हिरवाई हवी; मग वन्यजीव का नकोत?

नयन खानोलकर (वन्यजीव छायाचित्रकार)
शनिवार, 31 डिसेंबर 2016

एकीकडे दाटीवाटीच्या जागेतील सदनिका...अन्‌ दुसरीकडे शहरातीलच निवांत आणि सतत ‘ग्रीनरी’ दिसेल अशी सदनिका’, असे दोन पर्याय दिले, तर, तुम्ही काय निवडाल? बहुतेक जण दुसऱ्या पर्यायाला प्राधान्य देतील, हे नक्की. म्हणजेच माणसाला डोळ्यांना आनंद देणारी आणि मनाला समाधान देणारी ‘ग्रीनरी’ हवी असते; परंतु त्या निसर्गसृष्टीतील वन्यप्राणी नको असतात, असे का?

एकीकडे दाटीवाटीच्या जागेतील सदनिका...अन्‌ दुसरीकडे शहरातीलच निवांत आणि सतत ‘ग्रीनरी’ दिसेल अशी सदनिका’, असे दोन पर्याय दिले, तर, तुम्ही काय निवडाल? बहुतेक जण दुसऱ्या पर्यायाला प्राधान्य देतील, हे नक्की. म्हणजेच माणसाला डोळ्यांना आनंद देणारी आणि मनाला समाधान देणारी ‘ग्रीनरी’ हवी असते; परंतु त्या निसर्गसृष्टीतील वन्यप्राणी नको असतात, असे का?

जंगल हे जंगली जनावरांसाठी असावे आणि शहर माणसासाठी, असा आपला समज आहे. मुळात हा समजच बदलायची वेळ आली आहे. आपण विकासाच्या नावाखाली जंगल नष्ट करत गेलो आणि फक्त स्वतःचा विचार केला. ग्रीन झोन, संरक्षित क्षेत्र निश्‍चित करणारी नोटिफिकेशन्स काढली. माणसाच्या सोयीसाठी कितीही कागदी घोडे फिरविले, तरी निसर्गातील पर्यावरणीय परिसंस्था त्या कागदी घोड्याप्रमाणे बदलता येत नाहीत. माणसाने किती क्षेत्र निश्‍चित केले, हे जनावरांना थोडीच कळते? माणसाला कायद्याचा अधिकार आणि परवानगी मिळते आणि मोकळ्या जागेत बांधकाम करायला सुरवात होते. वन्यप्राण्यांचा विचार कुठेच नसतो. मग जंगलावर अतिक्रमण होते आणि माणसाची वस्ती दिवसेंदिवस वाढू लागते.

काहीवेळा ही जंगली जनावरे चुकून शहराच्या आसपास दिसायला लागली, की आपण त्यावर आक्षेप घेऊ लागतो. ‘आमच्या आजूबाजूला बिबट्या नको,’ असे सांगितले जाते. त्यामुळे बिबट्याला पकडले जाते आणि पिंजऱ्यात त्याची रवानगी होते. माणूस - वन्यजीव संघर्ष वाढण्याला महत्त्वाचे कारण म्हणजे, वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी लागणारी पुरेशी जागा नसणे हे आहे. विकास आणि त्याप्रमाणे होणारा विस्तार हा महत्त्वाचा मुद्दा. खरंतर अतिक्रमणाचा प्रश्‍न नाहीसा होत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रश्‍न मुळापासून सुटणार नाही. शहरीकरण वाढले असले, तरीही सुदैवाने बिबटे विस्थापित झालेले नाहीत. हे चित्र पुण्या-मुंबईबरोबरच हैदराबाद, बंगळूर, मथुरा येथे दिसते. माणसाच्या वस्तीजवळ बिबट्या आढळला, तर त्याला जेरबंद केले जाते आणि त्याला कुठेतरी लांब सोडले जाते. वास्तविक त्याच्या मूळ अधिवासापासून लांब त्याला सोडल्यामुळे तो पुन्हा आपल्या अधिवासक्षेत्रात येण्यासाठी धडपडतो. मार्गावरील गावातून जाताना परिचित क्षेत्र नसल्यामुळे सैरभैर होतो, गोंधळतो आणि मग आपण म्हणतो, ‘बिबट्याने धुमाकूळ घातला’. दूरवर सोडलेल्या बिबट्याचा पुन्हा आपल्या अधिवास क्षेत्रात परतण्याचा हा प्रवास असतो. हे बिबट्यांचा सलग पाच-सहा वर्षे अभ्यास करून निदर्शनास आले आहे. वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी अकोला परिसरात बिबट्याला ‘रेडिओ कॉलर’ लावून त्याचा अभ्यास केला आहे, त्यातूनही या बाबी समोर आल्या आहेत.

याशिवाय बिबटे हे शहराच्या आसपास बऱ्याच वर्षांपासून राहत आहेत, हेही सिद्ध झाले आहे; परंतु त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आसपासच्या लोकांना झालेली नसते. याचाच अर्थ, त्यांनी माणसांचा सहवास, विकास आणि शहरीकरणासाठी आपल्या जीवनशैलीत आवश्‍यक ते बदल करून नवी शहरी शैली आत्मसात केली आहे. उंदीर, कुत्री असो वा डुक्कर; उकिरड्यावर मिळेल ते खाद्य म्हणून खातात. रहदारीचा रस्ताही ओलांडतात. माणसाच्या दृष्टिकोनातील ‘विकासा’शी बिबट्यांनी तरी त्यांच्यापुरते जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता वेळ आहे माणसाने ‘ॲडजेस्ट’ करण्याची.

माणूस स्वत:ला कधी ‘ॲडजेस्ट’ करून घेणार हा प्रश्‍न आता पडत आहे. शहरीकरणात प्रत्येकाला सुविधा हव्यात, लेक व्ह्यू, जंगल व्ह्यू, हिल व्ह्यू हे देखील हवंय; परंतु निसर्गातील वन्यप्राणी का नको?  यात कुठेतरी आशेचा किरण तेवत ठेवलाय तो अदिवासी लोकांनी. त्यांच्या संस्कृतीत आजही वन्यप्राण्यांना देवत्वाचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या घरात, लग्नपत्रिकेत, मंदिरात बिबट्याची चित्रे असतात. खरेतर नैसर्गिक स्रोतांमुळेच माणूस श्‍वास घेऊ शकतोय, याचा विसर पडू नये, म्हणजे मिळवले. जंगल म्हटले, की त्यात राहणारी जनावरे ही आलीच.  विकासाच्या नावाखाली नैसर्गिक स्रोत मोठ्या प्रमाणात नष्ट केले जात आहेत, काही वर्षांनी लोकसंख्या यापेक्षा दुप्पट झालेली असेल आणि नैसर्गिक स्रोत कमी झालेले असतील. खरेतर या संदर्भात मुख्यत: राजकारणी, धोरणकर्ते यांच्यात जागरुकता निर्माण करायला हवी.

Web Title: editorial artical nayan khanolkar