श्रम-स्वधर्माच्या वरदानाला सत्तामार्गाचा शाप

राजीव साने (आंतरविद्याशाखीय अभ्यासक)
शुक्रवार, 5 मे 2017

उत्पादकशक्तींची वाट अडविणाऱ्यांना झिडकारून, त्यांची वाट मोकळी करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हा मार्क्‍स यांचा विचार आजही प्रस्तुत ठरतो...मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त त्यांच्या विचारांची सद्यःस्थितीच्या संदर्भात समीक्षा.

लहरीपणाने भलभलते आदर्श मानायचे आणि वास्तवावर डोके आपटून तरी घ्यायचे, किंवा आदर्श मानणे आरपार सोडून तरी द्यायचे, या कोंडीतून माणसाला सोडवणारा महान विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्‍स. त्याचे मुख्य म्हणणे असे होते, की वास्तवाला स्वतःची अशी एक गती असते.

उत्पादकशक्तींची वाट अडविणाऱ्यांना झिडकारून, त्यांची वाट मोकळी करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हा मार्क्‍स यांचा विचार आजही प्रस्तुत ठरतो...मार्क्स यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त त्यांच्या विचारांची सद्यःस्थितीच्या संदर्भात समीक्षा.

लहरीपणाने भलभलते आदर्श मानायचे आणि वास्तवावर डोके आपटून तरी घ्यायचे, किंवा आदर्श मानणे आरपार सोडून तरी द्यायचे, या कोंडीतून माणसाला सोडवणारा महान विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्‍स. त्याचे मुख्य म्हणणे असे होते, की वास्तवाला स्वतःची अशी एक गती असते.

इतिहासाच्या विविध टप्प्यांवर ही गती वेगवेगळी असते. या गतीच्या आरपार विरोधात जाणे व्यर्थ असते, पण मार्क्‍स नियतीवादी नक्कीच नव्हता. परिवर्तनवाद्यांची शक्ती व्यर्थ जाऊ नये, ही तळमळ त्यामागे होती. इतिहासाच्या गतीला उलटा स्ट्रेट ड्राइव्ह मारायचा नसतो, तर फ्लिक किंवा ग्लान्स करून जास्त चांगली दिशा देता येते हा मुद्दा होता. ‘‘मूल्ये बिल्ये सब झूठ’’ असे त्याचे म्हणणे नव्हते. ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ या सिंहगर्जनेमुळे तत्त्वचिंतनाचा अर्थच त्याने बदलवला. इतकेच नव्हे तर तो जाणीवेच्या जगाला दुर्लक्षित करतो हा आरोपही खरा नाही. ‘‘एखादी कल्पना जेव्हा जनतेचे स्वप्न बनते तेव्हा ती एक भौतिक शक्तीच बनते’’ या वचनावरून त्याचा भौतिकवाद हा  आवर्जून द्वंद्वात्मक (डायलेक्‍टिकल) म्हणावा लागतो, हे ध्यानात येते.

विशेषतः तरुण वयातील लेखनात मूल्यदृष्टी ठळकपणे दिसते. आपल्या सृजनशीलतेला वाव देत स्व-सृष्टी घडविणे हा मानवी स्वधर्म आहे, असे तो मानत होता. उत्पादक काम या स्वाभाविक गोष्टीला लादलेपण आल्याने निर्माण होणारा आत्मवियोग (एलियनेशन) कसा दूर करता येईल, ही त्याची मुख्य आस्था होती. एकीकडे निसर्गाशी आणि दुसरीकडे समाजरचनेशी झुंज देत मनुष्य दुर्भिक्ष्याच्या अवस्थेतून समृद्धीच्या अवस्थेत जाईल, ही त्याची श्रद्धा होती.

त्याची न्याय-कल्पना सुटसुटीत समतावादी नव्हती. किंबहुना समता हा शब्दही त्याच्या साहित्यात अभावानेच आढळतो. अनुत्पादक राज्यकर्ते उत्पादकांची नाडणूक करतातच; पण त्याभरात ते उत्पादकतेच्या वाटांमध्ये अडथळे निर्माण करतात आणि हे थांबले पाहिजे, अशी त्याची शोषणमुक्तीची कल्पना होती. श्रीमंताचे काढून गरिबात वाटा अशी नव्हती. उत्पादकांनी उत्पादकशक्तींची वाट अडविणारे राज्यकर्ते झिडकारून वाट मोकळी करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हा त्याचा संदेश आजही प्रस्तुत ठरणाराच आहे. 

मार्क्‍सने अनुभवलेली भांडवलशाही ही एकोणीसाव्या शतकातील अवजड तंत्रज्ञानावर आधारित होती. त्यामुळे भांडवल-गुंतवणूक जास्ती जास्ती लागत जाणे आणि उत्पादकता मात्र त्यामानाने न वाढणे हे तेव्हा सत्यच होते. त्यामुळे नफ्याचे दर घसरणार, पिळवणूक तीव्र होत जाणार, कामगारवर्गाचे कंगालीकरण होत जाणार आणि व्यवस्था अरिष्टात सापडणार, याचे गणित त्याने मांडले. परंतु, विसाव्या शतकात झालेले तांत्रिक बदल इतके विस्मयजनक आहेत, की ते प्रत्यक्ष करत असणाऱ्या तंत्रज्ञांनाही स्वतःच्या डोळ्यावर विश्‍वास बसत नाही इतके आरपार वेगळे दृश्‍य कल्पिण्यास १८८४ ला निधन पावलेला मार्क्‍स असमर्थ ठरला, हा ‘त्याचा’ दोष खचितच म्हणता येणार नाही. अवजड तंत्रामुळे येणारी अडचण ही भांडवलशाही या व्यवस्थेचाच अपरिहार्य परिणाम आहे, असे समजण्यात मार्क्‍सने चूक केली. सरंजामशाहीतून भांडवलशाहीकडे हे संक्रमण चिकित्सकपणे मांडणारा मार्क्‍स; भांडवलशाहीतून समाजसत्तावादाकडचे संक्रमण इतक्‍या घाईने करता येईल असे मानण्यात उतावीळ ठरला.

भांडवलशाहीचा असा ‘बालमृत्यू’ झालाच नाही. लवचिकपणे स्वतःला दुरुस्त करत नेणारी ती व्यवस्था आहे हे तिने सिद्ध केले. ‘‘तुम्ही जर लोकांत क्रयशक्ती पसरवली नाहीत तर मागणीअभावी मराल’’ हे सांगणारा केन्स द्रष्टा ठरला. केन्सप्रणित ‘औदार्याला’ लोकशाहीची जोड मिळून कल्याणकारी राज्य ही नवीच गोष्ट अस्तित्वात आली, जिचा सुगावा मार्क्‍सला लागलाच नाही. त्यामुळे त्याची भाकिते धडाधड चुकत गेली. कामगारवर्गाचे कंगालीकरण न होता त्याचे श्रीमंत कामगार आणि गरीब कामगार या दोन वर्गांत विभाजन झाले. श्रीमंत कामगाराला भांडवलशाही हवीशीच वाटली आणि गरिबात तिच्याशी लढण्याची ताकद उरली नाही. समाजाचे मालक आणि मजूर या दोन वर्गात ध्रुवीकरण होत जाईल, असे मार्क्‍स मानत होता.

प्रत्यक्षात नोकरदार मध्यमवर्ग आणि स्वयंरोजगारी लहान उद्योजक स्वरूपातला मध्यमवर्ग मिळून ध्रुवीकरण न होता अनेक स्तरांचा वर्गसमन्वय निर्माण झाला. भांडवलशाही मरणपंथाला लागून तेथे कामगारक्रांत्या झाल्याच नाहीत. उलट जिथे अद्याप भांडवलशाहीचा पत्ताच नाही अशा देशात त्या झाल्या. त्या खरेतर सरंजामशाहीविरोधी क्रांत्या होत्या. भांडवली लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे ऐतिहासिक कार्य असायला हवे होते. पण लेनिन स्टालिन माओ या मंडळींना भांडवलशाही हा टप्पा गाळून थेट समाजसत्तावादात जाण्याचा मोह पडला.

मूळ मार्क्‍सवादाशी प्रतारणा करून निर्माण झालेल्या या नोकरशाही व्यवस्था, गोर्बाचेव्हने वॉर्सां-सैन्य मागे घेताच कशा वेगाने कोसळून पडल्या हे आपण पाहिलेच आहे. तसेच डेंगनंतरचा चीन कसा कट्टर भांडवलशाहीवादी बनला हेही आपण पाहिले. २०व्या शतकातील बदलाचा झपाटा लक्षात घेता भाकिते चुकणे ही गोष्ट क्षम्य मानायला हवी.

उत्पादक- अनुत्पादक हा वर्गविग्रह नष्ट व्हावा, तसेच शोषणमुक्ती व्हावी, या प्रेरणा वंदनीयच आहेत. परंतु, हे परिवर्तन रक्तरंजित क्रांतीनेच, एकदाचे आणि कायमचे होऊन जाईल, असा आग्रह धरणे अनावश्‍यक होते. शोषण तीव्र होऊन ते असह्य होऊन क्रांतीच होईल, असे नसून शोषण सौम्य करत नेणारी सततची सुधारणा पुढे पुढे नेणे, हे शक्‍य व समंजसपणाचे आहे. पण मार्क्‍स आणि त्याचे क्रांतीवादी अनुयायी ‘सुधारणावाद’ ही शिवी म्हणून वापरू लागले. त्याहूनही महत्त्वाचा घोटाळा असा, की या सर्व परिवर्तनाची वाहक ही राज्यसंस्था स्वतःच असेल व एकदा का ती कामगारवर्गाच्या हातात आली, की ती वर्गविग्रह कायमचा नष्ट करून टाकेल, हे गृहीत धरणे चूक होते. विशेषतः सर्वहाऱ्याची या नावाखाली चालणारी ‘हुकूमशाही’ हे काम करेल असा दावा करणे अक्षम्यपणे चूक होते. किंबहुना समाजात सत्ता आधी येते आणि ती सत्ताच वर्ग निर्माण करते असे युद्धसंस्थेच्या इतिहासाने नेहमीच दाखवले आहे. ‘‘कामगारवर्गाच्या हातात राज्यसंस्था आली, की तो जरी पूर्वाश्रमीचा कामगार असला तरी क्रांतीनंतर तो ‘कामगार’च उरणार नाही आणि कम्युनिस्ट पक्षाची नोकरशाही हा स्वतःच एक शोषक वर्ग बनेल.’’ हा इशारा मार्क्‍सला बाकूनिनने दिला होता. पण मार्क्‍सने दुराग्रहीपणे बाकूनिनला हाकलून दिले. मोठ्यांच्या चुकाही मोठ्या असतात!

समृद्धी रोखून कधीच न्याय आणता येत नाही आणि उत्पादकाला चेपून समृद्धी येत नाही हे सांगणारा आणि माणूसच स्वतःचा इतिहास घडवतो; पण लहरीनुसार नव्हे, हे सांगणारा द्रष्टा पुरुष म्हणून मार्क्‍स नेहमीच आपला स्फूर्तिदाता राहील .

Web Title: editorial artical rajiv sane