शाहू महाराजांचे कल्पक जलधोरण

संगीता राजापूरकर-चौगुले, उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)
Monday, 26 June 2017

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती. कमालीची दूरदृष्टी असणाऱ्या या प्रजाहितदक्ष राजाने त्या काळाच्या चौकटीत न बसणारे; पण भविष्याचा वेध घेणारे अनेक निर्णय घेतले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती. कमालीची दूरदृष्टी असणाऱ्या या प्रजाहितदक्ष राजाने त्या काळाच्या चौकटीत न बसणारे; पण भविष्याचा वेध घेणारे अनेक निर्णय घेतले.

अलीकडेच ‘पाणीपथ’ नावाचा लघुचित्रपट बघितला. पाण्यासाठी दहा वर्षांच्या सारू नावाच्या मुलीला जीव गमवावा लागतो, ते दृश्‍य पाहून डोळ्यांत पाणी येते. घटना काल्पनिक आहे. मात्र, आजचे वास्तव त्यापेक्षा वेगळे नाही. पाण्यासाठी कितीतरी भगिनींनी आपला जीव गमावला, कितीतरी जणांना अपंगत्व आले. आज जमिनीतील पाणी उत्तरोत्तर खाली जात असून, पाण्यासाठी संघर्ष अटळ वाटतो आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र यापेक्षा वेगळे आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी प्रमाणात जाणवते. माणसाची तहान भागवेल आणि शेती व उद्योगाला पुरेल एवढे पाणी इथे उपलब्ध आहे. याचे श्रेय जाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याचा ठसा सगळ्या देशावर उमटलाय. त्या काळाच्या चौकटीत कुठेही न बसणारे; पण भविष्याचा वेध घेणारे अनेक निर्णय शाहू महाराजांनी घेतले. प्रचंड त्रास झाला. मात्र, तरीही त्यांनी त्यांची अंमलबजावणी केली. त्याचे सुपरिणाम आज दिसत आहेत.

राजवाड्यात बसून ऐषोरामात जीवन जगणे हे महाराजांच्या स्वभावात नव्हते किंवा सगळ्यांना खूष ठेवून परंपरेच्या पावलांवर पाऊल ठेवून राज्यकारभार करणे हा त्यांच्या प्रकृतीचा भाग नव्हता. सत्तेचा उपयोग लोकांच्या हितासाठीच झाला पाहिजे, तळागाळातील शेवटच्या घटकालादेखील हे माझे राज्य आहे असे वाटले पाहिजे, असे प्रयत्न शाहूंनी केले, याला इतिहास साक्षी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचाच वारसा चालविणाऱ्या शाहू महाराजांचे राज्य या संस्थानातील प्रत्येक माणसाला ‘हे राज्य माझं आहे’, असे वाटले होते. महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे निर्णय सर्वस्पर्शी होते. शंभर वर्षांपुढच्या कोल्हापूरचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते. म्हणूनच शिक्षण आणि पाणी याला महाराजांनी आपले जीवनकार्य मानले. संस्थानचा खजिना रिकामा होतोय, याची पर्वा न करता अगदी नेटाने हाती घेतलेले काम पूर्ण केले. देशात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात त्याकाळी कितीतरी संस्थाने असतील; मात्र सिंचन विभाग स्वतंत्ररीत्या स्थापन करणारे, शेती व्यवसाय समृद्ध करणारे शाहू महाराज एकमेव राजे असावेत. 

आजच्या प्रगत काळातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेतीच आहे. शाहू महाराजांच्या काळात तर कोल्हापूर संस्थानचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. पुरेशा सिंचन सुविधांचा अभाव, अज्ञान यामुळे शेतकऱ्यांची अवस्था कमालीची दयनीय झाली होती. शाहू महाराजांनी १९०२ च्या दरम्यान युरोपचा दौरा केला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा युरोपात होत असलेल्या काटेकोर वापराने महाराज प्रभावित झाले. युरोपात फिरणाऱ्या राजांना कोल्हापूरचा शेतकरी दिसत होता, आपल्या संस्थानात वाहणाऱ्या नद्या, तरीही कोरडी राहणारी जमीन आणि मनात जन्म घेत होता महाकाय प्रकल्प. म्हणतात ना, ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’.

संस्थानात पडलेल्या दुष्काळाचा महाराजांनी समर्थपणे मुकाबला केला. हजारो लोकांचे प्राण वाचवले. वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर कायमची मात करण्याच्या विचाराने त्यांच्या मनात घर केले आणि १९०२ मध्ये आपल्या संस्थानात महाराजांनी अपूर्व असे ‘सार्वत्रिक पाटबंधारे धोरण’ जाहीर केले. संस्थानात स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती केली. खास अधिकाऱ्याची नेमणूक केली. या खात्यामार्फत प्रत्येक गावाची पाणी पाहणी करण्यात आली. नवीन विहिरी, जुन्या विहिरी, लहान- मोठे तलाव यांची तपशीलवार माहिती घेऊन त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. नवीन योजना अमलात येत होत्या. नवीन विहिरी आणि तलावांच्या बांधकामास प्राधान्य देण्यात येऊ लागले. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब थांबलाच पाहिजे, याकडे महाराजांनी कटाक्षाने लक्ष दिले.

महाराजांचे जलविषयक धोरण योग्य होते. पाटबंधारे खाते निर्माण करून शंकर सीताराम गुप्त यांची पाटबंधारे अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक केली. १९०६ मध्ये संस्थानात ११ हजार ७०० इतक्‍या विहिरी होत्या. त्यांची संख्या १९२० पर्यंत १२ हजार ८०० झाली. शेतकऱ्यांना जुन्या विहिरी दुरुस्त करण्यास आणि नवीन विहिरी काढण्यासाठी संस्थानकडून कर्जपुरवठा करण्यात आला. शहापूर, रुकडी, शिरोळ या परिसरात २० नवीन तलाव बांधण्यात आले, तर काही जुन्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली.

महाराजांच्या दृष्टीने हे प्रयत्न तोकडे पडत होते, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. कोल्हापूर जिल्ह्यातून पंचगंगा, वारणा, भोगावती यांसारख्या मोठ्या नद्यांबरोबर काही छोट्या डझनभर नद्या वाहतात आणि या नद्यांचे वाहून समुद्राला मिळणारे पाणी महाराजांना अडवायचे होते. कुठेतरी प्रवाह थांबला पाहिजे, तो शेतीकडे वळला पाहिजे, यासाठी त्यांच्या डोक्‍यात मोठी योजना आकार घेत होती आणि कोल्हापूर संस्थानात वाहणाऱ्या एखाद्या नदीवर मोठे धरण बांधावे, असे त्यांनी ठरविले. त्यानुसार आधीच त्यांनी संस्थानाचे पाटबंधाऱ्यांच्या दृष्टीने सर्वेक्षण केले होते. राधानगरी तालुक्‍यात भोगावती नदीवर उभे असलेले राधानगरी धरण ही त्याचीच फलश्रुती. हे धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते आणि लोकांचे जीवन समृद्ध करते. हे धरण त्यांच्या कल्पकतेचे, द्रष्टेपणाचे स्मारक आहे. त्यांनी स्वतंत्र जलनीती आखली आणि त्याची अंमलबजावणी केली. पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देऊन चहाचा मळा संस्थानात पिकविला. राज्याच्या कल्याणकारी कार्याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial artical sangita rajapurkar-chaugule