माणूसपणाची जाणीव

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिसचे एक वचन असे आहे, life unexamined is not worth living. जे जीवन किंवा आयुष्य तपासून पाहिले जात नाही, त्याची चिकित्सा केली जात नाही, ते जगण्याच्या लायकीचे नाही, असा त्याचा अर्थ. जीवनाचा अर्थ काय? उद्देश काय? त्यात काय मिळवायचे असते? ते कसे जगावे? असे सगळे प्रश्‍न सर्वसामान्य माणसापासून तत्त्वज्ञांपर्यंत सर्वांनाच पडत असतात. जो तो आपल्यापरीने त्याची उत्तरेही देत असतो. आपल्या लोकप्रिय हिंदी- मराठी गाण्यांमध्येही जीवनावरची भरपूर भाष्ये, रुपके वापरून मांडलेली दिसतात. ‘जिंदगी’ कधी ‘एक सफर’ असते, तर कधी ‘एक पहेली’!

प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिसचे एक वचन असे आहे, life unexamined is not worth living. जे जीवन किंवा आयुष्य तपासून पाहिले जात नाही, त्याची चिकित्सा केली जात नाही, ते जगण्याच्या लायकीचे नाही, असा त्याचा अर्थ. जीवनाचा अर्थ काय? उद्देश काय? त्यात काय मिळवायचे असते? ते कसे जगावे? असे सगळे प्रश्‍न सर्वसामान्य माणसापासून तत्त्वज्ञांपर्यंत सर्वांनाच पडत असतात. जो तो आपल्यापरीने त्याची उत्तरेही देत असतो. आपल्या लोकप्रिय हिंदी- मराठी गाण्यांमध्येही जीवनावरची भरपूर भाष्ये, रुपके वापरून मांडलेली दिसतात. ‘जिंदगी’ कधी ‘एक सफर’ असते, तर कधी ‘एक पहेली’! कधी कधी तर ‘आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे’ होऊन जाते. ही वेगवेगळी उत्तरे तपासून बघत, आपल्या अनुभवांशी त्यांची सांगड घालत, त्यातले योग्य उत्तर कोणते हे शोधावे लागते. 

एका अगदी मूलभूत अर्थाने बघितले, तर जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमध्ये जे काही घडते ते जीवन! हे जीवन तर सर्वच सजीव जगतात. तसे पाहिले तर निर्माण होणे- नष्ट होणे ही प्रक्रिया तर निर्जीवांच्या बाबतीतही होत असते; पण त्याला जन्म-मृत्यू असे संबोधले जात नाही. सजीव-निर्जीव यामधल्या फरकांच्या वैज्ञानिक ऊहापोहात न पडताही आपल्याला असे म्हणता येते, की सजीवांना त्यांच्या अस्तित्वाचे, त्यांच्या गरजांचे एक प्रकारचे भान किंवा जाणीव असते, जी निर्जीवांना असत नाही. ही जाणीव जेवढी प्रगत, तेवढा जीव प्रगत!

माणसाची जी जाणीव असते, ती मुळातच फार वैशिष्ट्यपूर्ण असते. आपल्याला काय हवे आहे, काय होते आहे, काय वाटते आहे, आपण काय करतो आहोत, याची जाणीव तर माणसाला असतेच; पण आपल्या या जाणिवेची जाणीवही त्याला असते. उदाहरणार्थ- आपल्याला भूक लागली आहे याची जाणीव असलेली व्यक्ती महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असेल, तर जाणिवेच्या दुसऱ्या पातळीवर मीटिंग संपेपर्यंत खाता येणार नाही, असे स्वतःला बजावू शकते. म्हणजेच जाणिवेच्या दुसऱ्या स्तरामुळे माणूस जैविक प्रेरणा, वासना, इच्छा यांच्या पार जाऊन कृती करू शकतो, किंबहुना आपल्या कृती ‘जाणीवपूर्वक’ घडवू शकतो. खरे तर माणसाचे माणूसपण किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे व्यक्तित्व घडते, ते अशा जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे.

माणसाची ही वैशिष्ट्यपूर्ण जाणीवच त्याला एका बाजूने पशू होण्यापासून रोखते, तर दुसऱ्या बाजूने यंत्र होण्यापासून वाचवते. ही जाणीव म्हणजे जणू माणसाला मिळालेली  अद्भुत क्षमता आहे. अशी क्षमता, जिच्यामुळे माणूस काही करतो, त्या ‘क्रिया’ न ठरता ‘कृती’ ठरतात. माणूस असणे म्हणजे आपण जे काही करतोय, ते का, कसे, कशासाठी हे तपासत जगणे. जगण्यात क्षणोक्षणी हे तपासणे शक्‍य नाही, हे मान्यच आहे. पण जेव्हा शक्‍य असेल, तेव्हा तरी आपण ‘आपुलाची वाद आपणाशी’ घातला नाही, तर आपले जगणे माणसाने जगण्याच्या योग्यतेचे नसेल.

Web Title: editorial artical dipti gangawane