बुडख्यापासून शेंड्यापर्यंत...

सिसिलिया कार्व्हालो
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

आपल्या ‘स्व’मध्ये परिवर्तन वा बदल होणं म्हणजे नेमकं काय? हा बदल वरवरचा की आमूलाग्र? म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत किंवा मुळापासून अग्रापर्यंत? म्हणजे, ‘चला, आता अंतर्बाह्य सर्वत्र बदल करूया’ म्हटले म्हणजे बदल होतो? राजकन्या आणि मांजरीची कथा सर्वश्रुत आहे.

आपल्या ‘स्व’मध्ये परिवर्तन वा बदल होणं म्हणजे नेमकं काय? हा बदल वरवरचा की आमूलाग्र? म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत किंवा मुळापासून अग्रापर्यंत? म्हणजे, ‘चला, आता अंतर्बाह्य सर्वत्र बदल करूया’ म्हटले म्हणजे बदल होतो? राजकन्या आणि मांजरीची कथा सर्वश्रुत आहे.

राजमहालात थाटात वावरणाऱ्या राजकन्येला पाहून तेथील मांजरीला वाटले, आपणही राजकन्या होऊयात. मग मांजरीने देवाकडे करुणा भाकली. देवाने प्रसन्न होऊन मांजरीला वर दिला, की ‘तू राजकन्या होशील. तुझे निळे डोळे, मऊ केवळी लव, सारं अगदी राजकन्या होण्यास योग्य असंच आहे. तथापि, एक लक्षात ठेव, की तू आपली मूळ प्रवृत्ती बदलली पाहिजे. ती दाखवलीस तर तू पुन्हा मांजर होशील.’ मांजरीने मान डोलवली, आणि दुसऱ्याच क्षणी ती राजकन्या झाली.

दरबारातील राजकन्येला आपली मांजरी राजकन्या झालेली पाहून अतीव आनंद झाला आणि राजमहालात त्या सुखेनैव नांदू लागल्या. एके दिवशी दोघीजणी गप्पा मारत असताना, मांजर राजकन्येला कपाटाखाली उंदीर दिसला; तर ती कपाटाखाली डोकावून पाहू लागली. उंदीर दिसत नाही हे पाहून तिने कपाटाखाली शिरण्याचाही प्रयत्न केला. ते पाहून खऱ्या राजकन्येला विचित्र वाटले. काही दिवसांनी पाहुण्यांसोबत दिवाणखान्यात बसलेले असताना, पाहुण्यांना केशरदूध आणले गेले, तर मांजर राजकन्या जिभल्या चाटू लागली; नंतर तिने पेल्यावर झडप घातली; तर दूध सारे सांडून गेले... जमिनीवर पडलेले दूध ‘ती’ राजकन्या चाटून घेऊ लागली. खरी राजकन्या जाम भडकली. त्याचक्षणी तेथे देव प्रकट झाला. तिला तिच्या वराची आठवण करून दिली आणि त्याने घातलेल्या अटीचीही आठवण दिली. तत्क्षणी ती मांजर झाली. मानवाला परमेश्‍वराने वर दिला आहे....

‘खाली’ न बघण्याचा. म्हणजे मान खाली घालायला लावील अशी कृत्ये न करण्याचा. नीच, हीन कृत्ये न करण्याचा... आपली पाशवी प्रवृत्ती ‘वर’ न काढण्याचा. परंतु, आपण मानव झाल्याच्या आविर्भावात... सर्व जग जिंकल्याच्या आविर्भावात सिकंदरासारखे थाटात चालू लागतो... बारीक बारीक गोष्टी प्राप्त झाल्या, की आपण आपला ‘अहम’ फुगवतो... लालसा, हाव, हिंसात्मक वृत्ती, विवेकबुद्धीचा अभाव... या पशुप्रवृत्तीकडे आपण जातो. पशुप्रवृत्तीवर मात करीत आपण मानव झालेलो असतो. आपण पुनश्‍च पशुप्रवृत्तीकडे जातो.. आपण खाली बघतो... त्याचवेळी आपण आपल्याला मिळालेला ‘वर’ गमावतो आणि आपल्यावर अनर्थ ओढवतो.
आपले व्यक्तिमत्त्व दिसण्यापेक्षा ‘असण्यावर’ अधिक आहे. ‘असणे’ हे आपले मूळ... म्हणजेच ‘बुडखा’ आणि दिसणं हा आपला ‘शेंडा’. बुडख्यापासून शेंड्यापर्यंत सर्वत्र बदल करण्याची प्रक्रिया आणि किमया फक्त नि फक्त संस्कारांनी परिपूर्ण होत असते.

Web Title: editorial artical cecilia carvalho

टॅग्स