा देणारी ही घटना आहे. ही सामाजिक सुरक्षा कशातून येते? बरोबर काम करणाऱ्या एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद, मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन या गोष्टी त्यात महत्त्वाच्या आहेत. महिलांविषयीच्या आदराच्या भावनेचा अभाव हा एक सामाजिक विकारही अनेक घटनांमधून ठळकपणे जाणवतो आहे. त्यातूनच स्त्रियांना हिंसेचे, अत्याचारांचे लक्ष्य केले जाते, त्यामुळे सुरक्षारक्षक ‘इन’...पण सुरक्षाच ‘आउट’ अशी उफराटी स्थिती निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com