आयुष्याचा ‘जीपीएस’

आयुष्याचा ‘जीपीएस’

हल्ली जवळपास सगळेच प्रवास करताना किंवा आपल्याच शहरातील नवीन भागात जाताना ‘जीपीएस’ प्रणालीचा उपयोग करतात; पण हातात चांगलं साधन आणि इंटरनेट असतानादेखील ‘जीपीएस’ व्यवस्थित वापरायला सर्वांत आवश्‍यक असतं, आपल्या नियोजित स्थळाचा अचूक पत्ता त्या साधनाला देणं. कन्याकुमारीला जायचं ठरवून तुम्ही राजस्थानचा पत्ता टाकला तर दिशा चुकालच. 

तसंच आयुष्य जगताना आपल्याला खरंच काय हवं आहे ते आधी ठरवणं आवश्‍यक आहे. बहुतेकांना ते माहीतही आहे. माझ्या व्याख्यानांना आलेल्यांना मी बहुतेक वेळा हा प्रश्न विचारते, ‘तुम्हाला आयुष्यात खरंच काय हवं आहे?’ आणि जवळजवळ सर्वांचंच उत्तर काहीसं असं असतं, ‘आनंद, प्रेम, शांती ...’ 

तुमचंही उत्तर असंच काही असेल, तर विचार करून पाहा, ‘माझ्या जीपीएसवर मी हेच लिहिलं आहे काय?’ कारण लहानपणापासून आपल्या ‘जीपीएस’ वर कोरलेलं असतं - अभ्यास, मार्क्‍स, उच्च डिग्री, चांगली नोकरी, पैसा, सुखसोयी, बंगला, मोठी गाडी ...’ आणि बरंच काही; पण कुठंही निर्भेळ आनंद, मानसिक शांतता, समाधान असं काही लिहिलेलं नसतं. 

मग आपण जो हेतूच बाळगत नाही, ते आपल्याला कसं मिळेल, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. कारण आपल्या लाडक्‍या लेकांच्या ‘जीपीएस’वरही आपण आज चुकीचा पत्ता कोरतो आहोत. पैसा, सुखसोयी आवश्‍यक आहेतच; पण प्रेम, आनंद आणि समाधान हवं असेल, तर तेही आपल्या ‘जीपीएस’ वर घ्यावं लागेल. रोज अभ्यास करतो, तसंच प्रेम आणि समाधानही कसं मिळेल, हे त्यांना शिकवावं लागेल आणि त्यांना शिकवता यावं म्हणून आपल्यालाही शिकावं लागेल. सुरवात कुठून करावी?

कामावर जाताना घरच्यांशी चार शब्द प्रेमानं बोलून निघा. बायकोला/ नवऱ्याला, पोरांना जवळ घेऊन मग निघा. एका दिवसातच तुम्हाला खऱ्या आनंदाची प्रचिती येईल. घरी आल्यावर अगदी आणीबाणी असल्याशिवाय फोन आणि ‘व्हॉट्‌स ॲप’ वर रमू नका. घरातल्यांशी गप्पा मारा. उगाचच पांचट जोक दुसऱ्यांना पाठवण्यापेक्षा खऱ्याखुऱ्या जवळच्या व्यक्तींबरोबर मनसोक्त हसा. आपल्या मुलांना समजून घ्या. उगाचच जग धावतंय म्हणून त्यांना कुठल्या तरी दिशेला दौडवू नका. वेळप्रसंगी त्यांना रागावता, तसंच कारण नसतानाही त्यांच्या कुठल्यातरी गुणांची तारीफ करा. ते मेहनत करत नसतील किंवा व्यवस्थित वागत नसतील, तर त्यांच्याशी चर्चा करा. तुम्हाला शक्‍य नसेल, तर कुणाकडे तरी त्यांना मार्गदर्शनासाठी घेऊन जा. पती- पत्नीनं आठवड्यातून थोडा तरी वेळ एकट्यानं घालवावा. कितीही वय असलं तरी दोघंच फिरायला जा, सिनेमाला जा, एकमेकांचे हात हातात घ्या. 

असं बरंच काही तुम्ही करू शकता. गरज आहे फक्त एका प्रश्‍नाची- मी माझा आणि माझ्या प्रिय मुलांच्या आयुष्याचा ‘जीपीएस’ बरोबर सेट केला आहे की नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com