अनोळखी हात

- मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 9 मार्च 2017

ऊन तापू लागलं आहे. झाडांची पानगळ सुरू झाली आहे. दाट सावलीची कृपा अंथरणारी हिरवी पानं झाडावर घोर तपश्‍चरण करता करता त्यागमूर्तीचं भगवेपण घेतात; आणि अलगद गळून जातात. झाडाच्या तळाशी त्यांच्या समर्पणाचा आणि तपपूर्तीचा पूर्णयज्ञ साकारतो. पानगळ म्हणजे झाडांचं शुद्धीकरण. जीर्ण वस्त्र बदलून नवं वस्त्र पांघरावं, तसं. अशी पर्णहीन झाडं एरवी दिसत नाहीत. झाडांच्या छोट्या-मोठ्या फांद्या, त्यांच्या आजूबाजूनं वळसे घेत गेलेले नाजूकशा फांद्यांचे लक्षावधी कृशतनू आकार. त्यांनी गुंफलेल्या रेषाकृतींतून आकाशाच्या निळाईवर रेखाटलेल्या चित्रलिपी.

फांद्यांपैकी काहींनी हातांत हात गुंफलेले; तर काहींनी वेगवेगळे मार्ग शोधलेले. वर्षभर पर्णसंभाराचं पाचूवैभव खुलविणारे, फुलांचं सौंदर्य उधळणारे आणि फलभाराचं कृतार्थ वैभव अलंकारांसारखं मिरविणारे झाडांचे लक्षावधी हात. पानगळीचा ऋतू वृक्षवेलींचे हे दातृत्वसंपन्न हात आपल्याला किती सहजपणानं दाखवितो. दातृत्वाचा, संपूर्ण समर्पणाचा एवढा निर्मळ-पारदर्शी संस्कार इतरत्र पाहायला मिळत नाही. दान करताना दात्याचा हात वर असतो; आणि दान स्वीकारणारा हात खाली असतो. झाडांचं दान मात्र यापेक्षा वेगळं असतं. झाडांचे देणारे हात खालून वर उंचावलेले असतात.

पानं, फुलं किंवा फळं अर्पण करण्यासाठी, दानासाठी त्यांनी हातांत घेतलेली असतात. आपण ती खुडून घेतो, उचलून घेतो. म्हणजे दान स्वीकारणारा आपला हात वर असतो. या कृतीतून झाडं मोठा संस्कार करीत असतात. दात्यानं नम्र असावं; आणि जो दान स्वीकारणारा असतो, त्याचा सन्मान करावा. त्याला उन्नत स्थान द्यावं. झाडांचे ‘देणारे हात’ एरवी पानांच्या दाटीत अदृश्‍य असतात. ‘दिलेलं दान या हाताचं त्या हातालाही कळू नये’ असं म्हटलं जातं. झाडांचं दातृत्व या प्रकारचं असतं. कधीही उघड न होणारं. केवळ कर्मयोगी. निरपेक्ष. 

निसर्गानं प्रत्येकाचेच हात असे संस्कारसमृद्ध केलेले असतात. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’पासून आपला दिवस सुरू होतो. हातांच्या बोटांच्या अग्रांवर पंचमहाभूतांचं स्थान असतं. अनेक योगिक क्रियांत किंवा योगमुद्रांत या अग्रस्थानांवर दाब देण्याचं तंत्र वापरलं जातं. चराचर सृष्टीतही त्यांचाच अंश असतो. अनेक कृतींत बोटं एकत्र येतात; आणि या संघभावनेनंच कार्यसिद्धी होते. प्रार्थनेत बोटं जुळविली जातात. अन्नग्रहण करतानाही घासाघासाशी ती जोडलेली असतात. भोजनाला यज्ञकर्म म्हटले आहे. त्यात आहुती देताना प्रत्येक घासाला पंचमहाभूतांचा पवित्र स्पर्श झालेला असतो.

अंगठ्याखेरीजची हाताची चारही बोटं प्रत्येकी तीन ठिकाणी वळतात. अंगठा दोन ठिकाणी वळतो. आपली पाचही बोटं अशा चौदा ठिकाणी वळतात; आणि करमूलस्थानी असलेले मनगटही एका ठिकाणी वळते. ही पंधरा ठिकाणं पंधरवड्याच्या तिथींची निदर्शक आहेत. दोन्ही हातांवर शुक्‍ल-कृष्ण पक्षांच्या तिथी एकत्रित येऊन एक महिना पूर्ण होतो. हातांनी असं महिनोन्‌महिने कार्यरत राहावं, हा तर उद्देश त्यामागं नसेल?
आपलाच हात आपल्याला किती अनोळखी आहे, नाही?

Web Title: editorial artical