अग्रलेख : नवे शिलंगण!

Politics
Politics

सकाळ झाली. दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका, घोरत काय पडलाहेस? आज दसरा. शिलंगणाचा दिवस. ऊठ, तोंड विसळ. स्नान कर आणि बाहेर चालता हो कसा?’’ त्यावर मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसले व तो निऱ्हानाम घोरू लागला. ते पाहून पित्त खवळलेल्या मोऱ्याच्या बापाने दातओठ खात त्याचे पांघरूण खस्सदिशी ओढले व तो ओरडला, ‘‘मोऱ्या, निवडणुकीचे रणांगण विसबावीस दिवसांवर आले. खंडेनवमीच्या निमित्ताने शस्त्रपूजन आदी करोन जनलोक शिलंगणाला बाहेर पडलीसुद्धा. त्वां येथे निव्वळ घोरत पडलाहेस, अशाने कसे भले होणार लोकशाहीचे?’

त्यावर एक गडगडाटी सुस्कारा टाकत मोऱ्याने हातपाय ताणून आळस दिला आणि चिंतनयुक्‍त आवाजात तो म्हणाला, ‘‘बाप हो! राग आवरावा. कां की, लोकशाहीस काहीएक झालेले नाही, ती अत्यंत सशक्‍त आणि सुशेगाद अवस्थेत आहे. किंबहुना, लोकशाहीची इतकी भली अवस्था गेली सत्तर वर्षे नव्हती.’’ मोरूचे विचारसौंदर्य पाहून हतबुद्ध झालेल्या मोरूपित्याच्या मुखातून शब्द काही फुटेना. जन्मदात्याची तुर्यावस्था पांघरूणाच्या आत अंतर्ज्ञानाने ओळखून मोरू पुढे म्हणाला, ‘‘औंदाच्या निवडणुकीत कोण कोणातर्फे कोठे उभे राहिले आहे, हे सांगणे अंमळ कठीण झाले आहे. प्रश्‍न जनतेच्या प्रतिनिधित्वाचा आहे. कुण्या पक्षाचा नव्हे! इतकी राजकारणविरहित निवडणूक तुमच्या पाहण्यात आहे काय? हे सशक्‍त लोकशाहीचे लक्षण नव्हे काय? लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य म्हणजेच लोकशाही ना?’’ मोऱ्याच्या जन्मदात्याने आवंढा गिळला. तो पुरेपूर गिळून तो खोल आवाजात म्हणाला, ‘‘यालाच लोकशाही म्हणायचे, तर आयाराम-गयारामांच्या संधिसाधू राजकारणाला नैतिक अधिष्ठान असल्याचेच मानावे लागेल. निवडणुकांना काही अर्थच उरणार नाही!’’

‘‘निवडणुकांना तसाही फारसा अर्थ नाही. कारण, त्यातील चार्म आता निघून गेला आहे. एका हाटेलात इडली खाऊन दुज्या हाटेलीतील भजी खाण्यासाठी ज्याप्रमाणे कोणीही जाऊ शकते, त्याचप्रमाणे हल्ली कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ अथवा येऊ शकते. विचारधारांची लढाई आता लुप्त होत जाणार. येथून पुढे सारेच सत्ताधारी पक्षात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सामील होणार.

विरोध, विरोधक औषधालादेखील सापडणार नाहीत, हे आपण लिहोन ठेवावे.’’ ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे सर्व जळ अखेर समुद्रार्पण होते, तस्मात सारी मते कोणालाही दिली, तरी ती दिल्लीस्थित एकाच तारणहाराच्या चरणकमळी रुजू होतात, हे नव्या भारताचे सत्य आहे. तेव्हा निवडणुकीस युद्ध, रणांगण, लढाई असे काही म्हणो नये, बाप हो!,’’ डोईवरील पांघरूण न काढताच मोरेश्‍वराने केलेला युक्‍तिवाद ऐकून मोरूपित्याला भरून आले. तरीही, तो मोरूचाच पिता असल्याने त्यानेही विक्रमादित्यासारखा हट्ट सोडला नाही. तो पुढे म्हणाला,‘‘काय बडबडतोहेस? विरोधक नसतील तर लोकशाही कशी असेल? हा बुद्धिभेद तुझ्यापास ठेव, मोऱ्या!’’

शांतता यत्किंचितही ढळू न देता मोरू म्हणाला, ‘‘विरोधक हवेत कोणाला? खुद्द विरोधकांनाच विरोधाचा कंटाळा आला असून, कधी एकदा सत्तेत समाविष्ट होतो, असे त्यांना झाले आहे. कारण, त्यांच्यावर वशीकरणाच्या प्रयोगाखातर ईडीलिंबू घुमवले गेले आहे. सत्तेत राहून विरोधकांप्रमाणे वागणारे मित्र येथे आहेत आणि गमतीखातर थोडका विरोध करून वेळवखत पाहून खुर्ची बळकावणारे विरोधीजनदेखील आहेत. मुदलात जनतेलाही विरोधक कोठे हवे आहेत? तेव्हा निवडणुकीचे कालबाह्य कारण देऊन मज गरीब तरुणाची झोपमोड करो नये, ही प्रार्थना!’’ मोरूचा बाप विचारात पडला.

बराच वेळ दाढी खाजविल्यावर तो त्याने पुशिले, ‘‘म्हणजे निवडणुकीला काहीच अर्थ राहिला नाही, असे तुझे म्हणणे आहे काय?’’ ‘‘निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. उत्सव म्हणजेच इव्हेंट. इव्हेंट म्हटले की रंगारंग कार्यक्रमांची बौछार आली, पाठोपाठ मनोरंजन आले. अवघा देश ज्या रंगात सचैल न्हातो असे या देशात दोनच तर रंग आहेत, एक निवडणूक आणि दुसरा क्रिकेट! बाकी सारे बेरंग आहे बापहो!’’ मोऱ्याच्या आवाजाला सॉक्रेटिसाच्या चिंतनशीलतेची बैठक होती. ‘‘मोऱ्या, मग इलेक्‍शन आले की आम्ही पामर मतदारांनी कसे वागावे, तेही सांगून टाक!’’ मोरूपिता म्हणाला. ‘‘राजकारणाचा पोत बदलतो आहे. राजकारण्यांचाही रागरंग बदलतो आहे.

तेव्हा मतदारानेही स्वतःस बदलणे भाग आहे. अखेर जगात बदल हीच एक गोष्ट सातत्यपूर्ण आणि शाश्‍वत आहे. तेव्हा आपल्या गल्लीतील प्रतिनिधीने काश्‍मीरप्रश्‍नी काही मुद्दा मांडला असता त्याला प्रतिवाद करून गल्लीतील नालेसफाईचा मुद्दा उकरणे काही योग्य होणार नाही. हल्ली कोठलीही निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवरच लढली जाते, हे लक्षात ठेवावे. एवंच केल्यास अच्छे दिनांच्या आगमनाला अपशकून होणार नाही.’’ मोऱ्या मोऱ्या, बालिष्टर का नाही रे झालास? हा सुप्रसिद्ध व तितकाच इमोशनल सवाल करण्याची उबळ मोरूपित्याने दाबली आणि मोरूने केलेल्या ‘वैचारिक सीमोल्लंघना’चा नेमका अर्थ काय, या विचारात ते गढून गेले. आता हा अर्थ तुम्ही, आम्ही सर्वांनीच समजावून घ्यायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com