मराठी साहित्यातील बोलीप्रबलता

- डॉ. केशव देशमुख (मराठीचे प्राध्यापक)
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

जी बोली विशाल समाजात वावरणाऱ्या लोकांच्या जिभेवर आहे, त्या बोलींचे संशोधन विद्यापीठ संशोधनातही गाभास्थानी यायला हवे. तसेच समाजात व शैक्षणिक संस्थांमध्ये साहित्य, समाज व बोली यासंदर्भात दीर्घस्वरूपाचे आणि टिकणारे काम होण्याची गरज आहे.
 

जी बोली विशाल समाजात वावरणाऱ्या लोकांच्या जिभेवर आहे, त्या बोलींचे संशोधन विद्यापीठ संशोधनातही गाभास्थानी यायला हवे. तसेच समाजात व शैक्षणिक संस्थांमध्ये साहित्य, समाज व बोली यासंदर्भात दीर्घस्वरूपाचे आणि टिकणारे काम होण्याची गरज आहे.
 

आजचे मराठी साहित्य कसे आहे? अथवा ग्रामीण म्हणविल्या जाणाऱ्या सांप्रत साहित्याचे अंतरंग कसे असे पाहिले तर बोली अग्रस्थानी ठेवून मराठीत मुबलक आणि सशक्त कविता, कथा, कादंबरी, आत्मकथा लिहिली जाते आहे. पूर्वीही अशाप्रकारे लेखन होत असे. पण नजरेसमोरच्या या दीड-दोन दशकांत मराठी साहित्याची प्रतिमा बोलीप्रबल अशी अधिक होत चालली हे लक्षात येते.

प्रांतवार विचार केला तरी कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, आदिवासीबहुल विविध भूभाग येथे होत असलेली मराठी साहित्यनिर्मिती गुणवत्ता म्हणून जशी वेगळी, जिवंत, श्रेष्ठ ठरू लागली, तद्वतच अभ्यासक्रमांची व संशोधनाची एक मोठी दौलत म्हणूनही विद्यार्थी, लेखक व अभ्यासक हे बोलीप्रबल अशा या साहित्याकडे बघू लागले आहेत. शिवाय, बोलीनिष्ठ शब्दकोशांकडे दरम्यानच्या काळात मराठीतील अनेक चिंतकांनी विशेष लक्ष दिलेले आढळून येते. डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. द. ता. भोसले, डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. राजन गवस, डॉ. किसन पाटील, इरगोंडा पाटील अशी नामवंतांची नावे आठवतात, ज्यांनी ग्रामविश्‍वात रूजून असलेल्या बोलीमधील शब्दसौंदर्याचे उल्लेखनीय कार्य केल्याचे आढळून येते. आमच्या समीक्षेचा बोलीबद्दल चर्चा करण्याचा दृष्टिकोन पूर्वी फार समाधानकारक नव्हता. पण कालपरत्वे त्यात आज पुष्कळ पालट झालेला दिसून येतो. जी बोली एका विशाल समाजात वावरणाऱ्या सर्व लोकांच्या जिभेवर आहे; आणि जी बोली या लोकांसाठी अन्न-पाण्यासमान आहे, त्या बोलींचे संशोधन मुळात विद्यापीठ संशोधनातसुद्धा गाभास्थानी यायला हवे; पण ती सुरवात अजून पुरती झालेली दिसत नाही. या अशा प्रश्‍नाचाही विचार आपण करायला हवा.

लोकवाङ्‌मय, गाणी किंवा ग्रामीण, दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिस्ती आणि अजून वेगवेगळ्या प्रवाहांचे साहित्य बहुतेक विद्यापीठांमध्ये स्नातक, स्नातकोत्तर भाषा विषयांत अभ्यासक्रमाचा भाग बनलेले आहे.

परंतु, त्यासंबंधीची मतमतांतरे, प्रश्‍नोत्तरे होताना ती बोलीतून करायला जणू बंदी आहे. शहाणा माणूस गावाकडच्या भाषेत बोलू लागला, की त्याची खिल्ली उडविण्याची आपली ज्ञानपरंपरेची सवय अजून बदललेली नाही. प्रमाण बोलणे स्वागतार्हच आहे व असते. पण त्यासाठी आग्रह किंवा हट्ट कशासाठी? याबद्दलही जरा अधिक विचार व्हावा असे वाटते. नागराज मंजुळे, राजकुमार तांगडे या आजच्या लक्षणीय जबाबदारीने नाटक-सिनेमांत उतरलेल्या तरुण लेखकांनी प्रदेश व बोली, घटना व व्यक्ती, संवाद व प्रसंग, भाषा व परिणाम आणि आमची माती-आमची माणसं या न्यायाने जे कार्य हाती घेतले आहे ते उल्लेखनीय आहे. हे विविध लेखक सामान्य माणसे, त्यांचे प्रदेश व त्यांच्या बोली यांना व्यवस्थित सांभाळून आहेत.

शिवाय, परिवर्तनवादी भूमिका यामुळेही त्यांची दिशा आणि त्यांचा उषःकाल एव्हाना स्पष्ट झालेला आहे. त्यांच्या साहित्यातील बोलीप्रवणता व बोलीप्रबलता दुर्लक्ष करता येत नाही.

मराठी साहित्याचे सध्या अवलोकन केले तरी हे लीलया लक्षात येईल, की बोलीप्रबलतेमुळे साहित्याची प्रभावशीलता जशी वाढली, तशीच या साहित्याची जिवंतपणाची श्रेणीही अधिक वर गेलेली दिसून येते. भुजंग मेश्रामांची कविता किंवा सदानंद देशमुख, अजय कांडर यांचे समग्र लेखन किंवा अशोक कोळींची कादंबरी आणि उषाकिरण आत्राम, गणेश भाकरे, कल्पना दुधाळ, इंगोले, विठ्ठल वाघ, बालाजी इंगळे, रमेश पवार अशा आज लिहिणाऱ्या कितीतरी कवी- कवयित्रींचे काव्य वाङ्‌मय हे अनुभव, प्रांत, बोली यामुळे कमालीचे प्रभावी व अभ्यासनीय ठरते. या दिशांनी प्रभाव सिद्ध करणाऱ्या अजून कितीतरी लेखकांचा यथार्थ नामोल्लेख करणे शक्‍य आहे.

एक प्रांत घेतला आणि तेथील बोलीभाषक यांची गिनती केली, तरी तो आकडा लाखांचे आकडे पार करणारा असतो; हे मात्र लक्षात घेतले जात नाही. चित्र असे असताना बोलीअभ्यास मात्र त्याप्रमाणात अजिबात होत नाही. हा अभ्यास वाढायला हवा. यासंदर्भात विदर्भात विशेषतः नागपूरमध्ये नागेश चौधरी, बबन नाखले यांनी लोकभाषा चळवळीच्या संबंधाने हाती घेतलेले संशोधनकार्य लक्षणीय आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी लोकभाषा विशेषांक निर्माण केला. या महत्त्वपूर्ण विशेषांकात लोकभाषेला केंद्रवर्ती ठेवून डॉ. मधुकर वाकोडे, अनिल सदगोपाल, जैमिनी कडू, श्रीपाद भालचंद्र जोशी, विमल कीर्ती आणि इतर पंधरा अभ्यासकांनी लोकभाषेच्या संदर्भात घडवलेली चर्चा अत्यंत मौलिक मानायला हवी. 

समाजात व शैक्षणिक संस्थांमध्ये साहित्य, समाज व बोली यासंदर्भात दीर्घस्वरूपाचे आणि टिकणारे काम झाले पाहिजे. त्यासाठी बोलीप्रबल साहित्यनिर्मिती करत असलेल्या सर्वहारा लेखकांनीही शैक्षणिक संस्थांना वाङ्‌मयसाह्य करायला हवे. विषयचौकट घेऊन संशोधन थांबले पाहिजे. परीक्षेत होणाऱ्या कॉपीपद्धतीचे संशोधन व्हायला नको. केवळ एकतर्फी, केवळ नावीन्य नसलेले आणि बोलींकडे दुर्लक्ष देऊ पाहणारे संशोधन विद्यापीठांचा एकवेळ सन्मान राखील, पण समाजाला अव्हेरेल ! समाजाला घेऊन चालणारी आमची शिक्षणाची केंद्रे असतील, तर समाजाच्या भाषेचा विचारही संशोधनाच्या अग्रभागी यायला हवा.

Web Title: editorial artical dr. keshav deshmukh