तांबड्या मातीचे देणे 

ganpatrao andhalkar
ganpatrao andhalkar

आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे.

सहा- साडेसहा फूट उंची, पिळदार शरीरयष्टी, अंगावर चरबीचा लवलेशही नाही. शरीर कसे तालमीतल्या मेहनतीने कसलेले, पायात करकरणारी कोल्हापुरी वहाण...कोल्हापूरच्या रस्त्यावरून चालायला लागले की या देहरूपी शिल्पाकडे जणू पाहात बसावे. हे व्यक्तिमत्व "हिंदकेसरी' गणपतराव आंदळकरांचे. अर्थात, दोनेक वर्षांपूर्वीचे. त्यानंतर पक्षाघाताच्या झटक्‍यामुळे या शिल्पातील रया हरपली होती. असा हा उमदा मल्ल आता सर्वांच्या केवळ आठवणीत राहील. त्यांच्या कुस्ती बघायला मिळाल्या नाहीत, हे आजच्या तरुण पिढीचे दुर्दैव; पण त्यांच्याविषयी ऐकूनच त्यांचा उमेदीचा काळ डोळ्यांसमोर येऊन जातो आणि आपल्यासमोर उभा राहतो एक मुलखावेगळा मल्ल.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळ्यातील जन्म. शेतातील काम आणि तालमीतला सराव यामुळे लहानपणापासूनच शरीर कसदार बनत गेले. पुढे आजीने दत्तक घेतल्यावर आंदळकर पुनवत या गावी आले आणि कुस्तीसाठी तेथून कोल्हापूरला. मोतीबाग तालमीत बाबूराव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदळकरांच्या कुस्ती-कौशल्याला पैलू पडू लागले. आंदळकरांचा उमेदीचा काळ हा कुस्तीचा सुवर्णकाळ होता. खाशाबा जाधव कोल्हापुरातूनच सराव करून ऑलिंपिक पदकविजेते झाले होते. हिरे यांच्याकडून खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक कुस्तीचे धडे घेऊन स्पर्धेच्या आखाड्यात उतरलेल्या आंदळकरांनी पहिल्याच लढतीत केशव पाटील- भेडसगावकर यांना अस्मान दाखवले. येथूनच आंदळकरांच्या यशोगाथेला सुरवात झाली. त्यांच्यासमोर येणारा प्रत्येक मल्ल नामोहरम झाला. मोती पंजाबी, मंगल राय, हानिफ महंमद, सादिक पंजाबी या आणि अशा अनेक मल्लांना त्यांनी पराभूत केले. पाकिस्तानी मल्लांनी त्यांचा विशेष धसका घेतला होता. एकेक पाऊल पुढे टाकत "हिंदकेसरी' स्पर्धेसाठी त्यांची संघात निवड झाली. ते किताबी लढत खेळणार नव्हते. त्यामुळेच दुपारचे जेवण करून स्पर्धेतील अन्य लढती बघायला बसलेल्या आंदळकरांना संयोजकांनी अचानक किताबी लढत खेळण्याची गळ घातली. आव्हानासमोर डगमगतील ते आंदळकर कसले? "पिता-पुत्रातील लढत' अशीच या लढतीची चर्चा होती. प्रतिस्पर्धी खडकसिंग हे 54, तर आंदळकर 27 वर्षांचे होते. पित्यासमोर पुत्राचा कसा निभाव लागणार, अशी चर्चा सुरू झाली. किताबी लढतीसाठी 40 मिनिटांचा वेळ निश्‍चित करण्यात आला. महाराष्ट्राच्या या तरुण मल्लाचे कौतुक करायला त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ, बाळासाहेब देसाई असे दिग्गज उपस्थित होते. एकेरी पट, दुहेरी पट, चाप, खडी टांग अशा डाव- प्रतिडावांनी ही लढत रंगत गेली. अखेरच्या 13 मिनिटांत आंदळकरांनी दाखवलेली चपळता निर्णायक ठरली. निर्धारित 40 मिनिटांनंतरही कुस्ती निर्णायक होऊ शकली नाही; पण गुणांवर "हिंदकेसरी'चा कौल आंदळकरांनी मिळविला. एकेरी पट, लपेट, कलाजंग, एकलंघी ही आंदळकरांच्या कुस्तीची वैशिष्ट्ये. याच्याच जोरावर त्यांनी 1962 मध्ये जाकार्ता आशियाई स्पर्धेत ग्रीको रोमन आणि फ्री-स्टाईल प्रकारात पदक मिळविण्याची मुलखावेगळी कामगिरी केली. ग्रीकोरोमनमध्ये सुवर्ण आणि फ्री-स्टाईलमध्ये त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली. फ्री-स्टाईलचे सुवर्णपदकही त्यांचे होते; पण लढत बरोबरीत सुटल्यावर नियमानुसार केवळ काही ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण, भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. मॅटचे तंत्र आधी त्यांनी स्वतः अंगीकारले आणि नंतर ते महाराष्ट्रात रुजवायला सुरवात केली. आखाड्यात मल्ल घडवताना त्यांनी कधीही "वस्तादगिरी' दाखवली नाही. प्रत्येक मल्लाला मुलासारखे जपले. त्यांच्या डोळ्यांत धाक होता; पण त्यांची भीती कधीच वाटली नाही. मल्लही त्यांच्याकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्यायचे. मॅटचे तंत्र प्रगत करताना त्यांनी लाल मातीशी असलेली नाळ कधी तोडली नाही. महाराष्ट्रीय मंडळाशी त्यांचे अतूट नाते होते. प्रजासत्ताकदिनी मंडळात होणाऱ्या लाल मातीच्या मैदानाला ते दरवर्षी आवर्जून उपस्थित राहायचे. पैलवानकीमुळे कमावलेल्या शरीराच्या जोरावर कोणी पैलवानाने समाजात आपले वजन वापरू नये, याकडे त्यांचा सदैव कटाक्ष राहिला. अशा माणसांमुळेच खेळ पुढे जातो. खेळावरील त्यांच्या अविचल निष्ठेमुळे त्या एक "संस्था'च बनून जातात. अशा "संस्था' आताच्या काळात कमी होत चालल्या असल्याने आंदळकरांचे निधन जास्त चटका लावून जाते. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. आता त्यांचा वारसा जपणे आणि महाराष्ट्रातून ऑलिंपिक विजेता निर्माण होणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com