हवा नकार स्वीकारण्याचा संस्कार

हवा नकार स्वीकारण्याचा संस्कार

आज लहानातलं लहान मूलसुुद्धा काही हवं असेल तर आई- वडिलांवर दबाव आणतं. त्यानं रडणं किंवा हात-पाय आपटणं सुरू केलं, की आपण प्रेमाच्या नावाखाली किंवा डोक्‍याला त्रास नको म्हणून तरी त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो. हे करत असताना आपण हेही विसरून जातो, की पुढे जग त्याच्यासाठी असं ‘इन्स्टंट’ किंवा झटपट काहीच देणार नाहीये. मग त्या वेळी आपल्या इच्छा पूर्ण न झाल्यास कसं वागावं हे त्याला कसं कळणार याची काळजी आई-वडील करीत नाहीत. आपणही केवळ त्या वेळचं आपलं टेन्शन लगेच कसं कमी होईल एवढ्यापुरताच विचार करतो. 

पुढे हीच मुलं मोठमोठ्या मागण्या घेऊन येतात आणि त्या लगेच पूर्ण होणार नसतील, तर पालकांना वेठीला धरतात. नंतर हीच मुले कुठल्यातरी मुलीने ‘नाही’ म्हटलं म्हणून हाताची नस कापून घेतात आणि अभ्यास न केल्यामुळं गुण कमी पडून ॲडमिशन मिळाली नाही, तर ‘पुढच्या वेळी मी मन लावून अभ्यास करतो,’ असं न म्हणता, भरपूर डोनेशन देऊन पालकांनी ॲडमिशन मिळवून द्यावी म्हणून दबाव आणतात. 

‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’ म्हणजे ‘मनात येताच इच्छेची पूर्ती होणे’ हा नवीन पिढीतील एक भयावह रोग आहे. लहान वयात दारू, सिगारेट आणि प्रेमसंबंध हे याच रोगाचे एक रूप आहे. आपल्या मनात भरलेली मुलगी मिळायलाच हवी हे आणखीनच भयावह रूप आहे आणि तसे न झाल्यास ‘माझी इच्छा अशी कशी पूर्ण करत नाही’ म्हणत बळजबरी करणे, शारीरिक इजा पोचवणे, पैसे नाही म्हणून चोरी करणे, एका मुलाला सोडल्यानंतर एखाद्या मुलीने लगेच दुसऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवणे आदी गोष्टी त्या भयानक रोगाचा किमान बिंदू आहेत. 

लहान वयातच अवाजवी इच्छांना आवर घालायला मुलांना शिकवणं हे पालकांचं सर्वप्रथम कर्तव्य आहे; पण उलट पालक स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन मुलांना खूष करण्यात गुंतले आहेत, त्यामुळे मुलाचं पुढचं आयुष्य वैफल्यानं ग्रासलेलं असेल याची जाणीव होण्यास आज आपण असमर्थ का आहोत? 

दरवेळी जीवनावश्‍यक वस्तू सोडून मुलाने हट्ट धरला, तर ‘तुला हवी असलेली वस्तू तेव्हाच मिळेल जेव्हा तू ती कमावशील,’ इतकं म्हणण्याची हिंमत आपल्यात नाही काय? (लहान असेल तर अभ्यासात नेहमीपेक्षा थोडेतरी जास्त मार्क मिळवून किंवा वागण्यात सुधारणा करून आणि मोठा असेल तर घरातील जबाबदारीत हातभार लावून किंवा पार्टटाइम काम करून)
संयम शिकणं हे पदवी घेण्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. थोडा वेळ काढून, मुलांच्या दबावाला बळी न पडता आपल्या लाडक्‍यांना थोडा संयम म्हणजे ‘डिलेड ग्रॅटिफिक्‍शन’ शिकवायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com