वारसा

- शेषराव मोहिते
बुधवार, 25 जानेवारी 2017

अजूनही सकाळी जाग आली की अवतीभोवतीच्या सिमेंट काँक्रीटच्या भिंती, लोखंडी ग्रिल आणि काचेच्या बंद खिडक्‍या पाहिल्या की अनेकदा दचकायला होतं. क्षणभर आपण कुठे आहोत, याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो.

अजूनही सकाळी जाग आली की अवतीभोवतीच्या सिमेंट काँक्रीटच्या भिंती, लोखंडी ग्रिल आणि काचेच्या बंद खिडक्‍या पाहिल्या की अनेकदा दचकायला होतं. क्षणभर आपण कुठे आहोत, याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो.

कधीतरी गाढ झोपेत असताना वाटतं, आपण उसाच्या कडेला मोकळ्या आकाशाखाली, नांगरलेल्या शेतातच झोपलो आहोत. शेजारी कुत्रा आहे. रवंथ करीत बसलेल्या बैलांच्या गळ्यातील घंटीचा तालबद्ध किणकिण आवाज येत आहे. रात्रीच्या नीरव शांततेत आकाशातील चांदण्या लुकलुकत आहेत; पण जाग येते तेव्हा लक्षात येते, हा तर केवळ भास होता. आपण तिथून इथं शहरात आलो. त्या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे उलटली; पण तरीही हे वास्तव स्वीकारायला आपल्याला एवढं जड का जातं? आपल्या मनात घर करून बसलेलं ते माळवदाचं घर. पडझड होत चाललेलं गाव. ते धुळीनं भरलेले रस्ते, ते शेत, पाणंदीतून जाणारी गाडी वाट ते शिवार.

शिवारभर बागडत हिंडणारे हरणांचे कळप. अंधार पडायला लागला म्हणजे माळावरून येणारी कोल्ह्यांची कोल्हेकुई. गुरं-वासरं, बैल-बारदाना हे सर्वच्या सर्व काही केल्या मनातून का जात नाही?

आपण शहरात आज कुणीही असलो तरीही आपला तो गावाकडील वारसा आपला पिच्छा का सोडत नाही? भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’मधील नायक खंडेराव एके ठिकाणी स्वतःलाच बजावतो. ‘तू हे सगळं बौद्धिक, शिक्षणाचं, विद्यापीठाचं, पीएच.डी., पुस्तकं, लेख, संशोधन, सांस्कृतिक भानगडी, तुझ्या शिंगासारख्या मोडून टाक आणि शेतकरी हो - शेतीवाडी, घरदार, गुऱ्हाळं, शाळा, नेतेगिरी, खेड्यातलं राजकारण, लोकसेवा, मोरगाव केंद्राच्या कितीही दूर गेलास तर फक्त त्रिज्या वाढेल, म्हणून निर्णय घे. हे विश्‍वची माझे घर. मोरगाव सोड, देश सोड.’ हा विचार डोकं काढून वर येतो, तोच दुसरा त्याला खाली बुडवत वर येतो; ‘खंडेराव, तुझा वारसा केवळ तुझं घरदार, जमीन जुमला, शेतंशिवारं एवढाच नाही. गेल्या दहा हजार वर्षांपासूनच्या कृषी संस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे. तो तुला असा पालीच्या शेपटीसारखा खटकन तोडून पुढे जाता येणार नाही. तोडताही येणार नाही. औद्योगिक, व्यापारी, महानगरी लोकांच्या उन्मिलीत भुतावळीत शिरणं काही फार कठीण नसतं. लाखो लोक ते करतच असतात; पण खंडेराव, तू इतका क्षूद्र नाही आहेस. घराला अंगण आणि दारी पिंपळ ही तुझी ओळख. या गोष्टी नसलेलं भोवताल तुला चालेल? ऊन, पाऊस, चांदणं, जमीन, गवत, पशुपक्षी, प्राणी, झाडंझुडपं, लोकगीतं, दंतकथा, वाक्‍प्रचार हे काहीच नसलेला झगझगीत वांझ परिसर तुला चालेल? भरकटू नको. तुझे पाय शाबूत ठेव.’

आपले पाय कितीदा लटपटतात. हे खरं की ते खरं म्हणून मनःस्थिती द्विधा होते; पण मागचा कुठलाच वारसा नसलेल्या निर्वात पोकळीत आपल्याला थोडंच जगता येतं? हा वारसा आपल्या पाठीशी आहे म्हणून तर आपण आजवर सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करू शकलो ना!

Web Title: editorial artical sheshrao mohite