दर्जा जयजयकार...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

प्रगती साधण्यासाठी गुणवत्ता नि कौशल्य तर लागतेच; परंतु पुढे जाण्याची जिद्दही आवश्‍यक असते. व्यक्तीप्रमाणेच संस्थेच्या बाबतीतही हे लागू पडते. केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने देशभरातील विद्यापीठांची राष्ट्रीय क्रमवारी लावण्याचा उपक्रम केला, त्यामागे शिक्षण क्षेत्रात तसे वातावरण निर्माण करण्याचा हेतू असू शकतो. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम दर्जा निर्माण करणे आणि त्यात सातत्य राखणे, हे एक महत्त्वाचे आव्हान. त्यासाठी वातावरणनिर्मिती करणे हा त्या दिशेने जाण्याचा एक प्रयत्न म्हणता येईल. 

एकूण क्रमवारी पाहता पारंपरिक विद्यापीठे आयआयटीसारख्या संस्थांच्या तुलनेत मागे असल्याचे दिसते. या विद्यापीठांनी आपला शैक्षणिक-संस्थात्मक दर्जा वाढविण्यासाठी जोराने प्रयत्न करायला हवेत, यात शंका नाही. मात्र कोणतीही क्रमवारी ठरविताना त्याचे निकष पायाशुद्ध असणे ही पूर्वअट असते. आयआयटीसारख्या संस्थांमध्ये मुळात प्रज्ञावंतांनाच प्रवेश मिळतो. या संस्थांना उपलब्ध करून दिला जाणारा निधी, अद्ययावत पायाभूत सुविधा व इतर सामग्री; तसेच उच्च दर्जाचे अध्यापक मंडळ या सगळ्या गोष्टी असतात. अशा परिस्थितीत विविध संशोधनपर प्रकाशने, विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी आणि त्यांचे वेतनाचे प्रमाण, संस्थेची प्रतिमा असे मापदंड जर लावले, तर त्या संस्था बाजी मारणार, हे उघड आहे. त्यामुळेच निकष किंवा मापदंड ठरविताना ते अधिकाधिक सर्वसमावेशक कसे करता येतील, याचा प्रयत्न करायला हवा. 
जागतिक क्रमवारीत आपल्याकडची विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था झळकत नाहीत, याचे वैषम्य नेहमीच व्यक्त होते. परंतु तसे होण्याचे एक कारण म्हणजे तशा प्रकारच्या स्पर्धेची, दर्जासाठी सर्वशक्तिनिशी धडपडण्याची संस्कृती आपल्याकडे विकसित झालेली नाही. राष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीच्या उपक्रमामुळे तशी संस्कृती निर्माण होण्यास मदत होईल. उद्दिष्टे स्पष्ट झाल्याने त्या दिशेने प्रयत्नही करता येतील. यानिमित्ताने पारंपरिक विद्यापीठांमध्ये चांगल्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा करताना या विद्यापीठांनी चांगल्या प्राध्यापकांचे आदानप्रदान केले, तर अध्यापन प्रक्रियेत फरक पडू शकेल.आयआयटीसारख्या संस्थांनी केवळ मानांकन घेऊन थांबून न राहता आपल्याबरोबरीने अन्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी देखील साह्य नि मार्गदर्शन केले पाहिजे. अशा देवघेवीतूनही बरेच काही साध्य होऊ शकेल.

Web Title: editorial artical