आयुष्याची सहल

आयुष्याची सहल

तुम्ही कधी कुठल्याही निसर्गरम्य स्थळी सहलीला गेला आहात काय? कधी तरी नक्कीच गेला असाल. त्या स्थळापर्यंत पोहोचण्याची वाट आठवते? निसर्गातील कुठलंही रम्य स्थळ असो, ते अगदी रस्त्यालगत कधीच नसते आणि म्हणूनच कदाचित त्यांचं सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहतं. अशा सुंदर स्थानाकडे जाण्याची वाट कच्ची, धुळीनं माखलेली, दगड-धोंड्यांनी भरलेली आणि कधी कधी दुर्गमही असू शकते. त्यामुळे कधी पाय घसरतो, तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी रोपट्यांमुळे हाताला खरचटतेही. अशा रस्त्यावरून वाटचाल करतानाचे तुमचे विचार आठवतात? माझ्या अनुभवाप्रमाणे त्या वेळी घर, सावली, थंड पाणी... स्वतःची गाडी असेल तर ती, हे सगळं आठवत असतं. काही व्यक्ती जगात कुठलीच काळजी नसल्याप्रमाणे, मजेत शीळ वाजवत, उड्या मारत प्रत्येक क्षण आनंदानं अनुभवतात. परंतु, सर्वच सारखे नसतात. काही जोडपी तर या त्रासाला कंटाळून एकमेकांवर चिडतातही. कुणी एखादा दगड पाहून तिथंच बसतो- ‘बस, आता आणखी चालवत नाही’ म्हणून तक्रार करतो. मग कुणी तरी त्याला हिंमत देतो, तर कुणी दुसरा रागावतोदेखील. पण असे वेगवेगळे अनुभव घेत सर्वच नियोजित स्थळी पोहोचतात हे नक्की.  

तिथे पोहोचल्यावरचे ते पहिले क्षण? ते निसर्गरम्य दृश्‍य नजरेस पडताच आतापर्यंतच्या सर्व त्रासाचा होणारा विसर? क्षणात सर्व शीण नाहीसा होण्याचा अद्भुत अनुभव? आठवतंय तुम्हाला? हा इतका सुंदर अनुभव अगदी स्वर्ग दिसल्यासारखा, आपण आयुष्यभर प्रत्येकाला सांगत राहतो. त्यासाठी केलेली ती धडपड, तो त्रास बऱ्याचदा आपल्याला आठवतही नाही. त्या ठिकाणी कमी पर्यटक जात असतील, तर तिथवर पोहोचण्यासाठी आपण घेतलेल्या मेहनतीवर, सोसलेल्या त्रासाबद्दल आपण अभिमानही बाळगतो. 

ती एक सहल होती. तो एक अनुभव होता, जो आपण आयुष्यात कधीतरी एकदा किंवा दोनदा स्वतःसाठी योजतो. परंतु, निसर्गाने आपल्यासाठी असे रोमहर्षक अनुभव संपूर्ण आयुष्यभर अनुभवण्यासाठी योजलेले आहेत. कठीण रस्ते, त्रास, कठीण लोक, परीक्षा, काही अपयश; पण मध्येच एका वळणानंतर अचानक समोर दिसणारं मनमोहक दृश्‍य! 

जगण्यात त्रास आहे, समस्याही आहेत. परंतु, प्रत्येक अवघड वाटेच्या वळणावर प्रेम, सौंदर्य, मानमरातब, मुलांचा जन्म, नवीन नोकरी, पगारवाढ, नातेवाइकांशी गाठीभेटी, लग्नसमारंभ इत्यादीसारखी सुंदर, मनमोहक दृश्‍यं आणि अनुभवही आहेत. सहलीला जाताना ज्या उत्साहानं आपण सर्व कठीण वाट पायदळी तुडवतो, तशीच वृत्ती आयुष्यातील कठीण वेळेबाबत ठेवली, तर संपूर्ण आयुष्यच एक सुंदर, रोमहर्षक सहल असल्याचे जाणवू लागेल. मग या अवघड वाटेवर त्रास न करून घेता आपण पुढच्या वळणावर कुठले मनोहर दृश्‍य दिसेल याची उत्सुकतेने वाट पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com