चांदण्याचा रस्ता

चांदण्याचा रस्ता

आपल्या अवतीभवतीच्या स्थित्यंतराचा वेग किती अफाट! अन्‌ त्याच्याशी जुळवून घेतानाची आपली होणारी दमछाक किती असहाय? पण तरीही आपण या स्थित्यंतराशी जुळवून घेण्याची धडपड करतो. निदान तशी स्वतःच्या मनाची समजूत तरी घालतो. हे सर्व आपण कशाच्या भरवशावर करतो? काही चांगले-वाईट अनुभव आपल्या गाठीशी असतात. कधीतरी भोवताली अंधार दाटून आलेला आहे, असं वाटतानाच एकदम मन आनंदानं भरून जातं. हे असं का वाटतं हे कळत नसलं तरी मन उजळून जातं. आता काही तरी चांगलं घडणार आहे, असं वाटतं. ते नेमकं काय घडणार आहे हे कळत नाही; पण ते चार-दोन दिवस आनंदात जातात. सभोवतालच्या प्रचंड कोलाहलात हरवून न जाता कधी-कधी असे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळणं, याचं गुपित आपल्या बालपणात तर लपलेलं नसेल? अन्यथा वयाच्या आठ ते चौदा याच वर्षांतील अनुभव ‘लंपन’च्या माध्यमातून मांडण्याचा अट्टहास प्रकाश नारायण संत यांनी आयुष्यभर का केला असता?
चार-दोन वर्षांपूर्वी प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित (सुधा प्रकाश संत) यांचे दोघांच्या सहजीवनाचा धांडोळा घेणारे आत्मकथन ‘अमलताश’ आले. ‘वनवास’, ‘शारदासंगीत’, ‘पंखा’, ‘झुंबर’ यातील ‘लंपन’सोबतची ‘सुमी’च हा सगळा प्रवास कथन करते, तेव्हा आपली उत्सुकता चाळवली जाते. इतकं आनंदी अन्‌ निरागस बालपण ज्या प्रकाश संतांनी टिपलं, त्यास मराठी साहित्यात तर तोड नाही. तेव्हा त्यांच्या आयुष्यात काही संकटांचे, दुःखाचे, मन दुखविणारे प्रसंग आले असतील काय? तर हे आत्मकथन वाचून कळते. हे सर्व प्रसंग त्यांच्याही वाट्यास आले आहेत. पण त्यासोबतच त्यांनी जीवनातली निरागसता सुंदर पद्धतीने कशी टिपली याचेही उत्तर मिळते. आयुष्य चांगलं - वाईट कसं असेल तसं घ्यावं. दुःखाकडं शांतपणे बघता यायला हवं आणि कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणं सामोरं जावं, हे ज्यांच्या जीवनाचं सूत्र राहिलं; तोच माणूस इतकं निरागस लिहू शकतो.

१९६० च्या सुमारास प्रकाश संत यांची पहिली कथा ‘वनवास’ प्रसिद्ध झाली. मधल्या तीस वर्षांत त्यांनी काहीच का लिहिले नाही, अन्‌ एकदम १९९० नंतरच ‘चांदण्याचा रस्ता’ या कथेपासून त्यांचे लेखन का बहरले याचेही काहीसे उत्तर ‘अमलताश’मधून मिळते. जुलै १९९० च्या कालखंडात त्यांनी ‘चांदण्याचा रस्ता’ ही कथा लिहिली. त्या काळाविषयी लेखिका म्हणते, ‘‘सध्या आम्ही आमच्या आयुष्यातील अत्यंत आनंदमय काळात आहोत, असं आम्हाला वाटत होतं. आमच्या मनात जे जे होतं, ते ते सर्व आम्हाला हवं होतं, त्यापेक्षाही चांगलं मिळालं हा विचार मन व्यापून होता.’’

अनेक लेखक अचानक थांबतात. मोठ्या कालखंडानंतर ते पुन्हा लिहू लागतात. ते लेखनही आधीच्या लेखनाइतकंच टवटवीत अन्‌ कसदार असतं. याचं कारण आयुष्यात काही गोष्टी योजिल्यासारख्या घडलेल्या असतात. हे योजिलेलं काय असतं अन्‌ घडलेलं काय असतं हे ज्याच्या त्याच्या मनात जिवंत असलेल्या चांदण्याच्या रस्त्यावर अवलंबून असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com