हेल्मेट आणि हिंट! (ढिंग टांग)

Dhing-tang
Dhing-tang

(खुले पत्र) मा. उधोजीसाहेब, प्रणाम. (शतप्रतिशत हा शब्द तूर्त टाळतो आहो!) आपल्या कृपाशीर्वादाने आमचा कारभार उत्तम चालला असून, आपला महाराष्ट्र सध्या प्रगती करतो आहे. (संदर्भ : टीव्हीवरील जाहिराती) तुमच्या करड्या नजरेखाली काटेकोर कारभार सुरू आहे, हे तुम्हाला कळले असेलच. कारण आमच्या कारभारी मंडळात तुमचेही काही शिलेदार कार्यरत आहेत. तथापि, गेले काही दिवस तुम्ही आमच्यावर तोंड सोडले आहे. (शाखेत जाऊन जाऊन) आम्ही कमालीची नम्रता अंगी बाणवली असल्याने कधी दुरुत्तर केले नाही की विरोध केला नाही. तुम्ही आम्हाला ‘नालायक’ म्हटले तरी कान खाजवत गप्प राहिलो. आपल्या स्नेहाला उघड दूषणे दिलीत (संदर्भ : युतीची पंचवीस वर्षे सडली... हे वक्‍तव्य); पण त्यावरही मूग गिळून गप्प राहिलो. सध्या मात्र तुम्ही घोडा चौखुर दौडवल्याचे निदर्शनास आले आहे. विरोधकही करू धजणार नाहीत, अशा भाषेत तुम्ही टीका करत आहात!

ह्याला काय म्हणायचे?
प्रात:स्मरणीय आणि सदैव पूजनीय श्रीमद नमोजी ह्यांच्यासारख्या थोर विभूतीला उघड दूषणे देण्यापर्यंत आपली मजल गेली. पहारेदार चोर निघाला, असे चक्‍क म्हणालात. तेही पंढरपुरात! अशाने पांडुरंग तरी तुम्हाला माफ करेल काय? श्रीमद नमोजी ह्यांना दूषणे देणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. सूर्यावर थुंकणे महागात पडते हे लक्षात ठेवा!! थुंकणाराचे तोंड वर असते आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम शाळेत शिकला असालच!! तुमच्या ह्या वक्‍तव्याला ‘करारा जबाब’ वेळप्रसंग पाहून दिला जाईल. कळावे. नाना.
ता. क. : पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्‍तीची कडक अंमलबजावणी होणार आहे!

नाना-
(भलतेच खुले पत्र) आम्ही सूर्यावर थुंकलो नसून, जमिनीवरच थुंकलो आहे! सूर्यावर आम्ही कशाला थुंकू? आम्हीच सूर्य आहोत. ह्या महाराष्ट्राचा हिंदवी सूर्य म्हणून अयोध्येपर्यंत आमचा लौकिक आहे, हे विसरलात काय? तुमच्या ‘करारा जबाबा’ला कोण विचारतो? तुमच्या डोक्‍यावर तुमचा सूर्य तळपत असतानाही, आमचा निर्णय झाला आहे, हा प्रकाशकिरण तुमच्या डोक्‍यात कां शिरत नाही? काय वाट्टेल ते करा. आम्हास पर्वा नाही. उधोजी.
ता. क. : पुण्यातल्या हेल्मेटसक्‍तीचा आणि आमचा काय संबंध? उग्गीच काहीतरी!!

(खासगी पत्र) प्रिय माननीय उधोजीसाहेब, इतके रागवायचे काहीच कारण नाही, एवढेच मला सांगायचे होते. अधिकउणा शब्द गेला तर रागावण्यासारखे काय घडले? तुम्हाला नव्या वर्षाच्या अनेक आणि हार्दिक शुभेच्छा. सध्या आपले छान तर चालले आहे की! पण आमच्या पूजास्थानाला उद्देशून तुम्ही काहीबाही बोललात (आणि आम्ही गप्प राहिलो), तर आम्हाला ते किती महागात जाईल, हे आपण जाणताच. त्यामुळे तसे खुले पत्र पाठवणे भाग होते. (फाडून टाका, विसरून जा!!) श्रीमान नमोजींना तुम्ही चोर म्हणालात. असे असताना तुम्ही गप्प कसे? अशी विचारणा आम्हाला दिल्लीहून झालीच. म्हणून सडेतोड उत्तर द्यावे लागले. 

तुम्ही (आमचे) कितीही अपमान केलात तरी हा नाना सारे आनंदाने सहन करील, ह्याची खात्री बाळगा. आजवर केले नाहीत का? पण नमोजींचा अपमान (उघड) खपवून घेणार नाही, म्हंजे नाही! (ह्याचीही खात्री बाळगा.) असो. 

...आमची कारवाई ही (पुण्यातल्या) ट्राफिक पोलिसासारखी आहे. हेल्मेट न घालणारा स्कूटरवाला आणि हवालदार दोघेही पुणेकर!! काय करणार? पण हेल्मेटसक्‍ती ही तुम्हाला हिंट आहे हे तुमच्या ध्यानी आले नाही का? सुज्ञ आहात, बाकी काय लिहिणे? पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या शुभेच्छा. 
नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com