ढिंग टांग : खैरियत!

Dhing-Tang
Dhing-Tang

‘दोपहरपर्यंत येतो’ असे
सांगून घरातून निघालेल्या
 लियाकतने टाकले पाऊल
 घराबाहेर आणि मग
चिटपाखरु नसलेल्या 
रस्त्यात उतप्त मनाने 
 तो चालत राहिला समांतर
 बंद दुकानांच्या ओळीशी
 बरेच बरेच अंतर...
 सैनिकांच्या तीक्ष्ण नजरा,
 तारांची आडवी भेंडोळी,
 गस्ती गाड्यांचे मोहरे, आणि
 संचारबंदीचे कलम चुकवत
 चुकवत तो निघाला...

 लियाकत असा केव्हापासून
 चालतो आहे? किती वर्षे?
 किती युगे? किती अब्द?

 गुलशन मैदानालगतच्या
 कडेकोट पोलिस ठाण्याच्या
 भोवताली उभारलेल्या
 काटेरी कुंपणांचे जाळे ओलांडत
 धातुशोधक चौकटीच्या
 उंबऱ्यांचे बीभत्स चित्कार
 कानाआड ढकलत
 आपादमस्तक चाचपणीसहित
 सवाल जबाब करत
 लियाकत पोचला सुरक्षित
 चार भिंतींच्या आड,
 उभा राहिला उत्सुकतेने
 हातातले चतकोर 
 चिटोरे पुन्हा पुन्हा पाहात

 त्याला करायचा होता
 फक्‍त एकच फोन
 मुंबईत शिकत असलेल्या
 बहिणीला-आफताबला.

 दिन दुरुस्त असते, तर
 आफताब ईदलाच घरी
 नक्‍की आली असती,
 हंसीमजाकचे काही पल गुजारुन
 पुन्हा पढाईसाठी निघताना
 टप्पल मारुन म्हणाली असती :
 ‘‘छोटे मियां, संभालो...’’

 नखशिखांत चिलखती पोशाखात
 बंदूक ताणून उभ्या असलेल्या
 सोल्जराने खुणेनेच सांगितले 
 त्याला, ‘‘यहां नहीं, वहां जाओ’’
 उपभोक्‍ता का नाम : आफताब.
 पता : मालूम नही. रिश्‍ता : बहन.
 कॉल करने की वजहा : ...
 ...छापील फॉर्मवर माहिती भरत
 लियाकत जाऊन उभा राहिला
 लांबलचक रांगेत, जिथल्या
 हरेक डोळ्यांत होता
 संभ्रम. संकोच... बरेचसे भय.
 रांग हळूहळू सरकत गेली...

 - तीन मिनट में खतम करना,
 - जल्दी करो... हुआ?
 - नंबर ठीकसे मिलाओ.
 - बाद में आना...
 दूरसंपर्कासाठी छुटपुटणाऱ्या
 उदासवाण्या मूक रांगेत
 लियाकत केव्हाचा उभा आहे...
 किती काळ? किती वर्षे?
 किती युगे? किती अब्द?

 संवादाच्या सडकांमध्ये काटेरी
 तारांची असंख्य कुंपणे आहेत,
 करड्या नजरेच्या बंदूकनळ्यांचे
 संशयी पहारे आहेत.
 सामसूम तिठ्या तिठ्यांवर 
 दहशतीचे शहारे आहेत.
 मौन, दुखऱ्या चेहऱ्यांवरल्या
 रेषांत आजादीचे नारे आहेत.
...वाळूच्या पोत्यांमागील बंदुकांच्याही पल्याड कुठे तरी उभा आहे सुसंवाद.

आपल्या नंबराच्या प्रतीक्षेत.
तेवढ्यात लियाकतचा नंबर आला -
फोनच्या तिसऱ्या रिंगेला
ऐकू आली तीच परिचित हांक.
जशी अंधाऱ्या विहिरीच्या 
खोल तळातून यावी
जिवंत जिव्हाळ्याची झुळझुळ...
कंठातून फुटणारे रडू
कसेबसे आवरत लियाकत 
फक्‍त एवढेच म्हणाला :
‘‘यहां सब खैरियत है
यहां सब खैरियत है...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com