सांस्कृतिक दारिद्र्याची लक्षणे

- अतुल पेठे (नाट्य दिग्दर्शक, लेखक, अभिनेता )
शनिवार, 7 जानेवारी 2017

दारिद्य्र वेगवेगळ्या प्रकारची असतात. आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक! यातील ‘आर्थिक दारिद्य्र’ तर अगदी लगेच कळते. खायला अन्न नसते, कपडे नसतात आणि घरदाराचे वासे कोसळलेलेच असतात. ‘राजकीय दारिद्य्रा’चे वर्णन आजच्या काळात खरे तर करण्याचीच गरज नाही. आपले बहुतांश नेते जे बोलतात-वागतात, तसेच पक्षाची धोरणे आणि धारणा पाहिल्या की ते कळतेच. कुठल्याही पक्ष, संघटनांचे अग्रक्रम बघितले की तर त्वरितच राजकीय दारिद्य्र म्हणजे काय आहे ते समजते. ‘सामाजिक दारिद्य्र’ हे आपल्या नेहमीच्याच अनुभवाचे! कुठल्याही गावाच्या एसटी स्टॅंडवर उतरले की लगेच कळतेच की गावाची पत काय ते.

दारिद्य्र वेगवेगळ्या प्रकारची असतात. आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक! यातील ‘आर्थिक दारिद्य्र’ तर अगदी लगेच कळते. खायला अन्न नसते, कपडे नसतात आणि घरदाराचे वासे कोसळलेलेच असतात. ‘राजकीय दारिद्य्रा’चे वर्णन आजच्या काळात खरे तर करण्याचीच गरज नाही. आपले बहुतांश नेते जे बोलतात-वागतात, तसेच पक्षाची धोरणे आणि धारणा पाहिल्या की ते कळतेच. कुठल्याही पक्ष, संघटनांचे अग्रक्रम बघितले की तर त्वरितच राजकीय दारिद्य्र म्हणजे काय आहे ते समजते. ‘सामाजिक दारिद्य्र’ हे आपल्या नेहमीच्याच अनुभवाचे! कुठल्याही गावाच्या एसटी स्टॅंडवर उतरले की लगेच कळतेच की गावाची पत काय ते. आपली आजची बेफाम आणि बेमुर्वतखोर सुजलेली शहरे ही अशीच नमुना आहेत. आजच्या विकासकाळात स्त्रियांना ‘राइट टू पी’ अशी चळवळ उभी करावी लागते, हे कशाचे लक्षण? तर सामाजिक दारिद्य्राचे! आणि आता उरले ‘सांस्कृतिक दारिद्य्र!’ ‘लेखक मेला आहे’ असे पी. मुरुगनला, ‘चित्रकार मेला आहे’ असे पंढरपूरनिवासी भारतीय एम. एफ. हुसेनला आणि आता ‘नाटककार मेला आहे’ असे गडकरी मास्तरांना म्हणायला भाग पाडणे ही त्या सांस्कृतिक दारिद्य्राची उदाहरणे!

वर उल्लेखलेली सर्व दारिद्य्रे एकमेकांतूनच उद्‌भवलेली आहेत. कुठलेच प्रश्‍न सुटे नसतात. सध्या संस्कृती-संस्कृती असा उद्‌घोष सतत चालू असतो. तुतारी फुंकून, बिगुल वाजवून आणि ढोलताशे बडवून संस्कृतीचा झेंडा गरागरा फिरत असतो. मी मराठी - मी मराठी - मी मराठी असा घसा ‘ड्राय’ करत ‘वेस्ट’वर ओढण्या टाइट करत हिस्टॉरिकल फोर्टावर अस्मिता साँग गात असतात. मोटारसायकलवरून ऐतिहासिक पेहराव करून डोळ्यांवर गॉगल लावून मोठी झुंड निघते. अचानक शंखनाद ऐकू येऊ लागतात. फुंकणाऱ्याची फुफ्फुसं फाटायची वेळ येते. महाभारताचे युद्ध सुरू होतेय असेच वाटते. शत्रूवर चाल करून जाताना ओरडत, किंचाळत, उन्मादपूर्ण चित्कारत काळ्या मोटारीवर झेंडे लावून आणि नेत्यांची नावे ठणाणा ओरडत जाणारे मर्दगडी पाहिले की पानिपतची लढाई परत सुरू होणार असे वाटते. फ्लेक्‍स नावाचे प्रकरण किती असभ्य आणि असंस्कृतपणाचे वापरले जाऊ शकते, याची परिसीमा आपण पाहतो. त्यावरचे फोटो बघणे आणि भाषा वाचणे ही उद्‌ध्वस्त स्थिती आत्महत्या करायला उद्युक्तच करते.
आज भाषेचा बट्ट्याबोळ होऊन कमालीचे विसंवादीपण आलेले आहे.

जीवनात भाषा असेल, तर भाषेत जीवन असेल असे भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर म्हणत. त्यात मोठा अर्थ आहे. जीवन आणि भाषा या दोन्हींच्या ‘असण्या’तून संस्कृती उगवते. भूगर्भात जसा पाण्याचा साठा असतो, तसाच संस्कृतीच्या तळाशी भाषेचे संचित असते. जगण्यातले अनुभव हे कुठल्याही माध्यमातून अभिव्यक्त करायला सशक्त भाषेचाच आधार असतो. मुळात भाषाच नसेल, तर वरची उभी राहिलेली इमारत कच्चीच राहते. या कच्चेपणाचा अनुभव जीव व्याकूळ करून सोडतो आहे.

आज मराठी नाटकात काम करायला उत्सुक अनेक मुले-मुली भेटतात. काम करू लागताच हजारो दंश होऊ लागतात. कान कोणीतरी चावून खातेय, असा प्रत्यय येतो. बहुतांश लोक स्वभाषेत शिकलेले नसतात. ‘ना अरत्र ना परत्र’ अशी अवस्था. बोलता येत नाही आणि ऐकलेले कळत नाही. समजणे वगैरे तर दूरच. भाषेचा अर्थ लागणे आणि तो अर्थ उच्चारून दाखवणे कठीण झालेले आहे. स्वराला सूर आणि व्यंजनाला वजन असते. त्यातूनच शब्द तयार होतात. जाणवलेल्या अर्थाचा त्या शब्दांतून लखलखाट होतो. घनदाट, नाजूक, खडबडीत, नागमोडी हे नुसते शब्द नाहीत, तर अनुभूती असते. पण या सांस्कृतिक दारिद्य्रात कळावे कसे?

आता यावर उत्तर द्यायला हवे. कारण फक्त प्रश्‍न मांडून जबाबदारी संपत नाही. आपापल्या क्षेत्रात जबर निष्ठेने, गांभीर्याने आणि सखोल काम करायला हवे. जे लोक एकट्याने वा काही लोकांसह काम करू शकतात त्यांनी ते न खचता करत राहिले पाहिजे. स्वतःला आणि इतरांना घडवण्याची ताकद आपल्याला कमवावी लागेल. प्रत्येक क्षेत्रातील उत्तमोत्तम शिक्षकच सध्याच्या दारिद्र्याचे चित्र पालटू शकतील.

Web Title: editorial artical atul pethe