चटका लावणारा अंत

चटका लावणारा अंत

खरे तर उली स्टेकचा मृत्यू २०१३ मध्येच होणार होता आणि तोही हिमालयाच्या कुशीतच. तेव्हा तो जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ख्यातकीर्त असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेवर होता. मदतनीस असलेल्या शेर्पांशी त्याचे भांडण झाले आणि ते त्याच्या जिवावर उठले. तेव्हा त्याने पळ काढला आणि तो वाचला; पण त्याला चिरनिद्रा यायची होती ती हिमालयाच्या कुशीतच. स्टेक म्हणजे ‘स्वीस मशिन’ या नावाने प्रसिद्ध असलेला गिर्यारोहक. वयाच्या आठव्या वर्षांपासूनच तो जगभरातील शिखरे पादाक्रांत करत होता आणि गेल्या रविवारी तो प्राणास मुकला तोही एव्हरेस्टच्या मोहिमेवर असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात...

शेर्पांबरोबरील वादानंतर तो परत हिमालयाच्या नादी लागणार नाही, असे वाटत असतानाच त्याने परत एव्हरेस्टचा ध्यास घेतला आणि तोही एका अनवट वाटेने. नेपाळमधील या मार्गावरून ‘एव्हरेस्ट’ फक्‍त एकदाच काबीज करण्यात आले होते. या मोहिमेवर जाण्यापूर्वी त्याने एका स्वीस वृत्तपत्राला सांगितले होते : ‘अपयशानंतर घरी परतण्यापेक्षा मी मृत्यूच पसंत करेन...’ वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी झालेल्या त्याच्या या अकस्मात मृत्यूने जगभरातील गिर्यारोहणप्रेमींवर दु:खाचे सावट पसरले आहे. यंदाच्या एव्हरेस्ट मोहिमेतील हा पहिला बळी आणि तोही स्टेकसारख्या विख्यात गिर्यारोहकाचा, ही मनाला चटका लावून जाणारीच बाब. आपल्या चार दशकांच्या आयुष्यात गिर्यारोहणाचे अनेक विक्रम नोंदवणाऱ्या स्टेकने २०१२ मध्ये सोबत प्राणवायू न घेता एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले होते. आल्प्स पर्वतराजीतील १३ हजार फुटांहून अधिक उंचीची ८२ शिखरे त्याने ६२ दिवसांत सर केली होती. २००७ मध्ये नेपाळमधील अन्नपूर्णा शिखरावर चढाई करताना तो दरीत कोसळला. मात्र, त्यामुळे त्याची जिद्द आणि उमेद कमी झाली नाही. २०१३ मध्ये त्याने पुनःश्‍च ‘हरी ॐ’ म्हणत अन्नपूर्णा मोहीम हाती घेतली आणि एकट्याने हे शिखर काबीज करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com