BJP
BJP

मर्म : भाजपमधील खदखद

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये सुरू झालेली खदखद राजकारणाच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सांगणारी आहे. गेली चारेक वर्षे प्रमुख मंडळींपैकी एकनाथ खडसे तेवढे स्वपक्षाच्या सरकारवर नाराज होते. तुलनेत नाथाभाऊंचे मंत्रिपद जरा लवकर गेले. त्यामुळे ते अस्वस्थ होते खरे; पण त्यांनी सत्तांतराचे वर्तुळ पूर्ण होईपर्यंत संयम पाळला. राज्यात भाजपेतर तीन पक्षांचे सरकार आल्याबरोबर नाथाभाऊंनी ‘पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षांतर्गत कारवायांमुळे झाला’ असे वक्तव्य करून बाँबगोळा टाकला. भरीस भर म्हणून पंकजा मुंडे १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आणि त्या वेळी नाथाभाऊ, प्रकाश मेहता, विनोद तावडे, किरीट सोमय्या आदी ‘नाराज’ मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. ‘बंडखोरी माझ्या रक्तात नाही,’ असे पंकजांनी स्पष्ट केले असले, तरी अस्वस्थता लपलेली नाही.

सध्या हे जे काही सुरू आहे, ते भाजपच्या प्रतिमा- परंपरेला शोभेसे नाही. हा पक्ष काँग्रेसपेक्षा वेगळा आहे, संघाच्या मुशीत तयार झाल्याने त्यात मतभेदांना जागा नाही इत्यादी गोष्टी दंतकथा होत्या हेच यातून समारे येते. शुचिता, सभ्यता, पक्षनिष्ठा आदी गोष्टींचे कितीही डिंडिम पिटले जात असले तरी भाजपचे पाय इतर पक्षांसारखे मातीचेच आहेत, असे हा घटनाक्रम सांगतो. अंधारातला शपथविधी आणि त्यानंतरच्या घडामोडींनी भाजपचा खरा चेहरा समोर आणलाच. अस्वस्थ नि नाराज नेते यांच्यापैकी कुणी स्पष्टपणे नाव घेत नसले, तरी या साऱ्यांचा रोख मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असावा असे दिसते. कारण प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री व आता विरोधी पक्षनेते म्हणून गेली पाच-सहा वर्षे तेच महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत. राजकारणी एकमेकांवर स्पर्धक म्हणून नाराज असतातच, पण, नेत्यावर अधिक नाराज असतात.

त्याला फडणवीस अपवाद नाहीत. काही घटनाक्रम त्यासाठी अर्थातच कारणीभूत ठरणारे आहेत. भाजपसारख्या ‘चाणक्‍यबहुल’ पक्षातून स्वतःचा गट स्थापून काही नेते बाहेर पडले तर त्या पक्षातच मोठा दुभंग निर्माण होईल आणि बहुजन स्वर अधिक उंचावेल. तसे प्रत्यक्षात झाले नाही तरी पक्षाच्या प्रतिमेचे नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे आणि श्रेष्ठींनी काळाची पावले ओळखून ठोस निर्णय न घेतल्यास हे नुकसान कायमचे त्रासदायक ठरेल, हेही तेवढेच स्पष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com