बळ भारताला; झळ चीनला (मर्म)

Solih
Solih

सुमारे वर्षभर भारताला डोकेदुखी ठरलेल्या छोट्याशा मालदीवमधील जनतेनेच तेथील अध्यक्ष आणि स्वतःला सर्वेसर्वा समजून राज्यकारभार करणाऱ्या अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवली.

मतदारांनी इब्राहिम सोलीह यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारून लोकशाही प्रक्रियेची ताकद दाखवली आहे. विस्तारवादी चीनने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि व्यूहरचनात्मकदृष्ट्या मोक्‍याच्या; तसेच बाजारपेठ म्हणून आपल्याला उपयुक्त ठरतील अशा देशांना आपल्या पंखाखाली आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधांसह विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी भरमसाट कर्जे देत तिजोरी खुली करायची आणि कर्जाच्या ओझ्याखाली त्यांना दाबून त्यांचे शोषण करायचे धोरण ठेवले आहे.

या जाळ्यात मालदीव अडकला आहे. त्याच्या माथ्यावर चीनचे दोन अब्ज डॉलरवर ओझे आहे. चीनने ११९२ बेटांचा समूह असलेल्या मालदीवची सात-आठ बेटे विकसित करत गंगाजळी ओतली आहे. परिणामी, मावळते अध्यक्ष यमीन यांनी भारताशी असलेली परंपरागत मैत्री धुळीला मिळवण्याचा चंग बांधला. भारताच्या दृष्टीने हिंद महासागरातील मालदीवचे महत्त्व लक्षात घेऊन तेथे ठेवलेली हेलिकॉप्टर घेऊन जा, असा तगादा लावला. तथापि, भारताने संयम बाळगला. आतापर्यंत मालदीवचे एकेकाळचे सर्वेसर्वा महम्मद अब्दुल गयूम असोत, नाहीतर मानवी हक्काचे पुरस्कर्ते मोहम्मद नशीद, त्यांनी भारतालाच साथ दिली. त्याची परतफेडही भारताने वेळोवेळी केली.

मात्र, यमीन यांनी मालदीवला चीनच्या वळचणीला बांधताना लोकशाहीचा गळा घोटला. प्रसारमाध्यमांवर बंदी आणली. विरोधकांची मुस्कटदाबी करत त्यांच्यावर खटले चालवले. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनाही गजाआड केले. देशावरील आपली मांड पक्की करण्यासाठी यमीन यांनी निवडणुकांचा घाट घातला; पण तो त्यांच्यावर उलटला.

विरोधकांनी एकमुखी पाठिंबा दिलेले इब्राहिम सोलीह यमीन यांच्यापेक्षा १६ टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळवून अध्यक्षपदी निवडून आले. हा यमीन व त्यांच्यामागे दडलेल्या चीनला दणका आहे. मलेशिया आणि श्रीलंकेला मदतीच्या ओझ्याखाली दाबणाऱ्या चीनचे खरे रूप कळल्याने त्यांच्याप्रमाणेच मालदीवमध्येही चीनविरोधाची धार तीव्र होत आहे. तरीही सगळेच चित्र सोलीह यांच्या निवडीने वेगाने बदलेल, असे मानणे चुकीचे ठरेल. भारताचे मालदीवसोबतचे संबंध पूर्ववत व्हायला काही अवधी लागेल, तथापि प्रक्रिया सुरू होण्यातील अडथळे दूर झालेत, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com