वेगळ्या स्तरावरचं दुःख

शेषराव मोहिते
बुधवार, 17 मे 2017

आज खेड्यात शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. एक तर शेतीचा आकार  लहान झाल्यामुळे प्रत्येकास बैल-बारदाना ठेवून शेती करणे परवडत नाही. बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत. ट्रॅक्‍टर भाड्यानं घेऊन मशागत केली जाते. ज्यांच्या शेतीचा आकार मोठा आहे, त्यांनाही मजुरांच्या कमतरतेमुळे बैल-बारदाना मोडावा लागला आहे, आणि शेतीतील सर्व कामं यांत्रिक अवजारांच्या साह्यानेच करावी लागत आहेत. सुधारणेच्या बदल्यात काही गोष्टींचा त्याग करणं आवश्‍यकच असतं.

आज खेड्यात शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. एक तर शेतीचा आकार  लहान झाल्यामुळे प्रत्येकास बैल-बारदाना ठेवून शेती करणे परवडत नाही. बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहेत. ट्रॅक्‍टर भाड्यानं घेऊन मशागत केली जाते. ज्यांच्या शेतीचा आकार मोठा आहे, त्यांनाही मजुरांच्या कमतरतेमुळे बैल-बारदाना मोडावा लागला आहे, आणि शेतीतील सर्व कामं यांत्रिक अवजारांच्या साह्यानेच करावी लागत आहेत. सुधारणेच्या बदल्यात काही गोष्टींचा त्याग करणं आवश्‍यकच असतं. एकेकाळी शेतीतील यांत्रिकीकरणाच्या प्रवेशानं गायी, गुरे, बैल, वासरे यांच्या सान्निध्याने समृद्ध असलेलं भावविश्‍व कसं उद्‌ध्वस्त होतं आहे, यावर अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आनंद यादव यांची ‘गोतावळा’ ही कादंबरी हे त्याचं ठळक उदाहरण. तरीही खेड्यात, शेतीत जे बदल व्हायचे ते होतच राहिले.

एकेकाळी गायी-गुरांनी, म्हशी-बैलांनी गजबजून गेलेले जनावरांचे गोठे, वाडे आज ओस पडले आहेत. शिवारभर चरायला जाणाऱ्या जनावरांची संख्या नगण्य झाली आहे. आज जी काही दुभती जनावरं खेड्यात आहेत, ती दिवसभर दावणीला बांधून राहणाऱ्या जर्सी गायीसारखी जनावरं आहेत. ती काही मोठ्यानं हंबरतही नाहीत अन्‌ त्यांच्या पायधुळीनं संध्याकाळचं क्षितिज गुलाल उधळल्यासारखं दिसतही नाही. एखाद्यानं नवीन बैलजोडी विकत आणली, तर आठ-आठ दिवस त्या बैलजोडीचीच चर्चा गावात चालायची, तेही आता बंद झाले आहे.

एकेका बैलाने लहानपणी लावलेला लळा आपण पुढे आयुष्यभर विसरू शकत नाही. या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण ज्या ठिकाणी आज आहोत, तेथेच स्थिर राहायचं म्हटलं, तरी खूप वेगानं पळावं लागतं. या प्रचंड गतीने बदलणाऱ्या जगासोबत जुळवून घेताना आपली दमछाक होते. आज आपण ज्या प्रकारचं जीवन जगत आहोत, त्यापेक्षा कदाचित चांगलं जीवन भविष्यात आपणास जगता येईल. 

पण भूतकाळानं आपणास जे काही दिलं आहे, ते भविष्यात मिळेल काय याविषयी आपण नेहमी साशंक असतो. आज कुणी म्हणणं साहजिक आहे, की ही खेड्यातून आलेली माणसं स्वतः मोटारीतून फिरत असली तरी मनानं अजून बैलगाडीतूनच वावरत आहेत. म्हणणारे म्हणोत बिचारे! पण त्या परिस्थितीतून बाहेर पडतानाची अवस्थता, ती घालमेल या सर्वांतून आपण आलेलो असतो आणि तेच कडू-गोड अनुभव घेऊन पुढील वाटचाल करीत राहतो. बैल-बारदाना मोडला जाण्याचं दुःख तो ज्याचा मोडला त्यालाच कळू जाणे.  या अनुभवाने आपणही घायाळ झालेलो असतो, पण आपला काहीच इलाज नसतो. हे वेगळ्या स्तरावरचं दुःख आपल्या वाट्याला आलेले असतेच असते. पण या दुःखाची प्रतच वेगळी. आयुष्यभर पाय जमिनीवरच ठेवून वाटचाल करण्याचं बळ या दुःखानं दिलेलं असतं.

Web Title: editorial artical sheshrao mohite