Kargil Vijay Diwas : होगी शांति चारों ओर...

अनिल पवार
शुक्रवार, 26 जुलै 2019

शिक्षकांनी खूण केली अन्‌ मैदानावर जमलेल्या मुलांनी क्षणाचाही विलंब न लावता सूर धरला.

हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन
मन में है विश्‍वास, पुरा है विश्‍वास
हम चलेंगे साथ साथ एक दिन
होगी शांति चारों ओर एक दिन....

शिक्षकांनी खूण केली अन्‌ मैदानावर जमलेल्या मुलांनी क्षणाचाही विलंब न लावता सूर धरला.

हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन
मन में है विश्‍वास, पुरा है विश्‍वास
हम चलेंगे साथ साथ एक दिन
होगी शांति चारों ओर एक दिन....

निळ्या गणवेशातील मुलं नि डोक्‍याला निळा रुमाल बांधलेल्या मुली मन लावून गात होत्या. सगळे तरतरीत, उत्साही. त्यांच्या गोऱ्यागोमट्या चेहऱ्यावरील निरागसपणा त्यांच्या गाण्यात उतरला होता. त्यांच्या सुरात ताल होता, तसाच मनाला भिडणारा सच्चेपणाही होता. ते सूर नुसतेच गळ्यातून आले नव्हते, तर ते काळजातून आले होते आणि म्हणूनच त्यात भारून टाकण्याची ताकद होती.

हा अविस्मरणीय अनुभव होता कारगिलपासून ४५ किलोमीटरवरील लालुंगच्या सरकारी शाळेतील. कारगिलमधील निसर्गसौंदर्याची देशाच्या अन्य भागांतील लोकांना ओळख व्हावी, या हेतूनं जम्मू-काश्‍मीर सरकारच्या पर्यटन विभागानं आयोजित केलेल्या भेटीच्या निमित्तानं आम्ही कारगिलला आलो होतो. त्या वेळी बटालिककडे जाताना वाटेत भेटलेल्या मुलांमुळे एखाद्या शाळेला भेट द्यावीशी वाटली आणि लालुंगच्या शाळेतील मुला-मुलींमुळे हे अनोखे क्षण अनुभवता आले.

पाकिस्तानच्या सीमेपासून २०-२५ किलोमीटर अंतरावरील प्रामुख्यानं मुस्लिम विद्यार्थ्यांच्या या शाळेत सहावी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या शाळेतील सत्तर विद्यार्थ्यांमध्ये निम्म्या मुली आहेत. सगळे एकत्र शिकतात. दोनच दिवसांनी शाळेला उन्हाळ्याची पंधरा दिवसांची सुटी सुरू होणार असल्यानं मुलांना सुटीचे वेध लागले होते. सुरवातीला मुला-मुलींना नावं विचारली, ‘कोण आवडतं’, असं विचारून त्यांना बोलतं केलं. ‘मोठे झाल्यावर कोण होणार,’ असं विचारल्यावर ‘डॉक्‍टर, शिक्षक’ अशी उत्तरं आली, तर मुलींनी शिक्षिका व्हायचंय असं सांगितलं. ‘एखादं गाणं म्हणून दाखवाल काय? शाळेतील प्रार्थना म्हटली, तरी चालेल,’ असं सांगताच स्थानिक पुर्गी भाषेतील प्रार्थना त्यांनी सुरू केली.

कानाला अतिशय गोड वाटणाऱ्या या प्रार्थनेतील ‘खुदा, दुआ’ असा एखाद्‌-दुसरा शब्द सोडला, तर त्यातील एकही शब्द कधी कानावर पडलेला नव्हता. पण, सगळ्याच प्रार्थना असतात, तशी ती भावमधुर होती. प्रार्थना संपताच तिचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांच्या शिक्षकांना विनंती केली. तेव्हा मुलांनी एकेक ओळ म्हणायला सुरवात केली आणि शिक्षक त्यांचा हिंदीत अनुवाद करून सांगू लागले. काय नव्हतं त्या प्रार्थनेत?  ‘हे परमेश्‍वरा, मला नेहमीच चांगलं वागण्याची बुद्धी दे. थोरा-मोठ्यांचा मान ठेवण्याची शिकवण मला दे. माझ्या हातून चांगलं काही घडू दे, इतकंच नव्हे तर देशाची सेवा करण्याची, देशासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शक्ती मला दे....’ हे ऐकताना प्रार्थनेचा गोडवा अधिकच जाणवला नि आठवलं संत ज्ञानेश्‍वरांचं ‘पसायदान’. सगळ्या विश्‍वाचं कल्याण करण्याचं मागणं ही मुलं जगन्नियंत्याकडे मागत होती...

प्रार्थनेनंतर उत्साह संचारलेल्या मुलांनी पुढचं गाणं सुरू केलं. ‘हम होंगे कामयाब एक दिन...’ ते संपताच सगळी मुलं ताठ उभी राहिली नि त्यांनी खड्या आवाजात राष्ट्रगीत सुरू केलं. या मुलांची मातृभाषा वेगळी, हिंदी त्यांना थोड्या प्रमाणात येत होतं. पण, पूर्णपणे वेगळ्या भाषेतील राष्ट्रगीतातील प्रत्येक शब्दाचा उच्चार अचूक, स्पष्ट नि खणखणीत होता. त्यात जोश होता नि देशाभिमानही होता.

वीस वर्षांपूवी कारगिलचं युद्ध झालं, तेव्हा या मुलांचा जन्मही झाला नव्हता. या युद्धाची दाहकता त्यांनी त्यांच्या आई-वडिलांकडून ऐकली असेल. त्यामुळेच शांततेचं, सौहार्दाचं महत्त्व त्यांना अधिक वाटत असावं. कारगिलच्या युद्धभूमीवर सदैव सज्ज असणं गरजेचं तर आहेच; पण त्याचबरोबर शांततेची साद घालणंही तितकंच मोलाचं आहे. शांततेचं महत्त्व सीमेवर राहणाऱ्या लोकांनाच खऱ्या अर्थानं पटलेलं असतं, याचा प्रत्यय या भेटीनं दिला. भारावून टाकणाऱ्या मनःस्थितीत तेथून निघालो, तेव्हा या मुलांचे निर्मळ सूर मनात रेंगाळत होते आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे ‘सारेच दीप मंदावले आता...’ असं म्हणण्याची वेळ आलेली नाही, ही सुखद जाणीव होत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Anil Pawar