एक ‘प्रसून’ पहाट

एक ‘प्रसून’ पहाट

केंद्रीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची अचानक उचलबांगडी होणे आणि त्यांच्या जागी सृजनशील लेखक, गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्‍ती होणे, ही खरे तर गेल्या तीन वर्षांतील कदाचित सर्वांत चांगली सांस्कृतिक घटना मानावी लागेल. प्रसून जोशी हे जाहिरात, हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी साहित्य-काव्याच्या क्षेत्रातील एक बडे नाव. सेन्सॉर बोर्डाला अशा तोलामोलाचा प्रमुख मिळणे, ही खरे तर काळाची गरजच मानायला हवी. उत्तराखंडातील नैनितालसारख्या निसर्गरम्य पर्वतराजींतील हिरवाईचा गंध प्रसून यांच्या लेखणीला लाभला आहे. अलमोरा या हिरव्यागार गावात त्यांचे बालपण गेले. अर्थात, काव्यरसविनोदात रमलेल्या प्रसून यांनी अभ्यासातही कायम अव्वल दर्जा राखला. व्यवस्थापन कौशल्याची प्रतिष्ठित ‘आयआयएम‘मध्ये पदवी मिळवून त्यांनी बहुराष्ट्रीय जाहिरात कंपनीत आपला विलक्षण ठसा उमटवलाच. एकीकडे कॉर्पोरेट कारकीर्द आणि दुसरीकडे प्रतिभेच्या भराऱ्या अशा दुहेरी अश्‍वांवर स्वार होण्याची किमया त्यांना साधली.

‘भाग मिल्खा भाग’सारख्या चित्रपटाचे संवाद असोत, किंवा आमीर खानच्या ‘तारें जमीं पर’मधली भावस्पर्शी गाणी असोत, चितगाँग : द अपरायझिंग’ चित्रपटातील ‘बोलो ना’ हे अर्थवाही गाणे असो किंवा ‘थंडा मतलब कोकाकोला’सारख्या दिलखेचक जाहिराती असोत, त्यांची कल्पकता त्या साऱ्या कलाकृतींना सोनेरी स्पर्श करुन गेली. रसिकांनी ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट वानगीदाखल आठवावा! दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रसून यांचे भारतीय जाहिरात क्षेत्रातील योगदान तर केवळ अपूर्व. आधुनिक, आणि तरीही अभिरुचीची जाण असलेले तरुण व्यक्‍तिमत्त्व म्हणून ते अभिजनांमध्ये ओळखले जातात. वयाच्या १७व्या वर्षीच त्यांनी ‘मैं और वो’ हे पुस्तक लिहून मान्यवरांना आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. गेल्या वर्षी जयपूरच्या साहित्योत्सवात त्यांच्या ‘सनशाइन लेन्स’ या गीतसंग्रहाने साऱ्यांना भुरळ घातली होती. सारांश, गोविंदा छाप उटपटांग चित्रपटांची छुटपूट निर्मिती करून चित्रपट निर्माते ठरलेल्या निहलानी यांच्या पुढ्यात प्रसून जोशी यांचे कर्तृत्व अफाटच म्हणावे लागेल. नव्या माहिती-प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी खात्याची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या हा बदल झाल्याचे दिसते. चांगल्या गोष्टींचे स्वागत करायलाच हवे. सुटकेचे निश्‍वास आणि स्वागताच्या टाळ्या एकत्र येण्याचे योग हल्ली फार कमी ऐकू येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com