ढिंग टांग : टू प्लस टू प्लस वन!

Dhing-Tang
Dhing-Tang

प्रति, 
आदरणीय नानासाहेब फडणवीस
‘वर्षा’ बंगला, मुंबई.
महादेय शतप्रतिशत नमस्कार.
खालील कविता पावसाळी कविता नव्हे! त्यात महाराष्ट्राची वेदना दडली आहे. ती तुमच्यापर्यंत पोचावी, ही इच्छा. वाचा :
मुख्यमंत्रिपदासाठी आपल्यात नको झगडा
कारण आपला एकोपा आहे तगडा!
मुख्यमंत्री कोण? हा आहे शंभर नंबरी सवाल
कारण त्याच्यावरून चालला आहे बव्हाल!
कमळ दोन, धनुष्यबाण दोन
तिसऱ्याला द्यावे एक साल
हाच सत्तेचा फार्म्युला आहे,
नाही तर निवडणुकीत होतील हाल!
...ओळखा पाहू कवि कोण? आठवले की सांगा! 
     आपला. क्ष.
प्रत रवाना : मा. श्री. उधोजीसाहेब, 
‘मातोश्री’ बंगला, वांद्रे.

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी मानाचा मुजरा ! घाईघाईने पत्र लिहिण्याचे कारण, की सोबत जोडलेली कविता असलेला कागद कोणीतरी आमच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या आवारात टाकून गेले. एकंदर कवितेचा दिव्य बाज पाहता ती आपल्या आठवलेजींची असावी, असा माझा वहीम आहे. पण खात्री नाही. कारण असल्या कविता काय, कोणीही करील!! परंतु मुख्यमंत्रिपदावरून आपल्यात पुन्हा कलगीतुरा रंगणार, असे दिसल्यामुळे त्यांनी हा उद्योग केला असावा, असे वाटते. पुरावा नाही, कारण कवितेखाली कवीने नाव लिहिण्याचे टाळले आहे!! 

मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचा (पुन्हा) काहीतरी गैरसमज झाला आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘मुख्यमंत्री आपलाच’ असा आग्रह धरला गेला. त्यावरून तुम्ही भडकलात का? पण तसे नाही. महायुती करतानाच आपले जे काही ठरले होते, तेच (अजून तरी) कायम आहे. जे काही ठरले ते तुमच्यात आणि आमचे अध्यक्ष श्रीमान मोटाभाई ह्यांच्यात ठरले. त्यात बदल करणारे आम्ही कोण? 

श्रीरामपूरच्या सभेतले, ‘शेतकऱ्यांच्या संतापाच्या आगीत सत्तेची आसने खाक होतील’ हे तुमचे भाषणातले वाक्‍य कोणाला उद्देशून होते? टीव्हीवर ते ऐकून (चटका बसल्याप्रमाणे) खुर्चीवरून तटकन उठलो!! चाचपून पाहिले, तर खुर्ची खरेच तापली होती. पण ते जाऊ दे.
कृपया मनातला गैरसमज काढून टाकावा! आपलं ठरलंय!! हो की नाही? सदैव आपला. नाना फ.

नानासाहेब- 
ह्याच कवितेचा कागद आमच्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या दाराच्या फटीतून कोणीतरी सरकवला होता. मी निक्षून सांगतो की ही कविता आठवलेजींची नाही!! त्यांना मी चांगले ओळखतो. (त्यांचा ‘संविधान’ बंगला आमच्या जवळच आहे...) कवितेतील ओळींचा (जमेल तसा) अर्थ लावल्यास असे दिसते की ‘तुम्हाला दोन वर्षे, आम्हाला दोन वर्षे आणि त्यांना एक वर्ष’ असा त्यांचा फॉर्म्युला आहे. आठवलेजी कवी आहेत. ते एका वर्षावर समाधान कसे मानतील? माझा विश्‍वास नाही. त्यातूनही त्यांची ही कविता असल्यास कुठल्याही दिवाळी अंकाकडे पाठवून द्या. आपल्याला ती नको!!

दोन अधिक दोन अधिक एक हा फॉर्म्युला तुमच्यापैकीच कुणीतरी आठवलेजींना सुचवला असावा, असा माझा वहीम आहे. एरवी ते अशी मागणी करणार नाहीत. ह्या फार्म्युल्यात सत्तेच्या समसमान वाटपाच्या तत्त्वाला हरताळ फासला जाईल, हे लक्षात ठेवा!!  

शेतकऱ्यांच्या संतापाच्या आगीत सत्तेचे आसन खाक होईल, हे माझे वाक्‍य सध्या गाजते आहे. श्रीरामपूरच्या सभेत मी ते वाक्‍य उच्चारले, कारण मला ते सुचले! एवढेच. बाकी आपले ठरले आहे त्याप्रमाणेच चालू आहे! कळावे. आपला. उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com