शताब्दी भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाची

बेल्जियम ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ. मागील रांगेत (डावीकडून ) आर. डी. शिंदे, पी. सी. बॅनर्जी, के. टी. नवले आणि पी. डी. चौगुले. मधील रांगेत संघाचे व्यवस्थापक सोहराब भूत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अली अजहर फैझी. पायऱ्यांवर बसलेले सदाशिव दातार व
बेल्जियम ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ. मागील रांगेत (डावीकडून ) आर. डी. शिंदे, पी. सी. बॅनर्जी, के. टी. नवले आणि पी. डी. चौगुले. मधील रांगेत संघाचे व्यवस्थापक सोहराब भूत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अली अजहर फैझी. पायऱ्यांवर बसलेले सदाशिव दातार व

बेल्जियममध्ये ऑगस्ट १९२०मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या संघाने प्रथमच भाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या शताब्दीनिमित्त सरकार व क्रीडा संस्थांनी त्या इतिहासाची नोंद घ्यायला हवी.

भारताने बेल्जियममधील अँटवर्प शहरात ऑगस्ट १९२०मध्ये ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. या ऑगस्टपासून या घटनेच्या शताब्दीवर्षाला प्रारंभ झाला. आपल्याकडे मात्र भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाची नोंद आहे ती १९००च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये भाग घेऊन नॉर्मन प्रिचर्ड या अँग्लो-इंडियन खेळाडूने दोन रौप्यपदके मिळवली अशी. परंतु ऑलिंपिक इतिहासकारांनी ‘प्रिचर्ड भारतीय नसून ब्रिटिशच होता’ असे स्पष्ट केले आहे. कारण नॉर्मनचे आई-वडील ब्रिटिश होते, पण कोलकत्यात नॉर्मनसह राहत होते. नॉर्मन हा कमी अंतराच्या शर्यतींमध्ये भाग घेण्यासाठी इंग्लंडमध्ये होता. तेथून तो पॅरिस ऑलिंपिकसाठी गेला. प्रवेशअर्जावर त्याने कोलकत्याचा पत्ता लिहिल्याने आयोजकांनी त्याला भारतीय मानले इतकेच. कदाचित त्याने तिथे मिळवलेल्या दोन पदकांमुळेच आपल्या क्रीडासंस्था त्याला भारतीय मानतात.

पहिल्या महायुद्धानंतर संयोजकांनी १९२०ची ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियममध्ये घेण्याचे ठरवले, हे वृत्त भारतातही पोचले. देशभरातील क्रीडासंघटकांना भारताचा स्वतंत्र संघ पाठवावा असे वाटू लागले. त्यांनी उद्योगपती दोराबजी टाटांकडे तशी इच्छा व्यक्त केली. टाटांना कल्पना आवडली. त्यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्यामार्फत इंग्लंडवरून त्यासाठी अनुमती मिळवली. संघटकांनी निधीची जुळवाजुळव सुरू केली. पुण्यात डेक्कन जिमखान्यावर आठ नोव्हेंबर १९१९रोजी ‘भारतीय ऑलिंपिक संघटने’ची प्राथमिक स्थापना झाली आणि टाटा यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.

पहिल्या पथकात सहा खेळाडू
खेळाडू निवडण्यासाठी वेळ कमी होता. संघटनेने मुंबईत एक ते आठ एप्रिल १९२०दरम्यान व पुण्यात २३ व २४ एप्रिलला निवड स्पर्धा आयोजित केल्या. देशभरातून खेळाडूंना बोलावण्यात आले. त्यातून कोल्हापूरचा रणधीर (की दिनकर?) शिंदे बॅंटमवेट फ्रीस्टाइल कुस्तीसाठी, मुंबईचा कुमार नवले फेदरवेट फ्रीस्टाइलसाठी, कोलकत्याचा पूर्णचंद्र बॅनर्जी छोट्या शर्यतींसाठी, साताऱ्याचा सदाशिव दातार व हुबळीचा एच. डी. कैकाडी मॅरेथॉनसाठी; तर बेळगावचा पी. डी. चौगुले दहा हजार मीटर व मॅरेथॉनसाठी अशी निवड करण्यात आली. अग्रणी होता पी. डी. चौगुले. कारण लहान वयापासून त्याने एक मैलापासून ते क्रॉसकंट्री व मॅरेथॉनपर्यंत सर्व स्तरांच्या अनेक स्पर्धा, त्याही अनवाणी जिंकल्या होत्या. १९१९मध्ये त्याने २७ मैलांची क्रॉसकंट्री स्पर्धा जिंकून अनधिकृत विश्‍वविक्रमही केला होता. 

स्थानिक स्पर्धांमध्ये यश
खेळाडूंच्या खर्चासाठी लोकमान्य टिळक, टाटा यांच्यासह अनेकांनी देणग्या दिल्या. गव्हर्नर लॉइड यांनीही सरकारतर्फे संघाच्या प्रवासाची व आधी इंग्लंडला जाऊन प्रशिक्षण व स्पर्धांमध्ये भाग घेण्याची, तसेच अँटवर्पमध्येही ब्रिटिश लष्करी तळावर राहण्याची व्यवस्था केली. पाच जून रोजी भारतीय संघ जहाजाने मुंबईहून लंडनकडे निघाला. प्रवासात त्यांचे जेवणाचे खूप हाल झाले. जहाजावर व्यायाम, सराव इ. करणे फारसे शक्‍य नव्हते. काहींना तर जहाज लागण्याचा त्रास झाला. २२ जूनला ते लंडनला पोचले. थकलेले असूनही लगेच ब्रिटिश प्रशिक्षकांबरोबर खेळाडूंचे प्रशिक्षण सुरू झाले.

नियमानुसार धावपटूंना शूज घालण्याचा सराव करावा लागला. त्यामुळे पायाला जखमा झाल्या. पण त्यांनी पट्ट्या बांधून सराव चालू ठेवला. तिथल्या स्थानिक स्पर्धांमध्येही सर्वांनी भाग घेतला आणि कमाल केली. धावण्याच्या बहुतेक स्पर्धांमध्ये त्यांनी वरचे क्रमांक पटकावले. त्यातही चौगुलेने आपल्या वेगाने सर्वांना चकित केले. मात्र वर्णद्वेषातून त्यांना मारहाणीचा त्रास सहन करावा लागला. भारतीयांची इंग्लंडमधील कामगिरी पाहून अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी ठळक मथळ्यांत बातम्या दिल्या, ‘ऑलिंपिक मॅरेथॉनमध्ये ‘हिंदू डार्क हॉर्स’ जिंकण्याची शक्‍यता. आमच्या धावपटूंनी चौगुलेपासून सावध राहावे.’ भारतीय संघ १०ऑगस्ट रोजी अँटवर्पमध्ये दाखल झाला. पावसाळी हवामानात १४ ऑगस्ट रोजी बेल्जियमचे राजे अल्बर्ट यांच्या हस्ते स्पर्धांना प्रारंभ झाला. भारतीय खेळाडू तत्कालीन ब्रिटिश भारताचा झेंडा घेऊन उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

प्रवास, खाण्याचे हाल, हवामानबदल व मोठ्या स्पर्धेचे दडपण यांमुळे बॅनर्जी १०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या पात्रता फेरीत, तर नवले आणि शिंदे आपापल्या कुस्तीगटात लवकर बाद झाले. चौगुलेने दहा हजार मीटरच्या पात्रता फेरीत धावण्यास सुरवात केली, पण तीन किलोमीटरवर एका माथेफिरू प्रेक्षकाने त्याच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याने त्याला दौड सोडावी लागली. तो निराश झाला, परंतु त्याची मुख्य मॅरेथॉन तीन दिवसांनी होती. सहकाऱ्यांनी त्याला त्यासाठी कसेबसे तयार केले.

चौगुलेचे स्पृहणीय यश
मॅरेथॉनचा दिवस २२ ऑगस्ट. अंतर ४२.७५० किलोमीटर म्हणजे ५४५ मीटरने जास्त होते. चौगुले व दातार शूज घालून धावपटूंमध्ये उभे राहिले. कैकाडी आलाच नाही. अनेक दिग्गज खेळाडूंसोबत त्यांच्या दौडीला सुरवात झाली. थोड्याच वेळात शूजमुळे दातार स्पर्धा सोडून बाहेर पडला. परंतु चौगुले १५ किलोमीटरपर्यंत लयदार पद्धतीने धावत होता. तेवढ्यात पावसाची भुरभुर सुरू झाली, त्यामुळे त्याचा वेग मंदावला आणि त्याच्या शूजमध्ये पावसाचे पाणी शिरले. ते जखमांना झोंबू लागले. छातीत भरपूर दम असूनही जखमांमुळे त्याचा वेग वाढू शकत नव्हता. तोवर शर्यत पुन्हा स्टेडियमकडे वळली होती. चौगुलेने मुसंडी मारली; पण वेदनामुळे वेग कमी झाला.

त्याच्यापुढे १८ जण होते, त्यामुळे अंतिम रेषा पार करणारा तो १९ वा स्पर्धक होता. ऑलिंपिकमध्ये स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय. विजेत्यापेक्षा २५ टक्के किंवा कमी वेळाच्या फरकाने अंतिम रेषा ओलांडल्याने त्याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले.चौगुलेचे हे यश स्पृहणीय होते. एका ब्रिटिश पत्रकाराच्या वृत्तात याचे वर्णन आहे. तो म्हणतो, ‘अँटवर्प ऑलिंपिकमध्ये भावना हेलावणारे एकच दृश्‍य होते, ते म्हणजे मॅरेथॉनच्या अंतिम टप्प्यात स्टेडियममध्ये प्रवेश करणाऱ्या चौगुलेच्या चेहऱ्यावरच्या वेदना व निराशा यांच्यावर त्याच्या संयमित कणखरपणाने केलेली मात. भारताच्या हजारो वर्षांच्या संयमशील इतिहासाचे ते प्रतीक होतेच; पण एक मूक राजकीय विधानही होते.’

या संघाच्या संघर्षाचा आज आपल्याला विसर पडला आहे. ‘ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय संघ’ म्हणून या संघाचे आणि स्पर्धा पूर्ण करणारा आणि म्हणूनच प्रथम भारतीय ऑलिंपिक खेळाडू म्हणून पी. डी. चौगुलेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले पाहिजे. त्याच्या नावे क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके दिली पाहिजेत. भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या शताब्दीनिमित्त आणि २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे औचित्य साधून सरकार व क्रीडासंस्थांनी याची योग्य ती दखल घ्यावयास हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com