गुराख्याचा पावा

- शेषराव मोहिते
बुधवार, 4 जानेवारी 2017

जग बदललं तरी खेडी म्हणावीत त्या वेगाने बदलत नाहीत. हे असं का घडतं? जे काही बदल इथं दिसतात, ते बरेचसे वरवरचे असतात. बहुतेक खेड्यांतून आलेले लेखक, कवी ज्यांचं बालपण तिथं गेलं आहे, ते पुढील आयुष्यात जे लेखन करतात, त्यातील जीवनानुभव हे बव्हंशी लहानपणी खेड्यात घालविलेल्या आठवणींशी निगडित असतात. त्यास लाख कुणी स्मरण स्मरणीयता म्हणो की काही म्हणो, ते टाळता कुणालाच येत नाही.

जग बदललं तरी खेडी म्हणावीत त्या वेगाने बदलत नाहीत. हे असं का घडतं? जे काही बदल इथं दिसतात, ते बरेचसे वरवरचे असतात. बहुतेक खेड्यांतून आलेले लेखक, कवी ज्यांचं बालपण तिथं गेलं आहे, ते पुढील आयुष्यात जे लेखन करतात, त्यातील जीवनानुभव हे बव्हंशी लहानपणी खेड्यात घालविलेल्या आठवणींशी निगडित असतात. त्यास लाख कुणी स्मरण स्मरणीयता म्हणो की काही म्हणो, ते टाळता कुणालाच येत नाही.

त्यांच्या आयुष्यभर पुरतील अशा कडू-गोड आठवणी या त्या बालपणी व्यतीत केलेल्या खेड्यातील कालखंडाविषयीच असतात. लेखकांच्या पिढ्या बदलतात, पण खेडं बदलत नाही आणि तिथलं जगणं बदलत नाही. हे असं का होत असावं, याचा धांडोळा या निमित्ताने घ्यायला काय हरकत आहे? जे काही थोडेफार बदल होत आहेत, ते चांगले की वाईट हे नंतर ठरेल, पण हा बदलांचा वेग इतका कमी का? बदलत्या जगाशी जुळवून घ्यायला इथल्या खेड्याला आणि त्यातही शेतीवर अवलंबून असणाऱ्या माणसांना सर्वांत कठीण का जात आहे?

दुपारच्या वेळी माळरानावर चरायला गेलेल्या गायी-म्हशी झाडाखाली रवंथ करीत बसल्या असताना, त्याच सावलीत गुराख्यांनी मांडलेला सूर-पारंब्याचा खेळ आठवला म्हणजे तेच त्यांच्या जगण्यातील आनंदनिधान होतं हे लक्षात येतं. तेव्हा आपणही त्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग होतो, या आठवणीनेच मन व्याकूळ होतं. पायात चप्पल आहे की नाही, अंगावरील कपडे धड आहेत की फाटके आहेत, हातापायांवर सराटी-बोराटीचे किती बोचकारे उमटले आहेत, घरून बांधून आणलेल्या भाकरीसोबत काही आहे की नाही, या कशाचीच फिकीर त्या जगण्यात नव्हती. उन्हं कलली म्हणजे तो गायी-गुरांचा खांड पाण्यावर निघाला म्हणजे एखाद्या सोबतीच्या गुराख्यानं त्याच्या पाव्यातून काढलेले सूर जे तेव्हाच्या आसमंतात भरून गेले, ते अजूनही ऐकू येतात.

दिवसभर माळ सारा चरून गायी-गुरांचा कळप घराच्या गोठ्यातील वासरांच्या ओढीनं माघारी निघतो, तेव्हा त्यांच्या खुरातून उधळलेली पायधूळ, सारा मावळतीचा आसमंत भारून टाकणारी. त्यात मिसळलेले गोठ्यातील वासरांच्या ओढीनं हंबरणाऱ्या गायी, गायींचं हंबरणं आणि त्यांच्या गळ्यातील घंटांची किणकिण, आकाशातील ढगांचे हरघडी बदलणारे आकार, डोक्‍यावरून दूरवर उडत जाणारे पक्ष्यांचे थवे. याचे जर कुणा कवीला तुमच्या शहरातील महाल-माड्यांहून अधिक अप्रूप वाटले तर नवल काय? त्या क्षणांच्या आठवणी आयुष्यभरासाठी हुरहूर लावण्यास पुरे ठरतात. त्यामुळेच हेन्री डेव्हिड थोरोदेखील ‘वॉल्डन’मध्ये म्हणतो, ‘‘रेड इंडियन माणूस गुणगुणत असलेल्या गाण्याचे सूर आपण क्षणभर कान देऊन ऐकले... तर सुधारणेच्या बदल्यात आपला रानटीपणा सोडून द्यावयाला तो का कबूल होणार नाही, हे आपल्या लक्षात येईल.’’

Web Title: editorial artical sheshrao mohite