प्रचारात प्रभावी ठरू शकेल पासष्टावी कला

प्रचारात प्रभावी ठरू शकेल पासष्टावी कला

वास्तवतेचे भान, जनतेवर प्रभाव असणाऱ्या घटना व प्रत्येक माध्यमाची विशिष्ट ताकद यांचा योग्य वापर करून राजकीय पक्षांनी प्रचारासाठी वस्तुनिष्ठ जाहिराती केल्या तर त्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकतील. त्यातून जाहिरात या माध्यमाची उपयुक्तता निश्‍चितपणे वाढू शकते.
 

Half of the money I spend on advertising is wasted, but the trouble is I dont know which half. जॉन वनमकेर या प्रसिद्ध उद्योगपतींचे हे विधान जाहिरात या क्षेत्राच्या व्यामिश्रतेवर आणि अनिश्‍चित परिणामांवर चांगला प्रकाश टाकते. जाहिरातीचा नेमका उपयोग किती होतो हे गूढ असले तरी जाहिरात हे क्षेत्र आज सर्वव्यापी झाल्याचे आपण पाहात आहोत. मुख्यतः वस्तू, सेवा विक्रीसाठी याचा वापर होत असला, तरी गेल्या ३०-३५ वर्षांत राजकारण, निवडणूक या क्षेत्रातही त्यांनी मोठी मुसंडी मारल्याचे दिसते. भारतीय राजकारणात निवडणुकीच्या निमित्ताने व्यावसायिक जाहिरातींचा मोठ्या प्रमाणात वापर १९८४ मध्ये काँग्रेसने केला आणि त्या वर्षी तो पक्ष प्रचंड बहुमताने निवडून आला. अर्थात, त्याला इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेची किनार होती. पण, यानिमित्ताने राजकीय क्षेत्रात जाहिरात या घटकाचा वाजतगाजत प्रवेश झाला हे नक्की.

केवळ जाहिरातींमुळे निवडणूक जिंकता येते या गृहीतकाला २००४ च्या ‘शायनिंग इंडिया’ या भाजप सरकारच्या जाहिरात मोहिमेने तडा दिला आणि २००९ मध्ये सत्तारूढ काँग्रेसच्या ‘जय हो’ या मोहिमेने भाजपच्या ‘भय हो’ या नकारात्मक जाहिरातींना चितपट करून सत्तेचा सोपान पुन्हा एकदा गाठला. २०१४ मध्ये ‘अब की बार मोदी सरकार’ या जाहिरात मालिकेने नकारात्मक दृष्टिकोनाऐवजी सकारात्मक मांडणी केली, तेव्हा किमया घडली. जाहिरातींची मोहिनी काय असते याचा रोकडा प्रत्यय मतदारांना अनुभवता आला आणि आता तर नवमाध्यमांच्या प्रचंड विस्तारामुळे जाहिरात हा भारतीय निवडणुकीच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू झाला आहे की काय, अशी परिस्थिती आहे. निवडणुका जाहीर झाल्याचा दिवस आणि प्रत्यक्ष मतदान यातील कालावधी मर्यादित असल्यामुळे जाहिरात मोहिमेचे अचूक नियोजन करणे ही तारेवरची कसरत ठरते. त्यातूनच मग त्याच त्याच प्रकारच्या, कल्पकता नसलेल्या जाहिराती, त्यांची पुनरावृत्ती असे प्रकार पाहायला मिळतात.

मुळात मतदार हे बहुतकरून आपल्या विचारसरणीनुसार, परंपरेनुसार, पूर्वसंस्कारानुसार मतदान करणारे असतात असा इतिहास आहे. पण, गेल्या काही वर्षांत नवमतदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे आणि तरुण मतदार हा या सत्तेच्या सारीपाटात महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्यामुळे जाहिरात, प्रसिद्धी, समारंभांना अनन्यसाधारण महत्त्व येत आहे, त्यामुळेच मतदारांची मानसिकता ओळखणे हे महत्त्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तर काही मतांच्या फरकाने निवडणुकीचा कौल बदलण्याच्या शक्‍यतेमुळे कुंपणावरचे आणि विचारपूर्वक मतदान करणारे तरुण यांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर, बॅनर, माहितीपत्रके याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, पर्यटनयात्रा अशा उपक्रमांची संख्या वाढताना दिसते. हे निवडणुकीसाठी आहे याचे पुरेसे भान मतदारांना असल्यामुळे अशा उपक्रमांचे प्रत्यक्ष मतांत रूपांतर होण्यास खूप मर्यादा येतात.

रेडिओ, टीव्ही, फेसबुक पेज, व्हॉट्‌सॲप, वाहिन्यांवरील सशुल्क मुलाखती, एसएमएस, बल्क मेसेज या अनेकविध माध्यमांतून मतदारराजाला हे उमेदवार दिवसरात्र वेढताना दिसतात; पण यात अभावानेच सुसूत्रता दिसते. नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार अपेक्षित प्रतिसादाला कशा प्रकारे सामोरे जायचे हे ठरवावे लागते; जेणेकरून आपली विकासदृष्टी आणि जनकल्याणाचे उद्दिष्ट लोकांसमोर स्पष्ट होईल. एकदा जाहिरात दिली, माहितीपत्रक वाटले की आपले काम संपले, ही मानसिकता बदलायला हवी. येणारा प्रतिसाद, सूचना, तक्रारी यांचा नेमका कानोसा घेणारे इंद्रिय विकसित होणे गरजेचे आहे. तसे झाले की जाहिरात मोहीम फत्ते होण्याची शक्‍यता वाढते.

जाहिरात हे एक शास्त्र आहे आणि त्याचा वापर करताना काही संकेत, काही पथ्ये पाळावी लागतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचे सातत्य यावर भर द्यावा लागतो. जाहिरात ही नकळतपणे मतदारांच्या मनःपटलावर आरूढ व्हायला हवी. तीही स्वयंभू नसते. त्यासाठी उमेदवाराचे काम, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, चारित्र्य, उपलब्धता, संवेदनशीलता या गोष्टीही कळीच्या ठरतात. जाहिरातीत केलेले दावे आणि वस्तुस्थिती यांत मोठी तफावत आढळली, तर मात्र त्या निष्प्रभ होऊ शकतात.

समाजमाध्यमातून जाहिराती करताना अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण तेथील मतदार मनमोकळा, व्यक्त होण्यास उत्सुक असलेला आणि अवास्तव दावे खोडण्यात तरबेज असतो. त्यामुळे केवळ समारंभांची दृश्‍ये, सेलिब्रिटींबरोबरची छायाचित्रे एवढ्यावर प्रचार होऊ शकत नाही. हे परस्परसंवादी माध्यम असल्यामुळे कार्यक्षम आणि प्रश्न समजून घेऊ शकणाऱ्या उमेदवाराला याचा चांगला फायदा घेता येतो. तत्परता आणिसमस्या सोडवण्याचे ठोस उपाय असणाऱ्यांना हे माध्यम वरदायी ठरू शकते; पण त्यासाठी पूर्वतयारी आणि स्वाध्याय अपेक्षित आहे, अन्यथा अयोग्य वापराचे अपश्रेय मात्र जाहिरात क्षेत्राच्या माथी मारले जाते.

तरुणांनी मतदान करावे यासाठी आर्ची-परशा यांचा ‘ब्रॅंड ॲम्बॅसेडर’ म्हणून वापर करून राज्य निवडणूक आयोगाने चित्रपटांची जनमानसावरील मोहिनी आणि जाहिरात यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

वास्तवतेचे भान, सद्य सामाजिक - सांस्कृतिक स्थिती, जनमानसावर प्रभाव असणाऱ्या घटना, प्रत्येक माध्यमाची विशिष्ट ताकद यांचा सुयोग्य वापर करून राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ जाहिरात केली, माध्यमांची निवड काटेकोरपणे केली, त्यानुसार आर्थिक तरतूद केली आणि मुख्यतः जाहिरातीतील दावे आणि वास्तव यांतील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला, तर जाहिरातींचा खर्च आणि त्याची अपेक्षित फलनिष्पत्ती यात चांगला मेळ साधला जाऊ शकतो. त्यामुळे जाहिरात या माध्यमाची उपयुक्तता निश्‍चितच वाढू शकते. नियोजनबद्ध मोहीम आखली तर जाहिरात क्षेत्राची प्रतिष्ठा टिकेल आणि राजकीय पक्षांचीही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com