अग्रलेख : प्रकाशाचे ‘कंकण’

Solar-Eclipse
Solar-Eclipse

ग्रहणाविषयीची भीती, शंका, अपसमज यांच्या अंधाराचे जाळे फिटले, असे म्हणण्याजोगी स्थिती अद्याप आपल्या समाजात आली नसली तरी, अधूनमधून दिसणारे आशेचे कवडसेही दखल घेण्याजोगे आहेत. ग्रहण पाहण्याची गुरुवारी समाजाच्या अनेक थरांत दिसलेली असोशी या बदलांचे एक रूप निश्‍चितच म्हणता येईल. या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अद्‌भुतरम्य दृश्‍य गुरुवारी सकाळी अनेक विद्यार्थी, अभ्यासक, जिज्ञासू, विज्ञानप्रेमी आदींनी मोठ्या उत्साहाने पाहिले.

महाराष्ट्रातून अनेक गट कर्नाटक, केरळ, तमिळनाडूत आदल्या दिवसापासूनच मुक्काम ठोकून होते. अवकाशातील हा नयनरनम्य सोहळा त्यांनी पाहिला आणि त्यानिमित्ताने त्यामागचे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, विज्ञानसंस्था यांनी या घटनेचे निमित्त साधून विज्ञानविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका ओळीत व एका प्रतलात आल्यास ग्रहण घडते. चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकले नाही. गुरुवारी सूर्योदयानंतर थोड्याच वेळात दक्षिणेकडील भागातून पाहणाऱ्यांना त्यामुळेच सूर्यबिंबाची झळाळती कडा दिसली. जणू सोन्याचे कंकणच. महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. त्या वेळी दिसलेल्या सूर्यकोरीदेखील विलक्षण सुंदर दिसत होत्या, हे वेगळे सांगायला नको. काही ठिकाणी मात्र ढगांनी दाटी केल्याने विज्ञानप्रेमींच्या पदरी निराशा पडली. देशभरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या विज्ञानसोहळ्यात सहभागी झाले, ही समाधानाची बाब. खरे म्हणजे ही निसर्गनियमांनुसार घडणारी ही घटना. पण त्यात जे अपार सौंदर्य आहे, ते शब्दांनी वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे. ते कोणी घडवून आणले आणि कशासाठी, असेही अनेक प्रश्‍न स्वाभाविकपणेच मनात येतात.

कांट ज्याला ‘हेतूरहित हेतूपूर्णता’ (purposiveness without a purpose) म्हणतो, त्या सौंदर्याची ही प्रतीती. जेमतेम तीन मिनिटांचा हा सोहळा; पण तो ‘याचि देही, याची डोळा’ पाहायला मिळणे, ही खरोखरच सुवर्णसंधी. ती तीन मिनिटे कधी संपूच नयेत, असे वाटल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली, ती त्यामुळेच. पण असा आनंद घेण्याच्या स्थितीपर्यंत येण्यासाठी माणसाला खूप प्रयास पडले आहेत. निसर्गातील कार्यकारणभाव जसा त्याला कळू लागला, तो समजून घेण्याचा विवेक जसा माणूस दाखवू लागला, तसतसा त्याचा आत्मविश्‍वास वाढला. नाहीतर निसर्गातील वेगवगळ्या घटना म्हणजे चमत्कार वा देवाचा कोप, असे मानले जात होते. त्यातूनच अनेक अंधश्रद्धा तयार झाल्या. खेदाची बाब अशी, की अद्यापही आपण त्यातून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही. ग्रहणाचे विज्ञान समजून घेण्यासाठी उत्सुक असलेले प्रकाशयात्री जसे गुरुवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत दिसले, त्याचवेळी गतानुगतिक रूढी-प्रथांच्या कर्दमात रममाण होणाऱ्यांची संख्याही कमी नाही. समाजातील ही दोन परस्परविरोधी चित्रे यानिमित्ताने समोर आली. ती आपला समाज अद्यापही वेगवेगळ्या शतकांमध्ये जगतो आहे, हे दाखविणारी आहेत. ग्रहण संपताच अनेक गावांमधून देवळे धुण्याचा कार्यक्रम जोरात सुरू होता.

एका गावात तीन दिव्यांग मुलांना ग्रहणकाळात खड्ड्यात बसविण्यात आले. तसे केल्याने अपंगत्व दूर होते, अशी समजूत. रोगराई, दुष्काळ वा युद्धाच्या घटना घडतात, त्याही ग्रहणामुळे, अशीही घट्ट धारणा अनेकांच्या मनात रुतून बसलेली आहे. हे केवळ अशिक्षितांमध्ये आणि ग्रामीण भागांतच आहे आणि शहरी भाग विज्ञानजाणीवांनी संपन्न आहे, असे मात्र अजिबात नाही. उलट जुनाट समजुतींना आधुनिक पारिभाषिक सज्ञांचे लिंपण करून त्या चकचकीत वेष्टनात बसविणाऱ्यांची शहरी बुवाबाजीदेखील तितकीच फोफावलेली आहे. ती जास्त धोकादायक आहे, याचे कारण ती विज्ञानाचा मुखवटा पांघरून येते. नुसते उच्चभ्रूच नव्हे, तर सत्तेत बसलेले अनेक जणही अशा धारणा बाळगणारे असतात. ‘गणपती दूध पितो’, असे कोणीतरी सांगताच वाट्या घेऊन धावणाऱ्या लोकांप्रमाणे तर्क खुंटीला टांगून ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. डार्विनचा उत्क्रांतिवादच चुकीचा ठरविण्यापर्यंत सत्यपालसिंह यांच्यासारख्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांची मजल जाते, यावरून विज्ञानाकडे पाठ फिरविण्याचा मक्ता काही अशिक्षितांकडेच नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळेच विज्ञानप्रसारकांचे काम सोपे नाही. ते अथकपणे करावे लागेल. अशा कामाचे कंकण हाती घेतलेले लोकच भारताचे चित्र बदलतील, याचे कारण ते ‘प्रकाशाचे कंकण’ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com