दो जिस्म, मगर एक जान! (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटचे तडाखे दाखवणारा नवज्योतसिंग सिद्धू आजच्या तरुणाईला ठाऊक आहे, तो तसेच फटके "कॉमेडी शो'मध्ये मारण्याबद्दल! मात्र, आता त्याच्यापेक्षाही आपण अधिक बोलबच्चन आहोत हे त्याची पत्नी नवज्योत कौरने दाखवून दिले आहे. भाजपने बहाल केलेल्या खासदारकीचा सिद्धूने राजीनामा दिला, तेव्हापासून कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष या दोहोंनीही सिद्धूने आपल्याच छावणीत यावे म्हणून गळ टाकले होते.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटचे तडाखे दाखवणारा नवज्योतसिंग सिद्धू आजच्या तरुणाईला ठाऊक आहे, तो तसेच फटके "कॉमेडी शो'मध्ये मारण्याबद्दल! मात्र, आता त्याच्यापेक्षाही आपण अधिक बोलबच्चन आहोत हे त्याची पत्नी नवज्योत कौरने दाखवून दिले आहे. भाजपने बहाल केलेल्या खासदारकीचा सिद्धूने राजीनामा दिला, तेव्हापासून कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष या दोहोंनीही सिद्धूने आपल्याच छावणीत यावे म्हणून गळ टाकले होते. तोंडावर आलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत जो पक्ष त्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करेल त्या पक्षात तो जाईल, असे वातावरण असतानाच प्रियांका गांधी यांनी सिद्धूची भेट घेतली आणि त्याच्या कॉंग्रेसप्रवेशाच्या वावड्यांना पुनःश्‍च जोर आला.

प्रत्यक्षात सिद्धूऐवजी कॉंग्रेसप्रवेश केला तो त्याची पत्नी नवज्योत कौरने! त्यांच्यासोबत प्रख्यात हॉकीपटू परगटसिंग हाही कॉंग्रेसवासी झाला आहे. नवज्योत या भाजपच्या तिकिटावर पंजाबमधून निवडून आल्या आहेत, तर परगट हाही आमदार असून, तो अकाली दलाच्या तिकिटावर विजयी झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्याने पक्षत्याग करत आमदारकीचाही राजीनामा दिला. आता हे दोघे कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे साहजिकच कुतुहलाची बाब निर्माण झाली ती सिद्धू काय करणार, याबाबत. मात्र, सिद्धूने याबाबत मौनच बाळगले आहे.

नवज्योत कौर यांना याबाबत थेट सवाल केला असता, त्यांनी दिलेले उत्तर अगदीच मासलेवाईक होते. "आम्ही दोघे म्हणजे दो जिस्म, मगर एक जान हैं...' असे सांगून त्या म्हणाल्या : "...आणि आत्मा हा किती काळ देहाच्याबाहेर राहू शकेल?' याचा अर्थ स्पष्ट आहे. सिद्धूने "आप'ला मधाचे बोट लावले होते खरे; पण आता तो कॉंग्रेसप्रवेश करणार यावर जवळपास शिक्‍कामोर्तब झालेले दिसते.

अमृतसरची खासदारकी बरेच काळ सांभाळणाऱ्या सिद्धूला डावलून तेथून 2014 मध्ये अरुण जेटली यांना उमेदवारी देण्याचा जुगार भाजपच्या अंगाशी आला आणि जेटली यांना पराभूत व्हावे लागले. आपल्याला डावलल्याचा राग सिद्धूच्या मनात असणार, हे उघड आहे. आता कॉंग्रेस त्यास मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणार काय, एवढेच कुतूहल काय ते बाकी आहे.

Web Title: editorial article