विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई

धनंजय बिजले
रविवार, 29 सप्टेंबर 2019

यात्रेच्या माध्यमातून प्रचार
ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांच्या रथयात्रेने भाजपला सर्वप्रथम देशात मोठा जनाधार मिळवून दिला. तेव्हापासून सत्ता असो अथवा नसो, भाजप आणि यात्रा असे जणू समीकरणच झालेले आहे. हरयानातही मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकतीच जनआशीर्वाद यात्रा काढली. १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात काढलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून खट्टर यांनी राज्यातील सर्व ९० मतदारसंघांत भेट देत सरकारची कामे सांगितली. एका बाजूला विरोधकांची तयारीही नसताना खट्टर यांनी यात्रेच्या निमित्ताने निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली.

विरोधकांमधील फाटाफुटीमुळे राज्यात या वेळी ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. पक्षाचे हे मिशन पूर्ण होणार का, हे पाहणे उत्कंठावर्धक असेल. तर विरोधकांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे.

हरियानाचे राजकारण म्हटले की डोळ्यांसमोर पटकन तीन लाल येतात. देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल. या तीन नेत्यांनी राज्यावर अनेक वर्षे हुकूमत राखली. मात्र आज या जाटबहुल राज्यात सत्ता चालते ती फक्त भाजपची. गेली पाच वर्षे भाजपने मनोहरलाल खट्टर यांच्या रुपाने या राज्याला प्रथमच बिगर जाट नेतृत्व दिले. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे. देशात ‘नमो’ तर राज्यात ‘मनो’ हा भाजपचा नारा आहे.

हरियानात २१ ऑक्‍टोबरला मतदान आहे. पाच वर्षांपूर्वी मोदी लाटेत भाजपने ९० सदस्यांच्या विधानसभेत ४७ जागा जिंकत सत्ता पादाक्रांत केली. २००९ मध्ये भाजपचे अवघे चार आमदार होते. राज्यात पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा प्रयोग करीत अपरिचित अशा खट्टर यांना मुख्यमंत्री केले. बिगरजाट नेता मुख्यमंत्री अनेकांच्या पचनी पडायला कठीण गेले. त्यातही ते पंजाबी भाषिक. त्यामुळे खट्टर यांच्या मार्गात सुरवातीला अनेक काटे निर्माण केले गेले. जाट आंदोलन, गुरुमीत राम रहिम सिंगच्या अटकेनंतर उसळलेला हिंसाचार यामुळे खट्टर यांच्या कारकिर्दीपुढे संकट निर्माण झाले. मात्र खट्टर सर्वांना पुरून उरले. ‘हरियाना एक, हरियानवी एक’ ही त्यांची घोषणा जनतेला भावली.

खट्टर यांनीही अनेक नवे पायंडे पाडत जनतेचा विश्‍वास संपादन केला. मोठ्या कामांच्या टेंडरसाठी ऑनलाइन पद्धत, जनतेतून महापौर निवड असे निर्णय लोकप्रिय झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील सर्व दहा जागा जिंकल्या. 
पारदर्शक कारभार, मेरीटवर नोकऱ्या या मुद्‌द्‌यांवर खट्टर यांचा प्रचारात भर असेल.

शिवाय कलम ३७० व मोदी यांची लोकप्रियता या शिदोरीवर खट्टर यांना सत्ता मिळण्याचा आत्मविश्‍वास आहे. त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेशासाठी विविध पक्षांच्या आमदारांची रीघ लागली आहे. भाजपनेही विनासंकोच दारे खुली केल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. मित्रपक्ष अकाली दलाच्या एकमेव आमदारालाही भाजपने पक्षात घेतले. यावरून अकाली दल नाराज झाला. पण भाजपला सध्या तरी याची फिकीर नाही. 

वाढती बेरोजगारी, शेतकरी- युवकांचे असंख्य प्रश्‍न हे विरोधकांसाठी मुद्दे आहेत. पण रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची विरोधकांची तयारी नाही. भाजपची लढत प्रामुख्याने काँग्रेसशी असली तरी राष्ट्रीय लोकदल, बसप, आम आदमी पक्ष, स्वराज इंडिया हे पक्षही रिंगणात असतील. मात्र या सर्वच पक्षांत सुंदोपसुंदी माजली आहे. देवीलाल यांनी स्थापलेल्या लोकदलात चौताला कुटुंबातील वादाने उभी फूट पडली आहे. बहुतांश आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. अभयसिंह चौताला हा एकमेव चेहरा आता पक्षाकडे आहे.

काँग्रेसमध्येही फारसे आलबेल नाही. बंडाळी रोखण्यासाठी काँग्रेसने कुमारी शैलजा यांना प्रदेशाध्यक्ष बनविले असून, भूपिंदरसिंग हुडा यांना विधिमंडळ पक्षनेते बनविले आहे. थोडक्‍यात हुडा हेच पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. पण त्याचा लाभ किती होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.   

२०१४ मध्ये भाजपला ४७, लोकदलाला १९, तर काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. विरोधकांमधील फाटाफुटीमुळे राज्यात या वेळी ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. पक्षाचे हे मिशन पूर्ण होणार का हे पाहणे उत्कंठावर्धक असेल. तर विरोधकांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhananjay bijale