काठावरलं घर वाळूचं

काठावरलं घर वाळूचं

उकळत्या पाण्याच्या वाफेनं वेढून गेलेल्या दिवसांत निखळ सुखाचा शोध घ्यायचाच ठरवलं, तर ओढ्याकाठी जाण्याखेरीज पर्यायच नाही; आणि त्यातही ही वेळ संध्याकाळची असेल, तर सुवर्णपात्री अमृतच जणू!

डोंगरकुशीच्या रेषेला बिलगून बसल्यासारख्या पसाभर गावांत संध्याकाळही कशी अलगद उतरून येते. खेळून दमलेल्या बाळानं झोपेचे पंख डोळ्यांवर ओढून घ्यावेत, तशा कृष्णसावल्यांच्या पापण्यांत गाव कधी बुडून जातं, ते कळतही नाही. कोवळ्या सावल्यांचे नाजूक थर आटीव दुधासारखे दाटसर होत जातात. या समाधानाच्या कितीही ओंजळी भरून घेतल्या, तरी तिथल्या आनंदप्राजक्ताचा बहर संपत नाही. 

ओढ्याकाठच्या झाडांवर पक्ष्यांची सायंस्तोत्रं सुरू झालेली असतात. गाणी गात परतणारे थवे घरट्यांत जाऊन त्या सुरांत मिसळून जात असतात. त्या सुरावटीला पानांची सळसळ साथ करीत असते. पंख-फडफडीची किरकोळ भांडणं काही क्षणांतच मिटून गेलेली असतात. वाऱ्याच्या हलक्‍या रेषांचे तरंग काठांवरून वाहत चाललेले असतात. अंधारकडांचे काजळ दाट व्हायला अजून वेळ असतो; आणि अशा वाहत्या क्षणांत ओढ्याकाठी वाळूत मुलांचा खेळ रंगलेला असतो. 

ओढ्यातल्या पाण्याची झुळझुळ थंडावत चाललेली असते; पण वाळूच्या कणांची स्पर्शसंगत मात्र काहीशी ऊबदार असते. तिथं बसकण मारावी, एक पाय पुढं करून वाळूचे कण त्यावर ओढून घ्यावेत. ते पावलाच्या आजूबाजूनं ते नीट बसवावेत. कोमट-थंड थरांचा पावलाभोवती हलके हलके उंचावत चाललेल्या ढिगाचा स्पर्श दिवसभराचा शिणवटा कुठल्या कुठं भिरकावून देतो. थर घट्ट झाल्याचा अंदाज घेऊन त्यांतून पाऊल अलगद काढून घेण्याची कसरत आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत असते. पाऊल बाहेर घेता घेता वाळूच्या कणांचे काही आधार भुरभुरत कोसळत जातात; पण बराच वेळ थोपटलेले कण मात्र आपापली जागा धरून ठेवतात. पाऊल बाहेर येताच अंधारमय गुहेचं एक इवलं कोटं तिथं साकारतं. त्याच्या शेजारी पुन्हा असंच दुसरं कोटं करायचं; आणि हलक्‍या हातानं वाळूचे थर बाजूला काढून आतल्या बाजूनं इकडून तिकडं जाण्यासाठी छोटं दार करायचं. कोटी कोसळून पडण्याची निराशा अनेकदा पचवल्यावरच या खेळाचं एक तंत्र आपल्या हातांत येतं. मित्रमंडळींनी ओढ्याकाठी ठिकठिकाणी उभी केलेली कोटी बघण्याची उत्सुकता नजरेच्या पावलांना लांबवर फिरवून आणी. कुठं कुठं पडझड दिसे; तर कुठं कुठं चिरेबंदी राजवाड्यासारखी कोटी उभी असत. 
एव्हाना अंधारकडा दाट झालेल्या असत. पाणवठे निर्मनुष्य होऊ लागलेले असत. घराची वाट खुणावू लागलेली असे. झाडांवर विसावलेले पक्षी रात्री खाली उतरून येतील आणि आपण तयार केलेल्या कोट्यांत समाधानाची झोप घेतील, अशा आशेनं ओढ्याच्या काठाचा निरोप घेतला जाई. या आशेची पाकळी डोळ्यांच्या झोपेत मिसळून जाई; आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ पुन्हा आणखी एका कोट्याची नवी ऊबदार आशा घेऊन जागे करी. कुणा अज्ञातासाठी काही उभं केल्याचं समाधान किती मोठं असतं नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com