अग्रलेख - एका पक्षाचे ‘रण’रुदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सुस्तावलेली पक्ष संघटना, निर्णयप्रक्रियेचे दरबारीकरण आदी प्रश्‍नांवर काँग्रेसने वेळीच उपाययोजना करायला हवी होती. ती न केल्याने आजची स्थिती ओढवली आहे.

सुस्तावलेली पक्ष संघटना, निर्णयप्रक्रियेचे दरबारीकरण आदी प्रश्‍नांवर काँग्रेसने वेळीच उपाययोजना करायला हवी होती. ती न केल्याने आजची स्थिती ओढवली आहे.

देशाचे भौतिक हवामान कमालीचे चंचल, अनिश्‍चित बनत असताना राजकीय हवामान मात्र अधिकाधिक ठोकताळेयुक्त आणि अंदाजबरहुकूम बनत चालले आहे. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अनिष्टच. याचे कारण संसदीय लोकशाहीतील स्पर्धा हीच मतदाराला ‘राजेपण’ बहाल करीत असते. पण, त्या स्पर्धेतली चुरस आणि जोम संपुष्टात आला, तर त्या स्थानाला बाधा येते. महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभा निवडणुकीचे रणमैदान समोर दिसत असताना आपल्या सैनिकांना स्फुरण देण्याऐवजी, त्यांच्यात विजयाची जिद्द निर्माण करण्याऐवजी काही काँग्रेसजन हताशा व्यक्त करताहेत. थकल्याची कबुली देत आहेत. एकेकाळी जो केवळ सत्ताधारी पक्षच नव्हे, तर देशाचा मध्यवर्ती राजकीय प्रवाह मानला जात होता; त्या पक्षाच्या अध्यक्षाने पराभवाच्या धक्‍क्‍यानंतर जबाबदारीचे सुकाणू खाली ठेवावे, प्रचारासाठी महाराष्ट्रात केवळ दोन दिवसांचा दौरा आयोजित करावा आणि काही नेत्यांनी श्रेष्ठींना आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्यासाठी नेमकी हीच वेळ निवडावी, ही सगळीच लक्षणे काँग्रेसविषयी चिंता निर्माण करणारी आहेत.

अरण्यरुदनातही व्यथा असते. पण, ते इतरांना ऐकू येत नाही. काँग्रेसमध्ये सध्या जे चालू आहे, ते ‘रण’रुदन असून, इतरांनाही हतोत्साहित करणारे असल्याने त्याची दखल घ्यायला हवी. सलमान खुर्शीद काय किंवा सुशीलकुमार शिंदे काय, हे नेते दीर्घकाळ पक्षाच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत.

पक्षाची घसरण काही एखाद्‌ दुसऱ्या दिवसात झालेली नाही. सुस्तावलेली पक्षयंत्रणा आणि संघटना, निर्णयप्रक्रियेचे दरबारीकरण आणि व्यक्ती वा घराण्याचे अवाजवी प्रस्थ, यांविषयी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवण्याचे धैर्य दाखवले नाही. आता मात्र ते बोलू लागले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्यानेही खुर्शीद यांच्या सुरात सूर मिसळला आहे.  पक्षातील अनेक जण भाजपच्या वा शिवसेनेच्या तंबूत डेरेदाखल होण्यासाठी रांगा लावत असले तरी मोठ्या आशेने नेतृत्वाकडे नजर लावून बसलेले लोकही पक्षात आहेत. त्यांना प्रेरणादायी असे काही ऐकू येण्याऐवजी त्यांच्या कानावर  पडताहेत त्या विलापिकाच.

सध्या काँग्रेस पक्षापुढील आव्हान बहुपदरी आहे. पक्षात उत्साह निर्माण करणे, सगळे काही संपलेले नाही, असा विश्‍वास कार्यकर्त्यांना देणे, हे त्यापैकी एक. दुसरे म्हणजे, भारतीय जनता पक्षाने उभ्या केलेल्या ‘नॅरेटिव्ह’ला पर्याय उभा करणे. त्यासाठी आधी पक्षांतर्गत पातळीवर भरपूर आणि मोकळे मंथन होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या वैचारिक जागरणातून मजबूत पर्याय उभा करता येईल. त्यासाठी विविध नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. पण, त्यासाठी संघटनेत उत्स्फूर्त कृतीला वाव असावा लागतो. तसे पक्षातील जिवंत झरे टिकविण्याऐवजी ते व्यक्तिगत निष्ठेच्या अवाजवी आग्रहाखाली बुजवून टाकण्यात आले. महाराष्ट्र हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तेथे आज मात्र संपूर्ण राज्यातील संघटनेत चैतन्य निर्माण करू शकेल असा चेहरा दिसत नाही. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांनी सूत्रे हाती घेतली खरी; परंतु नगर जिल्ह्यापलीकडे त्यांचे आवाहन पोचत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही आपल्याच मतदारसंघात गुंतलेले आहेत.

अशावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बघायचे कोणाकडे? वास्तविक, अशा वेळी राहुल गांधींसारख्या नेत्याची आठवण काढायला हवी, ती काँग्रेसजनांनी. सध्या औपचारिकरीत्या सूत्रे सोनिया गांधींकडे असली, तरी राहुल गांधींची भूमिका आणि जबाबदारी टळली, असे होत नाही. त्यामुळे त्यांनी दौरे करावेत, यासाठी काँग्रेसजनांनी धडपड करायला हवी होती.

प्रत्यक्षात त्यांची आठवण येत आहे, ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना! ‘कुठे आहेत, राहुल गांधी’ असा प्रश्‍न जाहीररीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करावा आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही तीच भाषा करावी, याला काय म्हणायचे? समोर काँग्रेसनामक ठसठशीत ध्रुव नसेल, तर प्रचाराला धार आणण्याच्या कामी भाजपनेत्यांचीही पंचाईत होते, एवढाच त्याचा अर्थ. ते असो. पण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या राज्यातील एकेकाळच्या मातब्बर नेत्याने रणदुंदुभी वाजू लागल्यानंतर ‘सीदन्ती मम गात्राणी...’ असे म्हणावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थितीही तशीच झाल्याचे सांगून मित्रपक्षाच्या उमेदीवरही विरजण टाकावे, हा प्रकार काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीविषयी बरेच काही सांगून जातो. त्या अवस्थेतून पक्षाला बाहेर काढणाऱ्या लढाऊ वृत्तीच्या नेत्याची आज गरज आहे. तसा तो मिळाला, तरच राजकीय लढाईत रंग भरेल, लोकहिताचे मूलभूत प्रश्‍न ऐरणीवर येतील आणि मतांच्या या संघर्षात सर्वसामान्य मतदाराचे स्थानही उंचावेल. सध्या तरी दिसते आहे, ती मरगळ आणि राजकीय हवामानात तयार झालेली ‘अतिनिश्‍चिती’.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article