ज्याचं त्याचं आभाळ

शेषराव मोहिते
बुधवार, 3 मे 2017

प्रकाश होळकर या लासलगावच्या शेती करणाऱ्या कवीची ‘तुझं आभाळ मला दे। माझं आभाळ तुला घे।’ ही गाजलेली कविता. आज आपण सहज बोलून जातो, की आजचं खेड्यातील जीवन भयाण आहे, तर शहरात राहणारी माणसं स्वतःच्या सुखकारक संसारात रमलेली असतानाही म्हणतात, ‘छे! या जगण्यात काही राम नाही,’ तर ज्यांची मुलं-मुली परदेशात गेली, ती म्हणतात, ‘नुसता पैसा म्हणजेच सर्व काही आहे काय? डोक्‍यावरलं आभाळ आणि पायाखालची जमीन यापैकी काहीच आमचं नाही.’ कधी कधी वाटतं हे खरं वास्तव आहे काय?

घडीभरासाठी हे मान्य करू, की खरोखरच आजचं खेड्यातील जीवन भयाण आहे. आयुष्यभर खेड्यातच राहायचं, तर प्रामाणिकपणे शेतीत कष्ट करून सुखा-समाधानानं जगणे शक्‍य नाही. काहीतरी वेड्यावाकड्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय तुम्ही तिथे टिकूच शकत नाही. बाहेरील कुणाचं शोषण करणं शक्‍य नसेल, तर कुटुंबातीलच इतरांचं, त्यांच्या कष्टाचं शोषण करून जगावं लागतं. अन्‌ तेही शक्‍य नसते, तेव्हा काय घडू शकते हे कल्पनेवरच सोडून दिलेले बरे. पण मग खेड्यातील जीवन सुखावह कधी होते? आपण आठवायचा प्रयत्न करू, तसतसे आनंदाचे क्षण कमी अन्‌ वेदनादायक आठवणींचीच मनात गर्दी होते.

गावातून बाहेर जायला अन्‌ बाहेरून गावात यायला गाडीवाटा अन्‌ पाऊलवाटाशिवाय दुसऱ्या वाटा तेव्हा नसतात. एसटी बस पकडायची असेल, तर साताठ कि.मी. पायी चालत गेल्याशिवाय ती मिळण्याची सोय नसते. ज्या पाटीवर आपण जाऊन एसटीची वाट पहात तासनतास थांबत असू, तिथे जलद बस थांबत नसत. मग, केव्हा तरी मेंढरं कोंबावी, तशी माणसं कोंबलेली बस थांबली म्हणजे एका पायावर उभं राहून केलेला प्रवास आठवतो. तोदेखील खिशात पैसे असतील तेव्हाचा. अन्यथा तासनतास चालत मैलोन्‌मैल प्रवास तर पायीच केलेला असतो. 

आज गावापर्यंत झालेली चकचकीत डांबरी सडक अन्‌ त्या सडकेवरून रात्रंदिवस वाहणारी वाहने. ज्या गावात कधी काळी दोनच सायकली होत्या, त्या गावात शंभरावर मोटारसायकली आल्या अन्‌ धा-पाच तरी मोटारी आल्या. तरी गावं अस्वस्थ आहेत हे वास्तव आहे. पण म्हणून भोवतालच्या जगाशी संपर्कच नसलेलं, एकेकाळी सर्व सुखसोयीपासून वंचित असलेलं गाव सुखी समजणं शक्‍य आहे काय? आज सुखी जीवनाच्या शोधार्थ खेड्यातून काय, शहरातून काय किंवा देश सोडून परदेशात गेलेल्यांच्या बाबतीत काय जो झगडा चालू आहे, त्यात प्रत्येकजण उत्साहानं शिरू पाहतो आहे. आपलं जगणं आजच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ प्रतीचं अन्‌ समृद्ध व्हावं, यासाठी प्रत्येकजण धडपडत असेल, तर त्यात वावगं काय? यात कुणी कुणाचे हक्क हिरावून घेऊ नयेत; म्हणजे ही अस्वस्थतादेखील उद्या हितकारक ठरेल. आज जो तो आपलं आभाळ शोधतो आहे, ही प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे, एवढे खरे.

Web Title: editorial artical