एकरूपत्व

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 4 मे 2017

हाती घेतलेल्या कामावरील अढळ निष्ठा नेहमी यशाचंच फळ देते. ही निष्ठा इतकी प्रखर हवी, की पाण्याच्या पृष्ठभागाशी तरंग विरून जावेत, तसं माणसानं आपल्या ध्येयाशी सहज एकरूप झालं पाहिजे. पांडुरंगाच्या चरणी माथा टेकविणाऱ्या भक्ताला तो जिथं माथा ठेवील तिथं सावळ्याचे चरण असल्याचा भास होतो. त्या कानड्याच्या पायतळी अठ्ठावीस युगांपासून असणारी वीट त्याला समोर दिसू लागते. मग त्याच्या शब्दांना अभंगांचा अर्थ लाभतो; आणि उच्चारणात टाळ-चिपळ्यांचे नाद अलगद मिसळून जातात. ही अत्युच्च मानसिक स्थिती आहे; पण तिथपर्यंत पोचण्यासाठी पहिली पायरी निष्ठेची आहे.

हाती घेतलेल्या कामावरील अढळ निष्ठा नेहमी यशाचंच फळ देते. ही निष्ठा इतकी प्रखर हवी, की पाण्याच्या पृष्ठभागाशी तरंग विरून जावेत, तसं माणसानं आपल्या ध्येयाशी सहज एकरूप झालं पाहिजे. पांडुरंगाच्या चरणी माथा टेकविणाऱ्या भक्ताला तो जिथं माथा ठेवील तिथं सावळ्याचे चरण असल्याचा भास होतो. त्या कानड्याच्या पायतळी अठ्ठावीस युगांपासून असणारी वीट त्याला समोर दिसू लागते. मग त्याच्या शब्दांना अभंगांचा अर्थ लाभतो; आणि उच्चारणात टाळ-चिपळ्यांचे नाद अलगद मिसळून जातात. ही अत्युच्च मानसिक स्थिती आहे; पण तिथपर्यंत पोचण्यासाठी पहिली पायरी निष्ठेची आहे. या पायरीवर ज्यानं पाऊल ठेवलं, त्याला पुढच्या पायऱ्या पार करणं सोपं जातं. प्रामाणिकपणा, कुशलता, अचूकता, अत्युत्कृष्ट दर्जा अशा एकेक पायऱ्या त्याच्या दृष्टिपथात येतात. तो ध्येयाशी एकरूप होऊन जातो. असे समरसी एकरूपत्व म्हणजेच यश. 

एक मार्मिक कथा आहे. एका राजानं नगरातल्या उत्तमोत्तम चित्रकारांना कोंबड्याचं चित्र काढून आणायला सांगितलं. दरबार भरला. चित्रकार कलाकृतींसह हजर झाले. सारी चित्रं मांडली गेली. दरबारातल्या बुजुर्ग चित्रकाराला बोलावून राजानं परीक्षण करायला सांगितलं. त्यानं एकाही चित्राची शिफारस केली नाही. सारे अचंबित झाले. राजालाही प्रथमदर्शनी निर्णय पटला नाही. राजदरबारातल्या चित्रकारानं उपाय सुचविला - या चित्रांचं परीक्षण एक जिवंत कोंबडाच करील. कोंबड्यांना झुंजण्यात रस असतो. ज्या चित्रातल्या कोंबड्यावर हा कोंबडा धावून जाईल, ते अस्सल ठरेल. राजाज्ञा झाली. एक कोंबडा आणविला. साऱ्या चित्रांसमोरून फिरून तो शांतपणे निघून गेला. निकाल उघड झाला. राजानं आपल्या चित्रकाराला विचारलं - तू ही किमया करून दाखवू शकतोस? 

चित्रकारानं सहा महिन्यांची मुदत मागितली. मुदतीनंतर पुन्हा दरबार भरला; पण दरबारातला चित्रकार रिकाम्या हातानं उपस्थित झाला. तो म्हणाला - मी इथं, सगळ्यांच्या समोर चित्र काढतो. मग ठरल्यानुसार परीक्षण करा. कॅनव्हासवर चित्र साकारलं. परीक्षणासाठी जिवंत कोंबडा आणविला. चित्र दिसताच, त्यातील कोंबडा खरा समजून जिवंत कोंबडा त्याच्यावर तुटून पडला. त्यानं पिसं फुलविली. डोळ्यांचे गोल रुंदावले. दरबारी चित्रकारानं बाजी जिंकली होती. 

राजानं विचारलं - तू ऐन वेळीच चित्र काढणार होतास, तर सहा महिन्यांची मुदत का घेतली? 

चित्रकार म्हणाला - हे सहा महिने मी कोंबड्यांबरोबरच राहिलो. त्यांच्या हालचाली टिपल्या. त्यांचे रागलोभ, आशाआकांक्षा, ईर्षा हे सारं जाणून घेतलं. 

आपल्या सगळ्यांनाच यशाची तृष्णा आहे, पण ते झटपट, कमी श्रमांत, सहजपणानं हवं आहे. निष्ठेच्या पायरीपासून ध्येयाशी एकरूपत्व साधण्याची; आणि त्यासाठी अथक प्रयत्नांची किंमत मोजण्याची तयारी असेल, तर उत्तुंग यश मिळविणं शक्‍य आहे! माथा टेकवू तिथं विठ्ठलचरण उमटत असतील, तर अशा निष्ठेच्या श्रमांचं फळ यशात का रूपांतरित होणार नाही?

Web Title: editorial artical malhar arankalle