भाष्य : मोजणी बिबट्यांची, टोचणी त्रुटींची

भाष्य : मोजणी बिबट्यांची, टोचणी त्रुटींची

बिबळ्यांच्या ताज्या गणनेचे तपशील नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. अधिवास नाहीसे होणे, भक्ष्य संपणे, अशा विविध कारणांमुळे आशियातील त्याच्या पसरणीचे आणि विखुरले जाण्याचे क्षेत्र आक्रसले आहे. वन्यजीव तस्करीच्या व्याप्तीचा अंदाज घेता बिबळ्या सुरक्षित नाही, हे स्पष्ट होते.

भारतातील बिबळ्यांच्या ताज्या, २०१८ मधील गणनेचे तपशील प्रसिद्ध झाले आहेत. (https://bit.ly/3rJG0nu) वलयांकित अशा व्याघ्रगणनेच्या मानाने त्यातील साधकबाधक तपशील कमी चर्चिले गेले. पट्टेरी वाघाचे हे देखणे भावंड काहीशा अतिपरिचयामुळे अशा अवज्ञेचे धनी होत आले आहे. ऐतिहासिक काळी, बिबळ्या ह्या मार्जारकुलीन रुबाबदार प्राण्याच्या वास्तव्याचे जगभरातले क्षेत्र होते तीन कोटी ५० लाख चौरस किलोमीटर. सहारातील उत्तर आफ्रिकी प्रदेशापासून ते अतिपूर्वेकडील रशियातल्या पार अमूर दऱ्यांपर्यंत इतके विशाल. जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या सृष्टी-व्यवस्थांत तो आढळतो. कोरडी वाळवंटे आणि वृक्षरेषा संपल्यानंतरच्या अति उंचीवरील हिमालय हाच काय तो अपवाद. त्याआधीच्या ५२०० मीटर उंचीपर्यंत, हिमालयात तो आपला चुलत भाऊ हिम-बिबळ्याबरोबर अधिवास वाटून घेतो. भरपूर वीण होणारा हा प्राणी आहे;मध्य भारतात त्याची वाढ वार्षिक १० टक्के इतकीदेखील झाल्याची उदाहरणे आहेत. 

अधिवास नाहीसे होणे,भक्ष्य संपणे, मनुष्य-प्राण्याशी संघर्ष, चोरटी शिकार ह्या नेहमीच्या यशस्वी’ मानवनिर्मित कारणांमुळे आशियातील त्याच्या पसरणीचे आणि विखुरले जाण्याचे क्षेत्र आता मात्र ८३-८७ टक्के इतके घटले आहे. (जेकबसन व इतर,२०१६).ह्याच सुमारास भारतात एक अनुवंशशास्त्रीय संशोधन झाले त्याच्याशी हे निष्कर्ष जुळतात. त्या संशोधनानुसार भारतात मानवी उठाठेवींमुळे मागील १२०-२०० वर्षांत बिबळ्यांची संख्या ७५ ते ९० टक्के घटली आहे. (भट्ट व इतर,२०२०).ह्या सर्व गोष्टींमुळे जीवसृष्टीला असणाऱ्या धोक्‍यांची वर्गवारी करणाऱ्या जागतिक पातळीवरील ‘आय.यू.सी.एन.’ह्या संस्थेच्या वर्गवारीत त्याचे स्थान धोक्‍याच्या जवळ पोहोचलेले’ वरून आता ‘सहजी संकटग्रस्त होतील असे’ इतके खालावले आहे. साहजिकच संरक्षण-संवर्धनातील जागतिक पातळीवरील साईट्‌स कराराद्वारा त्याला ‘अपेंडिक्‍स एक’चे,आणि आपल्या ‘वन्यजीव संरक्षण कायदा’, १९७२नुसार ‘शेड्यूल एक’चे असे सर्वाधिक संरक्षण दिले आहे.

वीस हजार बिबळे
 बिबळ्याच्या प्रकारांमध्ये  किंवा उप-प्रजातींमध्ये पाहिलं तर आफ्रिकेबाहेर सर्वाधिक संख्या आणि व्याप्त क्षेत्र भारतीय बिबळेच व्यापून आहेत. नैसर्गिक भक्ष्य कमी होणे,अधिवास नष्ट होणे,मानवाशी संघर्ष आणि चोरटी शिकार हे धोके त्यांना भारतात सर्वाधिक आहेत-आणि ते वाढते आहेत. मानवव्याप्त प्रदेशांमध्ये त्यांचा वाढता वावर अधिकाधिक संघर्षांना कारणीभूत ठरू लागला आहे.‘वाइल्ड लाइफ सोसायटी ऑफ इंडिया’च्या आकडेवारीनुसार भारतात २०१९ साली एकूण ४९४ बिबळे जीवाला मुकले. पैकी १२९ चोरट्या शिकारीचे बळी होते.२०२०मध्ये एकूण झालेल्या मृत्युंपैकी १४४ चोरट्या शिकारीमुळे झाले होते.’पोचिंग’चं प्रमाण वाढतं आहे हे उघड आहे. वन्यजीव तस्करीच्या व्याप्तीचा अंदाज घेताना, कस्टम खाते उघडकीस आलेल्या गुन्ह्यांच्या किमान दसपट हत्या झाल्या असतील, असे गृहित धरते हे लक्षात घेता बिबळ्या सुरक्षित नाही. 

 प्रजातींची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात, त्यांची शक्‍य तितकी अचूक, शास्त्रीय पद्धतीने गणना करणे आवश्‍यक असते. कारण त्यामुळे आपले संवर्धनाचे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत ना, याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत की नाही, अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो. मार्जारकुलीन प्रत्येक मोठ्या प्राण्याची एकल ओळख वेगवेगळ्या पद्धतीने पटवली जाते. प्रत्येक बिबळ्याच्या अंगावरील ठिपकेही जनावरागणिक एकमेवाद्वितीय अशी रचना असते.आता बिबळ्यांचे असे ठिपके आणि त्यांची जनावरागणिक बदलती, त्याला ओळख प्राप्त करून देणारी संरचना अचूक नोंदवण्याची, ओळखण्याची सॉफ्टवेअर आली आहेत. त्यांचा वापर सदर मोजणीत केला गेला. भारतातील २१ राज्यांमध्ये कष्टाने आणि कौशल्यपूर्ण रीतीने ही मोजणी केली गेली होती. निष्कर्ष असा निघाला, की भारतात सुमारे १२ हजार ८५२ बिबळे कमीत कमी आहेत. अहवालातच असे म्हटले आहे, की ही निर्देशित संख्या न्यूनतम आहे. तज्ज्ञांच्या मते मात्र ही जरा जास्तच न्यूनतम दर्शवली गेली आहे. भारतात निदान २० हजार बिबळे आजमितीला नांदत असावेत, असा ह्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या अभ्यासकांचा होरा आहे. अंदाजित संख्येत इतका फरक का पडतो, ह्याची काही स्पष्ट कारणे आहेत. 

 तीन टप्प्यांमध्ये ही गणना केली गेली. तिसरा टप्पा मोजणीसाठी महत्वाचा होता. त्यात कॅमेरा ट्रॅप तंत्राने मिळालेल्या प्रतिमा हॉट-स्पॉटर नामक सॉफ्टवेअरने विविध गटांमध्ये विभागल्या गेल्या,तर एक्‍स्ट्राक्‍ट-कम्पेअर नामक सॉफ्टवेअरची मदत अंतिमतः एकेका जनावराची ओळख पटवण्यासाठी झाली. कॅमेरा ट्रॅप तंत्राने मूळ मिळालेली छायाचित्रे होती ५१ हजार ३३७. पुढे अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियांमधून, त्यातली  एकमेव’ असणारी छायाचित्रे आधी उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय माहितीसाठ्याशी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पडताळून पाहिली गेली. त्यामुळे एकाच प्राण्याची दोनदा गणना होण्याची शक्‍यता मावळली. अशा पडताळणीमुळे बिबळ्यांच्या विखुरणीचाही अभ्यास करता आला. इतके सर्व असूनही काही अत्यंत गंभीर त्रुटींमुळे सदर अहवालाची अचूकता अनेक नामवंत तज्ज्ञांनी प्रश्नांकित केली आहे,आणि ते मुद्दे महत्त्वाचे आहेत.

काय आहेत ह्या गंभीर त्रुटी?
पर्यावरण-खात्याच्या २०१४ सालापेक्षा भारतात बिबट्यांची संख्या ६०% इतकी वाढली आहे’ ह्या दाव्यातील फोलपणा तज्ज्ञ दाखवून देतात. २०१४मध्ये १८ राज्यांमध्ये ९२ हजार१६४ चौ.किमी. क्षेत्रावर ९७३५ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स लावून मोजणी झाली होती. २०१८ची ताजी  मोजणी ही २६ हजार ८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स लावून २१ राज्यांमध्ये एक लाख २१ हजार ३३७ चौ.किमी. इतक्‍या भूप्रदेशावर केली गेली आहे. साहजिकच संख्या वाढलेली दिसते आहे. ती चार वर्षात ६० टक्‍क्‍यांनी वाढली आहे, हा दावा हास्यास्पद आहे. दुसरा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे ही गणना व्याघ्र-गणनेचे एक उपांग म्हणून केल्याने त्यात अनेक भागांवरील बिबटे मोजले गेलेले नाहीत. फक्त वाघाच्या अधिवासातील बिबट्यांची ही गणना आहे. ईशान्य भागातील राज्ये, खडकाळ पण पिके घेणारे भाग, छोटी कोरडयुक्त जंगले, हिमालयातील उंचीवरील बिबट्यांचे अधिवास आणि महत्त्वाचे म्हणजे कॉफी, ऊस, चहा, सुपारी आदी पिकांमधील बिबळ्यांचे नव्याने तयार झालेले अधिवास ह्यात अंतर्भूत नाहीत. अधिकृत संख्येमध्ये आणि तज्ज्ञांच्या मते असलेल्या संख्येतील फरक ह्यामुळे आहे. 

संजय गुब्बी हे कर्नाटकमधील ख्यातनाम बिबळे- अभ्यासक. त्यांनी निव्वळ बी आर टी हिल्स ते बाणरघाट्टा ह्या २६२५ चौ.किमी.च्या छोटया पट्ट्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद केलेले बिबटे होते २६७. संपूर्ण कर्नाटकात एकूण बिबळे अधिवासांच्या सहा टक्के अधिवास आहेत. यातल्या इतक्‍या छोट्या क्षेत्रात जर इतके बिबळे असतील, तर एकूण संख्या किती जास्त असेल, असे त्यांनी विचारले आहे. तिथलीच  देवरायनदुर्ग ही जेमतेम ७० चौ.किमी.जागा १५ बिबटे पोसते आहे. म्हणजे खरी घनता कळण्यासाठी अशा सरकारेतर अन्य संशोधक संस्था मोजणीत सहभागी करून घेतल्या असत्या, तर ह्या त्रुटी जाणवल्या नसत्या. निदान पुढील मोजणीत ह्या चुका टाळल्या जाव्यात, ही अपेक्षा वन्यजीव अभ्यासक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com