‘रन’रागिणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

भारतीय क्रिकेट हे नेहमीच पुरुषप्रधान राहिलेले आहे; परंतु महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनीही गुणवत्ता सिद्ध केली आहे.

भारतीय क्रिकेट हे नेहमीच पुरुषप्रधान राहिलेले आहे; परंतु महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनीही गुणवत्ता सिद्ध केली आहे.

महिला संघातील सलामीच्या जोडीने एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या उभारून अटकेपार झेंडा रोवला. तुलनेने या विक्रमाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही; परंतु सच्च्या क्रिकेटप्रेमींनी या रणरागिणींना निश्‍चितच सलाम केला असेल. दक्षिण आफ्रिकेतील एका चौरंगी क्रिकेट स्पर्धेत पूनम राऊत व दीप्ती शर्मा या दोघींनी सलामीला येऊन एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम केला. महिला क्रिकेटमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी ठरलीच; परंतु पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सलामीचाही विक्रम त्यांनी मोडला. काही दिवसांपूर्वी झुलन गोस्वामीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला. थोड्या दिवसांच्या अंतराने असे दोन जागतिक विक्रम होणे हा योगायोग नसून भारतीय महिलांच्या प्रामाणिक आणि अथक मेहनतीचे ते फळ आहे. 

महिला क्रिकेटला ‘आयसीसी’ने आणि ‘बीसीसीआय’नेही आपल्या छत्राखाली घेतले आहे. त्यांच्या आर्थिक मोबदल्यात काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे; पण तरीही समग्र विचार करता महिला क्रिकेट तसे दुर्लक्षितच आहे. झुलन गोस्वामीसारखी क्रिकेटपटू कोलकता शहरात सरावासाठी येण्याकरिता पहाटे पाच वाजता ट्रेन पकडायची. पूनमही अशाच परिस्थितीतून पुढे आलेली आहे. वडिलांच्या प्रोत्साहनाचे तिला पाठबळ मिळाले. सतत उन्हात राहिल्यामुळे आपल्या वर्णावर परिणाम होईल, असा विचार तिने केला नाही. एखाद्या मोठ्या स्पर्धेतले विजेतेपद असो किंवा अशी विक्रमी कामगिरी असो, यातून नव्या पिढीला प्रोत्साहन मिळत असते.

झुलन, पूनम, दीप्ती किंवा मिताली अशा खेळाडू नव्या पिढीचा आदर्श आहेत, कारण या खेळाडूही कोणाचा ना कोणाचा आदर्श ठेवून क्रिकेटमध्ये आल्या आहेत. एकदा का तुम्ही वरच्या श्रेणीचे क्रिकेट खेळू लागलात, की बऱ्यापैकी सुविधा मिळू शकतात; परंतु प्राथमिक क्रिकेट खेळत असतानाच अशा सुविधा मिळाल्या तर अनेक पूनम, दीप्ती किंवा झुलन तयार होतील. बॅट, बॉल किंवा साहित्यांच्या सुविधांच्या पुरतीच ही अपेक्षा मर्यादित नसून मैदानात स्वच्छतागृहासारख्या साध्या, मूलभूत सुविधा मिळणे आवश्‍यक आहे. तसे झाले तर पूनम-दीप्तीचा विक्रम सार्थकी लागेल.

Web Title: editorial artical