तंबाखूच्या तावडीतून सुटलो, त्याची गोष्ट

No-Tobacco
No-Tobacco

व्यसनाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी आवश्‍यक असतो तो मनाचा निग्रह; त्या प्रवासाची ही कहाणी. आजच्या ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त.

मजा म्हणून सुरवात झालेल्या तंबाखू, दारूच्या व्यसनामुळे पुढं मला घरच्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. माझ्यासाठी हे केंद्र व सगळाच परिसर अनोळखी होता. सगळंच नवीन. हॉस्टेलसारखी राहण्याची व्यवस्था. माझं शरीर साथ देत नव्हतं; अर्धमेल्या अवस्थेत होतो मी. कधी एकटाच बडबडतोय, तर कधी छताकडं एकटक पाहत बसे. पण, हळूहळू अन्न जाऊ लागलं, शांत झोप मिळू लागली, हाताची थरथर थांबली, रेलिंगला न धरता जिना उतरता येऊ लागला. आता दारूची ओढ नव्हती. पण, दारूपेक्षाही विलक्षण बैचेन करणारी तंबाखूची ओढ सुरू झाली. इथं कुणाकडंच तंबाखू नाही; मग मागायची कुणाकडं? काय करावं कळेना. तंबाखू म्हणजे चुकल्यासारखं वाटत होतं. बैचेनी वाढत होती. दिसेल त्याला ‘तंबाखू आहे का’, अशी विचारणा सुरू होती. ‘माझ्याकडचे क्रीम बिस्किटचे पुडे देतो, परदेशातून आणलेली चॉकलेट्‌स देतो, नवीन टी-शर्ट देतो. पण, त्याबदल्यात एकतरी विडा द्या’, अशी विनवणी करीत होतो. केवढी लाचारी, किती गुलामगिरी! फक्त एका तंबाखूच्या विड्यासाठी.

‘मुक्तांगण’मध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. संस्था संपूर्ण व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील असल्याच्या धोरणाचा भाग म्हणून समाजात छोटं समजलं जाणारं, फारसं महत्त्व न दिलं जाणारं; पण तेवढंच घातक असलेलं तंबाखूचं व्यसन सोडायला तिथं मदत केली जाते. इथं इमारतीत प्रवेश करताना असे कोणतेही पदार्थ आतमध्ये येऊ नयेत म्हणून येणाऱ्या प्रत्येकाची व सोबतच्या सामानाची झडती घेतली जाते. असं सगळं तंबाखूविरोधी वातावरण असल्यानं आपली डाळ काही शिजत नाही, हे ध्यानात आलं. शेवटचा पर्याय म्हणजे मंगळवारी घरचे भेटायला येतील, तेव्हा त्यांना तंबाखू आणायला सांगायचं, असं मनात पक्कं केलं.

पण, ज्या वडिलांनी आपल्याला ‘शुभं करोति’ म्हणायला शिकवलं; त्याच हातांनी त्यांना आता तंबाखू आणायला सांगायची? विचारचक्र सुरू होतं. मंगळवार उजाडला, घरचे लोक दिसले, केवढा आनंद झाला. ते दिसले म्हणून नाही, तर आता तंबाखूची सोय होईल म्हणून. त्यांनी ‘कसा आहेस?’ अशी विचारणा केली. म्हणालो, ‘‘मला काही बोलायचं आहे’’. वडील म्हणाले, ‘‘मोकळेपणे बोल.’’ आता झाली का पंचाईत? त्यांना ‘तंबाखू आणून द्या’ म्हणून कसं सांगायचं? धीरच होईना. मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्यांना सांगायला नाही जमलं. त्यांचे संस्कार जिंकले. पण, तंबाखूची ओढ नष्ट झाली नव्हती. दुसरीकडं आपण या एवढ्याशा गोष्टीचे किती गुलाम झालो आहोत, या विचारानं चीडही येत होती.  पत्नी प्रेग्नंट असल्याचे कळाल्यानंतर मात्र पुरता भानावर आलो. आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव झाली आणि मनाशी पक्की खूणगाठ बांधली.

आता जे करायचं ते कायमस्वरूपी. ‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ताताई पुणतांबेकर यांना भेटलो. त्यांनी सगळं ऐकून घेतलं व म्हणाल्या, ‘‘तुला जीवनात ठोस काही करायचं असेल, तर तुला तंबाखूची गुलामगिरी झुगारून मुक्त व्हावं लागेल. एकदा का तू ते जमवलंस, की आपोआप आरोग्याकडं जागरूकतेनं पाहायला शिकशील.’’ हीच खूणगाठ मनाशी बांधत दुसऱ्याच दिवशी तंबाखू आणि ती ठेवायची डबी ‘मुक्तांगण’च्या गेटवर देखरेखीचं काम करणाऱ्या अरुणच्या सुपूर्त केली ती कायमचीच. तो दिवस होता ९ डिसेंबर २०१३ आणि मग मागं वळून पाहिलंच नाही....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com