गरजेपुरते ज्ञान की ज्ञानाची गरज?

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 5 मे 2017

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. आज आपण ज्याला विज्ञान म्हणून ओळखतो त्याची पायाभरणी बहुतांशी अशा गरजेपोटी लावलेल्या शोधांमधून झाली. आजही विज्ञानाच्या विकासाची प्रेरणा अनेक वेळा गरज भागवण्याचीच असते. इंटरनेटच्या मोहजालात गुरफटून गेलेल्या अनेकांना हे माहीत नसते, की त्याचा शोध सामरिक म्हणजे युद्धासंबंधी गरजांमधून लागलेला आहे. या सदरात आपण पूर्वी हे पाहिलेच आहे की माणसाच्या गरजा अनेक पातळ्यांवरच्या आणि गुंतागुंतीच्या असतात.

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. आज आपण ज्याला विज्ञान म्हणून ओळखतो त्याची पायाभरणी बहुतांशी अशा गरजेपोटी लावलेल्या शोधांमधून झाली. आजही विज्ञानाच्या विकासाची प्रेरणा अनेक वेळा गरज भागवण्याचीच असते. इंटरनेटच्या मोहजालात गुरफटून गेलेल्या अनेकांना हे माहीत नसते, की त्याचा शोध सामरिक म्हणजे युद्धासंबंधी गरजांमधून लागलेला आहे. या सदरात आपण पूर्वी हे पाहिलेच आहे की माणसाच्या गरजा अनेक पातळ्यांवरच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळेच एका अर्थी ज्ञान-विज्ञानाची निर्मिती जरी इतर प्राण्यांप्रमाणे जगण्याच्या टिकून राहण्याच्या अथवा धडपडीतून झाली असली, तरी ज्या प्रकारची झेप मनुष्यप्राण्याच्या ज्ञानाने आज घेतली आहे, त्यासाठी बळ त्याला फक्त जैविक प्रेरणांमधून मिळालेले नाही. संपूर्ण जगाच्या स्वरूपाबद्दलचे माणसाला असलेले कुतूहल हे त्यापलीकडचे आहे. आपल्या भवतालविषयीची निखळ उत्सुकता हा मानवी स्वभावाचा महत्त्वाचा पैलू आहे. या उत्सुकतेमुळेच सृष्टीबद्दल अधिकाधिक ज्ञान मिळविण्याची माणसाची भूक कायम राहते.

आजच्या माणसाच्या जगण्यात असलेले वेगवेगळे ताण, त्यामुळे निर्माण होणारी भीती आणि असुरक्षिततेची भावना आणि त्यापोटी जास्तीत जास्त मिळवण्याचा, साठवण्याचा हव्यास या सगळ्यांमुळे आजचा समाज ज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगावर गरजेपेक्षा जास्त भर देतो. ज्या ज्ञानामुळे आपले भौतिक जीवन आणखी आरामदायक होईल, सुरक्षित होईल त्याला प्रोत्साहन देतो. ज्ञानाची परिणती जीवनमान सुधारत राहण्यात व्हावी, ही अपेक्षा करणे अजिबात चुकीचे नाही; पण या अपेक्षेचे रूपांतर जर ज्ञानाचे मूल्य फक्त व्यवहारांच्या म्हणजे खरे तर फक्त पैशाच्या तागडीत तोलण्याच्या प्रवृत्तीत होत असेल, काहीतरी चुकतेय हे निश्‍चित आणि ही चूक शोधण्याची, सुधारण्याची जबाबदारीही आपलीच!

‘नही ज्ञानेन सदृशम्‌ पवित्रम् इह विद्यते’, असे सांगणारी भारतीय संस्कृती असो, वा ‘ज्ञानासाठी ज्ञान’ मिळवण्याची धडपड करणारी प्राचीन पाश्‍चात्त्य परंपरा, या दोन्हींनी ज्ञानाची महती त्याच्या फक्त भौतिक, व्यावहारिक उपयोगासाठी गायली नाही. ज्ञानाचे स्वरूप, त्याची उद्दिष्टे, त्यामागच्या प्रेरणा यांबद्दल त्यांना एक वेगळे भान होते. हे भान आज हरवत चालले आहे. ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान यांनी कल्पनेच्या सुखसोयी निर्माण केल्या आहेत. भविष्यातही तशा केल्या जातील; पण ‘मनुष्य प्राण्याला योग्य’ असे जीवन जगण्यासाठी तेवढे पुरेसे आहे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान आणि चांगले जीवन यांचा संबंध कसा असतो? चांगले जीवन म्हणजे काय’ या आणि अशा इतर प्रश्‍नांकडे वळणे हे मानवी संस्कृतीच्या या वळणावर आपल्यासाठी फार ‘गरजेचे’ आहे.

Web Title: editorial artical dipti gangawane